कोल्हापूर : प्रतिनिधी : शस्त्रतस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक केल्यानंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सिकंदर कोल्हापुरातील गंगावेश तालमीचा मल्ल असल्याने कुस्तीशौकिनांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिकंदरच्या कुटुंबियांनी खोट्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे, असा आरोप केला आहे. (Sikandar Sheikh arrested)
पंजाब पोलिसांकडुन गुन्हा दाखल
सिंकदर शेख याला शस्त्रतस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पपला गुर्जर टोळीचा पर्दाफाश करत टोळीला शस्त्र पुरवणाऱ्या चौघांना सीआयए पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यात सिंकदर शेख आहे. आरोपींकडून पोलिसांनी एक लाख ९९ हजार रुपये रोख, पाच पिस्तुले, काडतुसे, दोन गाड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी खरड (पंजाब) पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पंजाबमध्ये सिकंदर शेखरला अटक झाल्यानंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. (Sikandar Sheikh arrested)
संशयित पापला टोळीशी संबधित
अटक करण्यात आलेले आरोपी राजस्थान आणि हरियाणामधील सक्रीय असलेल्या विक्रम उर्फ पपला टोळीशी थेट संबंधित आहेत. आरोपी उत्तर प्रदेशमधून शस्त्रे आणत ती पंजाब परिसरात पुरवत होते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. यातील तिघेजण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. तर सिंकदर शेख याची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दानवीर हा पापला गुर्जर टोळीचा सक्रीय सदस्य आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा येथे खून, दरोडा, एटीएम फोडणे आणि आर्म ऍक्टनुसार गुन्हे दाखल आहेत. दानवीर हा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथून शस्त्रे आणून पंजाब आणि परिसरात पुरवण्याचे काम करत असे.
गेले काही महिने सिकंदरचा पंजाबमध्ये मुक्काम
२४ ऑक्टोबरला दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे एका गाडीत शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिंकदर यांच्याकडे द्यायची होती. सिंकदर याने पुढे नयागावातील कृष्ण उर्फ हैप्पी याला पुरवायची होती. परंतु, पोलिसांनी सापळा रचत तिघांना एअरपोर्ट चौकातून अटक केली. नंतर २६ ऑक्टोबरला कृष्ण उर्फ हैप्पी याला अटक करत त्याच्याकडून पिस्तुले जप्त करण्यात आली. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेल्या सिंकदर याने महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला आहे. तो क्रीडा कोट्यातून भारतीय सैन्यात दाखल झाला होता. पण, ती नोकरी त्याने सोडून दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून सिंकदर हा पंजाब येथील मुल्लांपूरमधील गरिबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता. सिंकदर याच्या अटकेनंतर कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Sikandar Sheikh arrested)