मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेतील काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि कट्टर काँग्रेसनिष्ठ दिवंगत राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत. सातव यांच्या प्रवेशाने हिंगोली जिल्हयातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सातव यांचे पती राजीव सातव यांचे गांधी घराण्याशी अत्यंत घनिष्ठ संबध होते. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला धक्का बसला आहे. प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेत २०३० पर्यंत मुदत असताना त्यांनी भाजपमध्ये का प्रवेश केला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.
प्रज्ञा सातव यांनी आज गुरुवारी सकाळी विधानभवनात येत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या तडक भाजप कार्यालयाकडे रवाना झाल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (Pradnya Satav joins BJP)
भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी म्हटले की, मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या परिवारात सामावून घेतले, यासाठी मी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. माझे पती सर्वांचे लाडके दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमीपूत्र होते. त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या मातोश्री रजनी सातव यांनीही हिंगोलीच्या विकासासाठी आजीवन काम केले होते. त्या दोघांसोबत राहून मी गेली २० वर्षे एनजीओ, शिक्षणसंस्थांमध्ये काम करत होते. राजीव सातव यांच्या निधानंतर मला २०२१ साली विधिमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला सर्वांचे सहकार्य मला लाभले. मी आज इथवर येण्याचा माझ्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रज्ञा सातव यांनी म्हटले. (Pradnya Satav joins BJP)
माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजीव सातव यांचे हिंगोलीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राचा चौफेर विकास घडत आहे. त्यामध्ये आम्हाला साथ द्यायची असल्याने आम्ही भाजपामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राजीव सातव यांचे आशीर्वाद, देवेंद्र फडणवीसांची साथ, सर्वजण मिळून करु संकटांवर मात असे म्हणत मी एवढंच आश्वासन देते की, मी आणि माझे कार्यकर्ते हे, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास या धोरणाने काम करत राहू, असे यावेळी प्रज्ञा सातव यांनी म्हटले. (Pradnya Satav joins BJP)