नवी दिल्ली : पाटण्यात भरदिवसा भयंकर घटना घडली. तेथील पारस रुग्णालयात भरदिवसा एका रुग्णावर गोळीबार करण्यात आला. चार गुंड पिस्तूलसह रूग्णालयात घुसले. त्यांनी एका खोलीचा दरवाजा उघडला, अंदाधुंद गोळीबार केला आणि ते पळून गेल्याचे सीसीटी फुटेजमध्ये दिसते. (Firing in hospital)
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, तो काँग्रेस पक्षानेही शेअर केला आहे. भाजप आणि नितीश कुमार यांच्या जदयु नेतृत्वाखालील सरकारच्या काळात बिहारमध्ये अराजक माजल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
हे सरकार ‘गुंडशाही’ ला राजरोस परवानगी देते, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. फुटेजमध्ये चार जण शांतपणे रुग्णालयाच्या कॉरिडॉरमधून येतात. एका खोलीचा दरवाजा उघडून एका रुग्णावर अंदाधुंद गोळ्या झाडतात आणि नंतर पळून जाताना दिसत आहेत. (Firing in hospital)
पाटणा पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला. ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला तो चंदन मिश्रा नावाचा आरोपी बेउर तुरुंगात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. वैद्यकीय पॅरोलवर तो रुग्णालयात होता. त्याला आयसीयूमध्ये गोळी मारण्यात आली. यात तो जखमी झाला. ‘‘घटनेतील मृत हा रुग्णालयात उपचारासाठी आला असताना ही घटना घडली. तो पॅरोलवर होता,’’ असे पाटणा सेंट्रल एसपी दीक्षा यांनी सांगितले. ‘‘पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते,’’ असे ते म्हणाले. (Firing in hospital)
काँग्रेसने व्हिडिओ शेअर करताना बिहारमधील अराजकतेला नितीश सरकारवर कारणीभूत आहे, असे म्हटले आहे. बिहारमध्ये गेल्या १७ दिवसांत ४६ खून झाले आहेत. आता, राजधानी पाटण्याच्या पारस रुग्णालयात गुन्हेगार शस्त्रांसह घुसले आणि गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली, असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.