मुंबई : प्रतिनिधी : महिला आरक्षण विधेयकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चर्चा करण्यासाठी ओपन चॅलेंज दिले. हे चॅलेज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वीकारले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे समोरासमोर येऊन चर्चा करावी हे आव्हान खासदार सुळे यांनी स्वीकारले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मुख्यमंत्री म्हणतील ती जागा आणि वेळ मला मान्य आहे असेही सुळे म्हणाल्या. तर प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी कधी व कुठे यायचे ते सांगा. नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान दिले. (Sule and Shinde have accepted Fadnavis’s challenge)
तीन दिवस अधिवेशन बोलावून करोडो रुपयांचा चुराडा
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री संसदेतील चर्चासत्रात नव्हते. पण विधेयकात दोन-तीन बदल झालेले आहेत. ही क्रोनोलॉजी त्यांना माहीत असली पाहिजे. डिलिमिटेशन आणि सेन्सेस या दोन्ही गोष्टींची चर्चा त्या बिलांमध्ये आहेत. पण सेन्सेस कुठला? जो येईल तो? मग भारत सरकारने शब्द दिला होता की, सेन्सेस करणार. त्यानंतर मागणी झाली की, जातीय जनगणना करा. मात्र जातीय जनगणनेसाठी सरकारकडून पैसे देण्यात आलेले नाहीत. हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणात बोलले आहे. तसेच मागणी केल्यानंतर तुम्ही जातीय जनगणनेसाठी हो म्हटलेले आहे. मग ती वेळेवर का सुरू केली नाही? कारण त्यांची हे करण्याची इच्छाशक्ती नव्हती. तसेच सरकारने मागील तीन दिवसांचे अधिवेशन बोलावण्याची गरज काय होती? त्यांना यातून काय मिळाले? चार राज्यांत निवडणुका सुरू आहेत. तातडीने सगळी कामे सोडून त्या अधिवेशनासाठी गेले. पण काय मिळवले? राज्यसभा तीन दिवस उगाच चालली. तीन दिवस लोकसभा चालली. काय हाती लागले? करोडो रुपयांचा चुराडा करायची काय गरज होती? त्याऐवजी आज पश्चिम आशियात जे संकट आहे, त्यावर भारत सरकारने काही का बोलले नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. (Sule and Shinde have accepted Fadnavis’s challenge)
नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा
खासदार प्रणिती शिंदे यांनी महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पण अधिवेशनच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करुन देशाचे तुकडे पाडायचे होते. सत्येसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. पण त्याचा कुटील डाव काँग्रेसह सर्व विरोधकांनी हाणून पाडले असून सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहे अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली. देवेंद्र फडण्वीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला तयार आहे. कधी व कुठे यायचे ते सांगा. नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.
आरएसएसमध्ये महिलांना किती स्थान आहे?
महिला विधेयकाला विरोध करून काँग्रेसने भ्रूणहत्या केली. या मुख्यमंत्र्यांच्या टिकेला उत्तर देताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार, महिला खेळाडूंवरील अत्याचार, हाथरस, उन्नाव, बदलापूर, खरात प्रकरण हे भाजपाच्या काळातच झाले आहे. ही प्रकरणे भाजपाने कशी हाताळली हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे महिलांची फक्त भ्रूण हत्याच नाही, तर महिलांच्या चारित्र्याचे हनन, त्यांच्यावर अत्याचार आणि महिलांच्या हत्या करण्याचे पाप भाजप रोज करत आहे. भाजपचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना किती स्थान आणि सन्मान आहे? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजपच्या इतिहासात एकही महिला भाजपची अध्यक्षा झाली नाही याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. (Sule and Shinde have accepted Fadnavis’s challenge)