ढाका : वृत्तसंस्था : बांगला देशातील सत्ताबदलानंतर देशाच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणातही बदल होताना दिसत आहेत. कराचीहून एक मालवाहू जहाज चट्टोग्रामला पोहोचले आहे. अनेक वर्षांनंतर पाकिस्तान आणि बांगला देशात व्यापार-उदीम सुरू होत आहे. त्यातून भारताला शह देण्याचा प्रयत्न आहे.
शेख हसीना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर बांगला देशच्या परराष्ट्र आणि व्यापार धोरणात मोठे बदल होतील, असे मानले जात होते. दोन्ही देशांमधील ऐतिहासिकदृष्ट्या तणावपूर्ण संबंधांमध्ये बदल म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते, असा दावाही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये १९७१ च्या युद्धाची छाया महत्त्वाची भूमिका बजावत होती. १९७१ च्या नऊ महिन्यांच्या मुक्ती संग्रामात पाकिस्तानी लष्कराने बांगला देशातील जनतेवर अगणित अत्याचार केले. सुमारे ३० लाख लोक मारले गेले. हजारो लोकांवर अत्याचार झाले. महिलांवर बलात्कार झाले आणि लाखो लोक घर सोडून पळून गेले. या जुन्या आठवणी आजपर्यंत दोन्ही देशांच्या संबंधांवर प्रभाव टाकत होत्या. या अत्याचारांबद्दल पाकिस्तानकडून कधीही खेद किंवा माफी मागितली गेली नाही. उलट १९७१ च्या बांगला देश घटनेसाठी पाकिस्तानने नेहमीच भारताला जबाबदार धरले.
पाकिस्तानचा आरोप आहे, की बांगला देशात कोणतेही अत्याचार झाले नाहीत; पण हे सर्व भारताने प्रायोजित केले होते. त्याचा उद्देश पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांचा प्रकल्प अयशस्वी करणे हा होता. पाकिस्तानी लष्कर आपल्या देशातील जनतेमध्ये भारताला आपला शत्रू बनवून देशाच्या राजकारणात स्वत:साठी महत्त्वाचे स्थान मिळवते. याची मदत घेऊन पाकिस्तानी लष्कराने बांगला देशात झालेल्या अत्याचारांबद्दल कधीही माफी मागितलेली नाही. बांगला देशातील मुक्तिसंग्राम हा अलीकडच्या काळापर्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. बांगलादेशात शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तान आणि बांगला देश यांच्यातील संबंध खूपच खराब राहिले. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या अत्याचाराच्या प्रकरणात न्याय मिळाला नाही, असे बांगला देश म्हणत आहे. त्यांच्या राजवटीत देशद्रोही किंवा रझाकारांना युद्ध गुन्हेगार म्हणून संबोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
शेख हसीना यांचा कार्यकाळ १९९६-२००१ आणि २००९-२०२४ असा होता. हसीना यांनी २०१० मध्ये युद्ध गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाची स्थापना केली. एवढेच नाही तर हसीना यांनी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या ‘जमात-ए-इस्लामी’वरही बंदी घातली होती. २०१३ मध्ये ‘जमात’चा नेता अब्दुल कादिर मुल्लाला ३४४ लोकांच्या हत्येसाठी आणि युद्ध गुन्ह्यांसाठी ‘आयसीटी’ने दोषी ठरवले होते. हसीना यांच्या राजवटीत फाशी देण्यात आलेला तो पहिला रझाकार होता. त्याच्या फाशीवर पाकिस्तानचे तत्कालीन गृहमंत्री निसार अली खान चौधरी यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानशी असलेल्या निष्ठेमुळेच त्यांना फाशी देण्यात आल्याचे चौधरी म्हणाले होते. बांगला देशमध्ये अब्दुल कादिर मुल्लाला फाशी दिल्याने हसीनाला पाकिस्तानच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तानच्या ‘नॅशनल असेंब्ली’ने मुल्लाच्या फाशीला विरोध करणारा ठराव मंजूर केला. पाकिस्तानला बांगला देशचे स्वातंत्र्य अजून पचवता आलेले नाही, असे म्हणणाऱ्या हसीनाकडून याचे उत्तर आले. बांगला देशमध्ये पाकिस्तानचे अनेक मित्र असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताशी चांगले संबंध त्याचबरोबर हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध खूप सुधारले आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यात भारताने घेतलेल्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले; परंतु आता बांगला देशात सरकार बदलल्यानंतर पाकिस्तान पुन्हा बांगला देशाच्या जवळ जात आहे. बांगला देशात भारतविरोधी विचारसरणी वाढत आहे. काही काळापूर्वी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावर स्थानिक लोकांनी हल्ला केला. बांगला देशात एक असा वर्ग आहे, जो १९७१ च्या घटनेला विरोध करतो. ते १९७१ ला बांगलादेश आणि बंगाली राष्ट्रवादाचा विजय मानत नाहीत. १९७१ मध्ये फाळणीनंतर अशा प्रकारचे लोक जन्माला आले. झिया उल हक यांच्या काळात पाकिस्तान आणि बांगला देशातील संबंध चांगले झाले होते. आता युनूस मोहंमद यांच्या काळात पुन्हा एकदा पाकिस्तानने बांगला देशाशी हातमिळवणी केली आहे.
भारताबरोबरचे शत्रुत्व वाढणार
बांगला देशाच्या राजधानीत भारतविरोधी विचार असलेल्या लोकांचा वाढता प्रभाव पाहून आगामी काळात बांगला देशचे भारताविषयीचे शत्रुत्व आणखी वाढेल आणि त्याचवेळी पाकिस्तानसोबतचे संबंध आणखी सुधारतील, असा अंदाज आहे.