भात करताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी – तांदूळ जुना असेल तर भाताला अधिक पाणी लागतं. नवीन असेल तर कमी पाणी लागतं. जुन्या तांदळाचा भात मोकळा होतो. नवीन तांदळाचा भात चिकट, मऊ, आसट होतो. पुलाव, बिर्याणी करताना लांब दाण्याचे म्हणजे बासमती तांदूळ वापरावेत. पण खिचडी, दहीभात यासारख्या पदार्थांसाठी लहान दाण्याचा म्हणजे आंबेमोहोरसारखा तांदूळ वापरावा. अगदी गरम आसट भात खायचा असेल तर इंद्रायणीसारखा तांदूळ वापरावा. पण हा भात गार झाल्यावर अजिबात गिच्च गोळा होतो. पुलाव, बिर्याणी, खिचडी करताना तांदूळ किमान एक तास आधी धुवून, संपूर्ण पाणी काढून ठेवावेत.
पुलाव
तांदूळ धुवून ठेवा. थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला चोळा. तुपावर थोडा अख्खा गरम मसाला (लवंगा, मिरी, दालचिनी, वेलची, तमालपत्रं, शहाजिरं) घाला. तो तडतडला की त्यात चिरलेल्या भाज्या (फरसबी, गाजर, फ्लॉवर, कांदा, मटार, कोबी) घाला. जरासं परतून धुवून ठेवलेले तांदूळ घाला. दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. भात मोकळा शिजवा.
वांगी भात
एक वाटी तांदूळ असतील तर प्रत्येकी १ वाटी चिरलेला कांदा, टोमॅटो आणि वांग्याचे तुकडे घ्या. शक्यतो बिनबियांची जांभळी वांगी वापरा. तेलाची मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यावर अगदी थोडा अख्खा गरम मसाला (लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्रं) घाला. तो तडतडला की त्यात कांदा घाला. कांदा जरासा मऊ झाला की टोमॅटो घालून जरासं परता आणि मग वांगी घाला. वांगी घातल्यावर मंद आचेवर झाकण ठेवून वांगी अर्धवट शिजवा. गॅसवर पातेल्यात दुप्पट पाणी गरम करायला ठेवा. तांदळाला काळा मसाला चोळा. एक वाटी तांदळाला दीड टीस्पून काळा मसाला आणि अर्धा टीस्पून लाल तिखट हे प्रमाण घ्या. वांगी अर्धवट शिजली की तांदूळ घालून परता आणि मिनिटभर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. नंतर त्यात आधणाचं पाणी आणि मीठ तसंच लिंबाचा रस घाला. भात छान मऊ शिजू द्या. वरून खोबरं-कोथिंबीर घाला.
मसाले-भात
थोडं सुकं खोबरं, जिरं, लवंग, दालचिनी, वेलची असं कच्चंच कुटून घ्या. तेलाची फोडणी करा. त्यात तमालपत्रं घाला. परतून त्यात आवडीनुसार भाज्या (फ्लॉवर, तोंडली, गाजर, मटार, वांगी, कांदा, फरसबी) घाला. चांगल्या परतल्या की त्यात हा मसाला घालून परता. मसाला परतला की चमचाभर दही घालून परता. नंतर त्यात काळा मसाला चोळलेले तांदूळ आणि काजू तुकडा घाला. तांदूळ चांगले परतले की आधणाचं दुप्पट पाणी घाला. मीठ, लिंबाचा रस आणि आवडीनुसार थोडी साखर घाला. भात चांगला शिजू द्या. वरून खोबरं-कोथिंबीर घाला.
कोथिंबीर पुलाव
एक वाटी तांदूळ असतील तर एक मोठी जुडी कोथिंबीर आणि १५ लसूण पाकळ्या असं प्रमाण घ्या. तूपावर लवंग आणि मिरी घाला. तडतडलं की तुरीचे किंवा मटारचे दाणे घाला. ते परतेपर्यंत लसूण, एखादी हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घ्या. ती तांदळाला चोळा. दाणे परतले की त्यात तांदूळ घाला. चांगलं परता. लसणाचा खमंग वास आला पाहिजे. नंतर त्यात दुप्पट पाणी, अगदी थोडा लिंबाचा रस आणि मीठ घाला. या भाताला कुठलाही मसाला वापरायचा नाही. भात मऊ शिजवा.