काबूल : पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पाक्तिका प्रांतामध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्यामध्ये प्रामुख्याने महिला व लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यांनी दिली. (Pakistan Strikes)
पाकच्या सीमेजवळ असणाऱ्या पाक्तिका प्रांतातील बरमाल जिल्ह्यामधील चार ठिकाणी पाकने बॉम्बहल्ले केले. यामध्ये सहाजण जखमी झाल्याचेही तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्यांचा निषेध केला असून हे हल्ले रानटी असल्याचे म्हटले आहे. “या भ्याड हल्ल्यांचे प्रत्युत्तर दिल्ल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मात्र, त्याचवेळी आमच्या प्रदेशाचे आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण करणे हा आमचा अधिकार आहे,” असेही संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे. हे हवाई हल्ले दोन ते तीन तास सुरू असल्याचे बरमालचे स्थानिक रहिवासी मलील यांनी सांगितले. (Pakistan Strikes)
पाकने या वर्षी मार्च महिन्यातही अशाप्रकारचे हल्ले केले होते. त्या हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानमधील आठजणांना प्राण गमवावे लागले होते. तालिबानने २०२१ मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून या दोन देशांमध्ये तणाव आहे. पाकच्या भूमीवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकने अफगाणिस्तानला जबाबदार धरले आहे. तालिबानने मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. बुधवारी केलेल्या हल्ल्यांबाबत पाककडून अद्याप कोणतेही औपचारिक विधान करण्यात आलेले नाही. (Pakistan Strikes)
हेही वाचा :