स्टॉकहोम; वृत्तसंस्था : स्वीडनहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानाला ग्रीनलँडवर जोरदार वादळाचा सामना करावा लागला. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. जोरदार वादळामुळे, विमान एका झटक्यात ८,००० फूट खाली आले. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमान हेलकावे खाऊ लागले आणि प्रवासी भीतीने ओरडू लागले कारण त्यांचे सामान इकडे तिकडे पडले. विमानात गोंधळ उडाला. काही प्रवासी एकमेकांवर पडले आणि सामान विखुरले.
या घटनेचा व्हिडिओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाला आहे. स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्सचे विमान स्टॉकहोमहून मियामीला जात असताना ते वादळात अडकले. विमानात घबराट पसरल्याने वैमानिकाने तात्काळ जवळच्या विमानतळाशी संपर्क साधला आणि विमान कोपनहेगनकडे वळवले. खाली आल्यानंतर विमान स्थिर झाल्यावर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला; मात्र विमानाचे मोठे नुकसान झाले असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. इकडे तिकडे सामान विखुरलेले, ताट, खाद्यपदार्थ उडताना दिसत होते. प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
विमान वाहतूक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नसून, एका व्यक्तीचे डोके छतावर आदळले. प्रवाशांना प्राथमिक उपचार करून विमानाची स्वच्छता करण्यात आली. स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्सने सांगितले, की विमानाच्या नुकसानीचे अद्याप मूल्यांकन केले जाऊ शकत नाही; परंतु कोपनहेगन विमानतळावर प्रवाशांची काळजी घेण्यासाठी पुरेशा सुविधा आणि कर्मचारी आहेत. प्रवाशांना कोपनहेगनमधील हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले असून त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे. प्रवाशांची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडली जात नाही. ही घटना भीतीदायक असली, तरी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले, की पायलट आणि एअरलाइन क्रूने सुरक्षिततेच्या प्रक्रियेचे पालन करताना त्वरित कारवाई केली. प्रवाशांना पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहेत.