पर्थ, वृत्तसंस्था : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान शुक्रवारपासून सुरू झालेल्या पर्थ येथील कसोटी क्रिकेट सामन्याचा पहिला दिवस रंगतदार ठरला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील या कसोटीच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये भारताचा पहिला डाव १५० धावांत संपवून ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली होती खरी, परंतु दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ बाद ६७ अशी करून यजमानांना चोख प्रत्युत्तर दिले. दिवसभरात १७ विकेट पडल्यानंतर भारताकडे ८३ धावांची आघाडी आहे.
ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यामध्ये भारताचा बदली कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु, पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या मर्यादा उघड केल्या. यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल हे दोघे शून्यावर, तर विराट कोहली ५ धावा करून बाद झाला. एका बाजूने नेटाने फलंदाजी करणारा सलामीवीर लोकेश राहुल तेविसाव्या षटकात पंचांच्या वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला आणि २६ धावा करून परतला. ३२ व्या षटकात भारताची अवस्था ६ बाद ७३ अशी झाली होती. रिषभ पंत आणि नवोदित नितीश कुमार रेड्डीने सातव्या विकेटसाठी ४८ धावा जोडून संघाला सव्वाशे धावांच्या आसपास पोहचवले. पंत ७८ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३७ धावांवर बाद झाल्यानंतर रेड्डीने तळाच्या फलंदाजांसह भारताच्या दीडशे धावा पूर्ण केल्या. रेड्डीने ५९ चेंडूंमध्ये ६ चौकार व एका षटकारासह ४१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
चहापानानंतर फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीवर टिकू दिले नाही. बुमराह, महंमद सिराज आणि नवोदित हर्षित राणा यांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा कोणताच फलंदाज फार काळ तग धरू शकला नाही. खेळ थांबला, तेव्हा अलेक्स केरी १९, तर मिचेल स्टार्क ६ धावांवर खेळत होते. भारतातर्फे बुमराहने ४, सिराजने २ आणि राणाने एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : भारत – पहिला डाव ४९.४ षटकांत सर्वबाद १५० (नितीश कुमार रेड्डी ४१, रिषभ पंत ३७, लोकेश राहुल २६, जोश हेझलवूड ४-२९, मिचेल स्टार्क २-१४) विरुद्ध ऑस्ट्रेलिया – पहिला डाव २७ षटकांत ७ बाद ६७ (अलेक्स कॅरी खेळत आहे १९, ट्रॅव्हिस हेड ११, नॅथन मॅकस्विनी १०, जसप्रीत बुमराह ४-१७, महंमद सिराज २-१७).
विक्रम-पराक्रम
- ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यात आलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी १७ विकेट्स पडण्याची ही १९५२ पासूनची पहिलीच वेळ ठरली.
- भारताची १५० ही धावसंख्या ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील संघाच्या पहिल्या डावातील सर्वांत कमी धावसंख्येशी बरोबरी करणारी ठरली. यापूर्वी २००० साली सिडनी कसोटीमध्ये भारताचा पहिला डाव १५० धावांत संपुष्टात आला होता.
- डावामध्ये सर्वाधिक धावा करणारा नितीश कुमार रेड्डी हा आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावरील भारताचा सहावा फलंदाज ठरला. यापूर्वी, एल. अमर सिंग, दत्तू फडकर, सी. डी. गोपीनाथ, बलविंदर संधू आणि स्टुअर्ट बिन्नी या भारतीय फलंदाजांनी ८ ते ११ या स्थानावर फलंदाजीस येऊन डावांत सर्वाधिक धावा केल्या होत्या. फडकरांनी अशी कामगिरी दोनवेळा केली होती.
- मायदेशात ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या पाच विकेट्स ४० धावांच्या आत पडण्याची १९८० पासूनची ही केवळ दुसरी वेळ ठरली. यापूर्वी २०१७ मध्ये होबार्ट कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १७ अशी झाली होती.