कोल्हापूर; प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात नेहमी संविधान आणि भ्रष्टाचारावर बोलतात, पण महाष्ट्रात लोकशाही मार्गाने जनेतेने निवडून दिलेले, चांगले कारभार करणारे लोकनियुक्त महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले. शंभर कोटी रुपयांना आमदार खरेदी करून भ्रष्टाचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या तोंडी संविधान आणि भ्रष्टाचाराची भाषा शोभते का? अशा कठोर शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हल्लाबोल केला. देशात आणि महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांचा नंगानाच सुरू आहे. शेतकरी राबत आहे आणि त्यांची मुले सीमेवर रक्षण करत असताना सरकार उद्योगपतींचे हित जोपासण्याचे काम करत आहेत. सरकारची नीती लक्षात घेऊन आता राज्यातील जनतेने डोळे उघडून सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या, राज्याच्या विकासाशी कटिबद्ध असणाऱ्या महाविकास आघाडीला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या गांधी मैदान वरुणतीर्थवेस मैदानातील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, आमदार जयंत आसगावकर, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगलेतील उमदेवार आमदार राजूबाबा आवळे, शिरोळमधील गणपतराव पाटील, करवीरमधील राहुल पाटील, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर, कर्नाटकातील माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्यासह इंडिया आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणूक प्रचारात देशाचे धोरण, विकास, शेतकरी आत्महत्या, रोजगार, महागाई कमी करणे या प्रश्नांवर न बोलता पंतप्रधान मोदी आणि त्यांचे नेते धर्म, जाती अशा गोष्टींवर बोलून लोकांचे लक्ष विचलित करतात, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. रोजगार निर्मिती करणारे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. बंदरे, विमानतळ, धारावी झोपडपट्टी अशी कामे उद्योगपती अदानींना दिली जात आहेत. उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही. महाराष्ट्रातील दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेली आहे. आठ लाख लोकांचे रोजगार बंद झाले आहेत. सहा हजार उद्योग बंद पडले आहेत, याकडे लक्ष वेधत भाजपकडे रोजगार निर्मितीचे धोरण नाही. महाराष्ट्र राज्याची निवडणूक सुरू असताना पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जातात इतकी त्यांच्यात अपरिपक्वता असल्याची टीका त्यांनी केली.
पंडित नेहरूंनी देशात घटनेद्वारे आरक्षण सुरू केले. राहुल गांधी देशभर भारत जोडो यात्रा काढून जनसामान्यांचे प्रश्न समजावून घेत जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. तरीही आरक्षणाच्या प्रश्नांवर मोदी पंडित नेहरू आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत, याकडे प्रियांका यांनी लक्ष वेधले. महागाई, बेरोजगारी, शेती मालाला भाव, शेतकरी आत्महत्या या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष न देण्याइतपत भाजपचे नेते निर्ढावलेले आहेत, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. निवडणुकीच्या काळात जातीधर्माचे प्रश्न उपस्थित करून लोकांची मने दुसरीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करतात. लाडकी बहीण योजना सुरू केली असली तरी महागाईमुळे जनता हैराण झाली आहे. पण जनता शहाणी झाली असून महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्यावर महिलांना महिन्याला तीन हजार रुपये, शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांचे कर्ज माफ, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान, तरुणांना चार हजार रुपये महागाई भत्ता, २५ लाखांचा आरोग्यविमा, अडीच लाख तरुणांना नोकऱ्या देण्यास आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला
भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. मुंबईच्या समुद्रात शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची पायाभरणी होऊनही अजून त्याचे काम सुरू झालेले नाही. संसदेच्या आवारातील शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्यात आला. भाषणात सातत्याने शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या मोदींनी महाराष्ट्राचा केलेला अपमान जनता विसरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्राने देशाला प्रगतिपथावर नेले
प्रियांका गांधी यांनी भाषणाची सुरुवात करताना शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणेने केली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र ही पवित्र आणि सुंदर भूमी असून इथल्या संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकारामांसह सर्व संतांनी प्रेमाचा आणि एकतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी देशाला प्रगतिपथावर नेले. याच भूमीतून स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, स्वातंत्र्यवीर वारके, बाबूराव धारवाडे यांनी स्वातंत्र्यचळवळीत लढा दिला.
बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत मोदींनी सुरा खुपसला
पंतप्रधान मोदी भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाच्या पाठीत मागून सुरा खुपसला, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार भ्रष्ट मार्गाने पाडले, अशी टीकाही त्यांनी केली.