मुंबई, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहीरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय करणावर व पाच वर्षांत काय करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. महिलांना वर्षाला पाचशे रुपयांतद ६ सिलेंडर देण्याबरोबरच महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणण्याची ग्वाही देण्यात आली आहे. ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज, नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर, सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरल्या जातील, एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल, सरकारी नोकऱ्यांतील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुशेष भरून काढणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेणार आदी आश्वासने महाराष्ट्रनामा मध्ये देण्यात आली आहेत.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवू, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे सरकार स्थापन करुन २०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प या जाहीरनाम्यातून केला आहे.
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक मुंबईकडे आर्थिकदृष्या, रोजगारासाठी, उत्पादन, गुंतवणुकीच्या दृष्टीने अपेक्षेने पहातात. देशभरातून लोक मुंबईत स्वप्न घेऊन येतात व मुंबई त्यांना सामावून घेते, त्यांच्या स्वप्नांचा बळ देते. सामाजिक बदलातही महाराष्ट्र आघाडीवर असतो. महाराष्ट्राची निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे. भाजप युतीचे खोके सरकार सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचे आणण्याचे आवाहनही खर्गे यांनी केले.
खर्गे पुढे म्हणाले, कर्नाटकात काँग्रेस सरकार महिलांना महालक्ष्मी योजनेतून दोन हजार रुपये देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची खिल्ली उडवली आणि आता त्यांचेच सरकार महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतून १५०० रुपये देत आहे. काँग्रेसच्या योजनेची नक्कल भाजपने केली आहे. राहुल गांधी यांनी संविधानाचे लाल रंगाचे पुस्तक दाखवले तर त्याला शहरी नक्षलवाद म्हणून टीका करत आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे संविधान दिल्याचा फोटो दाखवून खर्गे यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या टीकेतील हवा काढून घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजप युती सरकारला दीड वर्षात शेतकऱ्यांची आठवण आली नाही पण आता कर्जमाफी करण्याच्या वल्गणा करु लागले आहेत. पराभव दिसत असल्याने त्यांना महागाई, बेरोजगारी, महिला, शेतकरी यांची आठवण झाली आहे. भाजप युती सरकार खाली खेचण्याची वेळ आली असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने परिवर्तन करण्याचा मानस बनवला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र कधी कोणाचा गुलाम बनला नाही व बनणार नाही हा जाहीरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ म्हणणारे नरेंद्र मोदी जोपर्यत महाराष्ट्रात येत राहतील तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ, राहील. जाहिरनामा समितीच्या सदस्य खा. वंदना चव्हाण यांनी मविआच्या जाहिरनाम्याबद्दलची सविस्तर माहिती दिली. तर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, खासदार अभिषेक मनु सिंघवी, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.