सॅन फ्रान्सिस्को : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रतिभावंत आणि प्रयोगशील कलावंत, तबला नवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांचे उपचारादरम्यान येथील रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. (Zakir Hussain)
झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी ‘आयसीयू’मध्ये दाखल केले होते. इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे उद्भवलेल्या गुंतागुंतांमुळे हुसेन यांचा मृत्यू झाला, असे त्याच्या कुटुंबीयांनी सोमवारी (दि. १६ डिसेंबर) सांगितले. (Zakir Hussain)
आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत हुसेन आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कार्यक्रमांत आपल्या जादुई बोटांची कमाल दाखवली. अनेक नामांकित भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते. परंतु इंग्लिश गिटारवादक जॉन मॅक्लॉफ्लिन, व्हायोलिन वादक एल. शंकर आणि तालवादक टी.एच. ‘विक्कू’ विनायकराम यांच्यासमवेत त्यांनी महत्त्वाचा संगीत प्रकल्प केला होता. भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझचे ते फ्युजन होते. मात्र त्याकडे संगीतक्षेत्राचे दुर्लक्ष झाले आहे. (Zakir Hussain)
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतुलनीय संगीत योगदानाबद्दल हुसैन यांना चार ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये या वर्षीच्या ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातील तीन पुरस्कारांचा समावेश आहे. (Zakir Hussain)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अस्सल प्रतिभावंत गमावला, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रांत जगात क्रांती घडवणारा अस्सल प्रतिभावंत म्हणून ते स्मरणात राहतील. आपल्या अप्रतिम तालाने लाखो संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांनी तबला जागतिक स्तरावर नेला. या माध्यमातून त्यांनी भारतीय शास्त्रीय परंपरांचे जागतिक संगीताशी नाते जोडले. त्यामुळे ते सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक बनले. त्यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मोदी यांनी म्हटले आहे.(jhakir hussain)
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने सबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले. तीन पिढ्यांसोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले. तबला क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली. तबलानवाज पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन आणि तबला हे अद्वैत होते. हे अद्वैत आता भंगले आहे. जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडलात उभे केलेल्या अनेक अद्भुत मैफिली यापुढे तालयोगी तबलानवाझ उस्ताद झाकिर हुसेन यांच्याविना सुन्यासुन्या वाटत राहतील, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
झाकीर हुसेन यांचे मूळ नाव झाकीर अल्ला रक्खा कुरेशी. त्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. तबला विशारद अल्ला रक्खा कुरेशी हे त्यांचे वडील. माहीम येथील सेंट मायकल हायस्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबईच्याच सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. प्रसिद्ध तालवादक तौफिक कुरेशी आणि तबलावादक फजल कुरेशी हे त्यांचे बंधू होत.
हुसेन यांनी त्यांच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या, कथ्थक नृत्यांगना अँटोनिया मिनेकोला यांच्याशी त्यांनी लग्न केले. त्यांना अनिसा आणि इसाबेला अशा दोन मुली आहेत. अनिसा यूसीएलएमधून पदवीधर झाल्या असून एक फिल्म मेकर आहेत. तर इसाबेला मॅनहॅटनमध्ये नृत्य अभ्यासक आहे.
आंतरराष्ट्रीय सन्मान
हुसेन यांची तबल्यावरील हुकूमत, बोटांमधील जादुई चपळाई आणि सर्जनशीलतेने जगभरातील विविध संस्कृतीतील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. भारतीय तबला वादक, संगीतकार, तालवादक, संगीत निर्माता अशी त्यांची ओळख आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर पोहोचवण्यात त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.
पारंपरिक वाद्य कलाकार आणि संगीतकारांना दिला जाणारी ‘युनायटेड स्टेट्स नॅशनल एन्डॉवमेंट फॉर आर्ट्स नॅशनल हेरिटेज फेलोशिप’ हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला आहे. १९९० मध्ये भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि २०१८ मध्ये रत्ना सदस्य पुरस्कारानेही त्यांनी सन्मानित करण्यात आले. शिवाय चार ग्रॅमी अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत.
‘पद्म’ने सन्मान
प्रिन्सटन युनिव्हर्सिटीच्या ह्युमॅनिटीज कौन्सिलने त्यांना ओल्ड डोमिनियन फेलो म्हणून नियुक्त केले होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात ते व्हिजिटिंग प्रोफेसरही होते. मुंबई विद्यापीठाने संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ लॉ पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान केला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्भूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित केले आहे.
हेही वाचा :