कोल्हापूरच प्रतिनिधी : शारदीय नवरात्र उत्सव दशमी दिवशी श्री अंबाबाईची रथातील पूजा बांधण्यात आली. नवरात्र झाले. घट उठले. आदिशक्ती सगळ्या सीमांचे उल्लंघन करून नव्या दिग्विजयाची प्रेरणा देण्याकरिता रथात बसून निघाली, असा भाव व्यक्त करण्यासाठी खास सजलेली ही आजची पूजा. ही पूजा माधव मुनिश्वर, मकरंद मुनिश्वर, रवी माईणकर, सोहम दिलीप मुनिश्वर यांनी बांधली. (Navratri Ustav 2024)
Navratri Ustav 2024
कोल्हापूर; प्रतिनिधी : करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक दररोज दर्शनासाठी हजेरी लावत आहेत.मात्र, पावसाच्या शक्यतेने भाविकांची संख्या घटू लागली आहे. भाविकांची संख्या कमी राहिल्याने मुख्य दर्शनरांग व मुख दर्शनाच्या रांगा अपवाद वगळता रिकाम्या राहिल्या.काल दिवसभरात ७४ हजार ९५३ भाविकांची देवीचे दर्शन घेतले. (Navratri Ustav 2024)
आज आश्विन शुद्ध अष्टमी. शारदीय नवरात्र उत्सव नवव्या दिवशी महिषासुर मर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली आहे. तंत्रात ‘महारात्री म्हणून ओळखली जाणारी ही तिथी. आजच्याच दिवशी जगदंबा आदिशक्ती विराट रूप धारण करून महिषासुराचा वध करती झाली. त्रिलोकला त्रास देणारा असुर या तिथीला संपला पण त्याही पेक्षा ५१ शक्तिपीठांचा यादीत करवीरसाठी करवीरे महिष मर्दिनी असा येणारा उल्लेख सार्थ करणारी आजची ही महातिथीची पूजा. आज महिषासूर मर्दिनी पूजा श्री पूजक माधव मुनीश्वर,मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : आज शारदीय नवरात्र महोत्सवाची सप्तमी तिथी आठवा दिवस आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई वाघावर विराजमान दुर्गेच्या रूपात सजली आहे. वाघावर ती स्वार झालेले दुर्गेचे हे अष्टभुजा रूप उत्तर भारतात विशेष प्रसिद्ध आहे वरद कमळ तलवार चक्र शंख गदा धनुष्य आणि त्रिशूल धारण करणारी अशी ही जगदंबा दुर्गमासुराचा संहार करण्यासाठी प्रगट झाली अशी ख्याती आहे. शाकंभरीच्या अवतारातच जगत पोषणाचे काम झाल्यानंतर उन्मत्त झालेल्या दुर्गमासुराचा वध केल्यामुळे देवीला दुर्गा हे नाव प्राप्त झाले असे मानले जाते. दुर्गा सप्तशती या ग्रंथात देवीने आपल्या भविष्यात्मक अवताराचे वर्णन करताना आपल्या या रूपाचे वर्णन केले आहे अशी दुर्गा चार सहा आठ दहा बारा सोळा अठरा हातांची देखील दाखवली जाते. आज करवीर निवासिनी अष्टभुजा रूपामध्ये सजली आहे.दुर्गा म्हणजे कठीणातल्या कठीण संकटाचेही निवारण करणारी देवता आपल्या सर्वांच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत हीच देवीच्या या अष्टभुजा रूपाकडे प्रार्थना. (Navratri Ustav 2024)
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः
‘दुर्गा’ म्हणजे देवीचे नाव एवढीच माहिती आपल्याला असते. परंतु दुर्गाशब्दाची व्याख्या अत्यंत व्यापक आहे. सर्वश्रेष्ठ निर्गुण परब्रम्हाच्या शक्तीचे माया रुपाचे सर्वप्रथम स्वरूप म्हणजे ‘दुर्गा’ होय. सर्व देवतांचे कार्यकारण अवतार. जिच्या इच्छेने, जिच्या पासून निर्माण झाले, जिच्या प्रभावाने जिच्या ठिकाणी राहिले. जिच्या स्वरूपात लय पावून अथवा जिच्या ठिकाणी राहून सन्मान पावत आहेत. तिच महामाया आदिशक्ती दुर्गा होय.दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाच्या ११ व्या अध्यायात वर्णन केल्या प्रमाणे… मी दुर्गम नावाच्या महा पराक्रमी दैत्याचा वध केल्यामुळे माझे दुर्गा हे नाव प्रसिद्ध पावेल. दुःख, दारिद्रय आणि भय हरण करणारी, दुर्गम पिडेचा नाश करणारी याप्रमाणे श्रीदुर्गा देवी स्तुती केलेली आहे.ह्याच दुर्गेने विविध कारणांनी जे अवतार धारण केले ते नवदुर्गा म्हणून प्रसिद्ध आहेत. ही अष्टभुजा असून वाद्यावर बसलेली आहे.ही पुजा विद्याधर मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यांनी बांधली.
कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी अंबाबाईची महाप्रत्यांगिरा देवी रुपात पूजा बांधण्यात आली. अथर्व वेदामध्ये या देवतेचा उल्लेख आहे. आपण केलेल्या कोणत्याही कार्याची विपरीत फळे मिळत असतील किंवा आपल्यावर केलेले अभिचार (करणी) कर्माचा निरास करण्यासाठी, पिशाच्चबाधा, शत्रूबाधा दूर करण्यासाठी तसेच अपयश, नैराश्य, नष्ट करून कीर्ती, वैभव पुनः प्राप्त करण्यासाठी महाप्रत्यांगिरा देवीची उपासना ही शीघ्र फलदायी आहे. (Navratri Ustav 2024)
आपल्या उपासकावर कोणीही षट्कर्म, करणी केल्यास स्वतः देवी प्रत्यागिरा त्या बाधेचे निवारण करून प्रतीपक्षी दुष्रास नष्ट करते. काळ्या जादूपासून देवी तिच्या भक्ताना सुरक्षा देते. ही कर्म भोगात बदल करणारी सामर्थ्यवान देवता आहे. होला नारसिंही असे पण म्हणतात. ही चतुर्भुज असून मुख सिंहाचे (नासिंहा सारखे) आहे. ही पूजा श्रीपूजक विद्याधर मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, सचिन गोटखिंडीकर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत त्र्यंबोली मंदिर परिसरात आज (दि.८) ललित पंचमीचा (कोहळा पंचमी) सोहळा उत्साहात पार पडला. (Navratri Ustav 2024)
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली. त्यानंतर अंबाबाईचा पालखी सोहळा त्र्यंबोली भेटीसाठी निघाला. मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी होते. माजी खा. संभाजीराजे, मालोजीराजे, यशराजे हे करवीर घराण्यातील सदस्य या सोहळ्यासाठी उपस्थित होता. कोहळा फोडण्याचा मान सागरिका गुरव या कुमारिकेला मिळाला. तिच्या हस्ते त्रिशूळाने कोहळा फोडला. त्यानंतर त्र्यंबोली व अंबाबाईची भेट घडवण्यात आली. पंचोपचार पूजा, आरती, आहेराची देवघेव झाली. त्यानंतर सर्व पालख्या परतीच्या मार्गाला लागल्या. त्र्यंबोली देवीची सिंहासनरुढ रूपात पूजा संतोष गुरव, योगराज गुरव, शार्विल गुरव यांनी बांधली. (Navratri Ustav 2024)
काय आहे अख्यायिका?
शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमी या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी भालदार, चोपदार, सेवेकरी आणि श्रीपूजकांच्या शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते. अंबाबाईने कोल्लासुराचा नाश केल्यानंतर त्याच्या पत्नीने कामाक्ष नावाच्या पुत्राला जन्म दिला. आपल्या पित्याचा आणि दैत्यकुळाचा अंबाबाईने व देवतांनी नाश केला याचा त्याला राग होता. देवतांवर विजय मिळवण्यासाठी त्याने कपिल महामुनींकडून योगदंड मिळवला. हा योगदंड कोणावरुनवही फिरवला असता त्याचे प्राणिरुप होईल आणि जमिनीवर ठेवताच याचे सामर्थ्य नष्ट होई. हा योगदंड घेऊन कामाक्ष मुक्तिमंडपात आला. येथे देवगणांसह अंबाबाई कोल्हासुर वधाचे कुष्मांडभेदन करीत होती. एकाच ठिकाणी असलेल्या देवगणांचे कामाक्षाने शेळ्यामेंढ्यात रुपांतर केले. तेव्हा त्र्यंबोली देवीने वृद्धेचे रुप घेऊन कामाक्षाकडून योगदंड हिसकावून घेतला. त्याचा वध केला. तिचे हे देवलोकावर ऋण होते. मात्र असुरवधानंतर करण्यात आलेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले. त्यामुळे ती रुसून शहराबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसली. ते लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी गेली. तिच्या इच्छेनुसार टेकडीवर कुष्मांडभेदन (कोहळा) करून दाखवले. ही या पूजेमागील आख्यायिका आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी (ललित पंचमी) करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ अंबाबाई रुपात पूजा बांधण्यात आली.श्री त्र्यंबोली पंचमी- कोलासुर पुत्र कामाक्ष अत्यंत उग्र व पराक्रमी पुत्र होता. देवताकडून त्याचा पराभव झाल्यानंतर निराश होऊन तो दैत्यगुरु शुक्राचार्याकडे गेला व त्यांच्या आज्ञेने कपिलाश्रमात कपिलमहामुनींची सेवा करुन, त्यांच्याकडून योगदंड मिळविला. हा योगदंड कोणावरूनही फिरविला असता, तो प्राणिरूप होई. मात्र जमिनीवर ठेवताच याचे सामर्थ्य तत्क्षणी नष्ट होई. (Navratri Ustav 2024)
हा योगदंड घेऊन कामाक्ष मुक्तिमंडपात आला, येथे देवगणांसहित जगदंबा कोल्हासुर वधोत्सवाचे कूष्मांडभेदन करीत होती, एकाच ठिकाणी असलेल्या देवगणांवरुन कामाक्षाने योगदंड फिरविला, यामुळे सर्व देवांचे शेळ्या मेंढ्यात रुपांतर झाले. तेव्हा त्र्यंबोलीने वृद्धस्त्रीचे रूप घेऊन, मायेने कामानाकडून योगदंड हिसकावुन घेऊन, त्याचा वध केला. या योगदंडाच्या शक्तीने सर्वदेवांस पूर्ववत् केले. हे तिचे देवलोकांवर मोठे ऋण होते. (Navratri Ustav 2024)
कोल्लासुरवधासाठी त्र्यंबुलीने देवीस प्रचंड साहाय्य केले असूनही, विजयोत्सवात तिला बोलाविण्याचे राहून गेले, याचा त्र्यंबुलीला राग आला व ती रागाने करवीराबाहेर एका टेकडीवर जाऊन बसली. ही गोष्ट जगदंबेच्या ध्यानात येताच, तिने त्र्यंबुलीस दासीकरवी निरोप धाडला. अखेर त्र्यंबुलीच्या रागाचे परिमार्जन करण्यासाठी जगदंबा स्वतः तिच्या भेटीस गेली आणि कोल्लासुरवधाचा विजयोत्सव (कोहाळा छेदन) त्र्यंबुलीसमोरच साजरा केला, यानंतर,’ अश्विनशुद्ध पंचमीस (त्र्यंबुलीपंचमी) जे भक्त तुझ्या दर्शनास येतील, त्यांनाच करवीरवासफल लाभेल. करवीरात कोणतेही विधि, यात्रा करणाऱ्या भाविकानी आदि- मध्य व कर्मसमाप्तीवेळी तुझे दर्शन घेतले नाही, तर त्याची उपासना व तीर्थविधी सिद्धी पावणार नाही.’ असा जगदंबेने त्र्यंबुलीला वर दिला. करवीरक्षेत्रात त्र्यंबुलीचे माहात्म्य थोर आहे.ही पूजा श्रीपूजक मयुर मुकुंद मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यांनी बांधली.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : आज (दि.७) अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच शारदीय नवरात्रातील पाचवा दिवस. आजच्या दिवशी श्री अंबाबाईची श्री सरस्वती देवी रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली आहे. श्री सरस्वती ही सत्वगुणप्रधान देवी आहे. ती ज्ञान, बुद्धी, वाचा, विद्या, कला, संगीत, शिक्षण यांची अधिष्ठात्री देवता आहे. ऋग्वेदामध्ये सरस्वती मातेस अनेक स्तोत्रे समर्पित केली आहेत. (Navratri Ustav 2024)
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
याप्रमाणे हा श्री सरस्वती देवीचे ध्यान, स्तुती तसेच प्रार्थनेचा सुप्रसिद्ध श्लोक आहे. याचा अर्थ, जी कुंदपुष्प, चंद्र आणि हिमाच्या मोत्यांच्या हाराप्रमाणे शुभ आहे, जिने शुभ्रवस्त्र परिधान केले आहे, जिच्या हातांत श्रेष्ठ अशी वीणा आहे, जी श्वेत कमलासनावर विराजमान आहे, जी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सदैव वंदनीय आहे, अशी ती संपूर्ण जडता (बुद्धिमांद्य) आणि अंजान यांचा समूळ नाश करणारी देवी सरस्वती माझे रक्षण करो.
चतुर्भुजा सरस्वतीच्या हातांमध्ये अक्षमाला, वीणा व पुस्तक शोभायमान आहेत. श्री सरस्वती देवीचे वाहन हंस आहे. परमपूज्य श्री शंकराचार्यांच्या मठांमध्ये प्रामुख्याने श्री शारदांबेचे पूजन केले जाते. शारदांबा म्हणजे देवी सरस्वतीच होय. श्री सरस्वती देवीची प्रसिद्ध मंदिरे वैष्णोदेवी (काश्मीर), शृंगेरी (कर्नाटक), बासर (तेलंगणा) येथे आहेत. (Navratri Ustav 2024)
धार्मिक पूजेच्या प्रारंभी गणेश, सरस्वती व गुरु यांना वंदन केले जाते. आपल्या प्रासादिक संत वाङ्मयांत संतांनी ग्रंथारंभी गणेश, शारदा, सद्गुरू यांचे स्मरण-वंदन केले आहे. भारतामध्ये विद्यालयांमधून बालवयात विद्यारंभी श्री सरस्वतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. श्री सरस्वती देवी सर्वांना जान व सदबुद्धी देवो, हीच तिच्या चरणी प्रार्थना !
ही पूजा विद्याधर मुनिश्वर, मयूर मुनिश्वर आणि अरुण मुनिश्वर यांनी बांधली.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : सलग दोन दिवसाच्या सुट्ट्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला राज्यभरातून भाविकांचा मोठा ओघ वाढल्याने मंदिर परिसराला महापुराचे स्वरुप प्राप्त झाले होते. सायंकाळी सातपर्यंत पावणे तीन लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मतदारसंघातील भाविकांच्या जथ्थ्यांनी मंदिर परिसर फुलुन गेला होता. धारशिव, बीड, नासिक, पुणे, बारामती, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी भाविकांना अंबाबाईचे दर्शन घडवत प्रचाराची नांदी दिल्याचे चित्र पहायला मिळाले. (Navratri Ustav 2024)
शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला रविवारी पहाटे चार वाजल्यापासून मंदिर भाविकांनी फुलुन गेले. सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने सकाळपासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भाविकांचे जथ्थे दिसू लागले. अंबाबाई मंदिरात जाण्यासाठी असलेलेली मुख्य दर्शन रांगेत सकाळपासून गर्दी होती. पूर्व दरवाजाजवळील दर्शन मंडप पूर्ण भरला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी संघातील दर्शन रांगेचा हॉल हाऊसफुल्ल झाल्यावर भाविकांची दर्शन रांग भवानी मंडप, नगारखाना, वसंत मेडिकल्स, गुजरी मार्गे शिवाजी चौकात पोहचली होती. तर एरव्ही मुखदर्शनाची गर्दी मंदिराच्या आवारात असते. पण आज मुखदर्शनाची रांग गरुड मंडप, तुळजाभवानी मंदिर, दक्षिण दरवाजा, विद्यापीठ हायस्कूलपासून महालक्ष्मी बँकेपर्यंत पोहचली होती. (Navratri Ustav 2024)
सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे अंबाबाईच्या दर्शनाला गर्दी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मतदारांनी देवदर्शन घडवण्यासाठी जय्यत तयारी केल्याचे पहायला मिळाले. लक्झरी बसेसची संख्या मोठी होती. खानविलकर पेट्रोल पंप शंभरफुटी रस्ता, दसरा चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मैदान, रेणुका मंदिर, हॉकी स्टेडियम, निर्माण चौक, गांधी मैदान, शाहू स्टेडियम, पेटाळा मैदान परिसरात चारचाकी वाहनांचे पार्किंग हाऊसफुल्ल झाले होते. इच्छुक उमेदवारांनी आयोजित केलेल्या दर्शन उपक्रमात महिलांची संख्या लक्षणीय होती. अंबाबाई मंदिर, जोतिबा, बाळूमामा आदमापूर अशा सहलींचे आयोजन केल्याचे पहायला मिळाले. परगांवाहून आलेल्या भाविकांना दिलेल्या बिल्ल्यावर इच्छुक उमेदवारांचे नाव, मतदारसंघ ठळकपणे पहायला मिळाले. दुपारी अर्धा तास जोरदार पावसाची सर आली असतानाही गर्दीवर परिणाम झाला नाही.
हेही वाचा :
नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात पूजा
कोल्हापूर; प्रतिनिधी : योग मार्गातील प्रमुख देवी म्हणून चंद्रलांबा देवीचा उल्लेख पुराण वाङ्मयात आढळतो. ही देवी म्हणजेच महामाया सीतेचाच अवतार आहे. ही देवी भगवान दत्तात्रेयांवर कृपा करणारी आहे. त्यामुळे तिच्या बिरुदावलीत ‘अवधुत कृपावंती’ असे नाव आहे. (Navratri Ustav 2024)
चंद्रलांबा परमेश्वरी देवीची कथा
शेस कन्येपासून इंद्रास सेतूराज नावाचा मुलगा प्राप्त झाला. हा सेतूराज म्हणजे समुद्रनाथ किंवा समुद्रदेव होय. श्री प्रभू राम लंका विजया नंतर अयोध्येत परतल्यानंतर विजयोत्सव साजरा केला गेला. पण समुद्ध नाथाला आमंत्रण दिले नाही. त्यामुळे त्याने अयोध्येत येऊन प्रभुरामचंद्रांचे निर्भित्सना केली. त्यावेळी सीतामाईंनी त्याला शाप दिला की या यःकश्चित भ्रमरांकडून तुझा प्राण जाईल व तुझा अहंकार नष्ट पावेल. पुढे हा समुद्रनाथ इंद्रपोटी व शेषकन्ये पोटी सेतूराज म्हणून जन्मला.
हा सेतूराज पुढे सर्व शास्त्राने पारंगत झाला व त्याने प्रत्यक्ष शंकरास प्रसन्न करून घेतले. व शास्त्राने मरण येणार नाही असा वर प्राप्त केला. साधु, संत, ब्राम्हण, ऋषी, सूती यांना त्रास दिल्यास वर नष्ट होईल असे शंकरांनी सांगितले. पण तो उन्मत झाला. पाप पुण्याचा फरक कळेना. तो भ्रष्ट होऊन वावरू लागला. एकदा अरण्यात फिरत असताना ती नारायण मुनींची पत्नी चंद्रवदनेस पाहून मोहित झाला. ते नसताना तिच्या लोभाने तिचे हरण करण्या प्रवृत्त झाला. नारायण मुनी ना हे यथावकाश कळताच त्यांनी त्यास अविचार पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. नारायण मुनिनें हिमालयात जाऊन हिंगुळा देवीस प्रसन्न करून घेतले व देवी त्यांच्या सोबत निघाली मागे फिरून न पाहण्याची आज्ञा केली. पण त्या ठिकाणी मुनिना आवाज येईना म्हणून त्यांनी मागे फिरून पाहिले. देवीने आता येथेच राहून कार्य करीन असे सांगितले. देवीने एक घट मुनिंना दिला व सेतूराजाच्या प्रांगणात फोडण्याची आज्ञा केली. मुनिनी सेतूराजाच्या प्रांगणात घट फोडले ‘ त्यातून पाच भ्रमर निघाले.
पुढे त्या भ्रमरातून असंख्य भ्रमर निघाले. व राजाचे सर्व सैन्य भ्रमर दंशाने मारले गेले. सेतूराजाच्या अंगाचा दाह झाला. त्याचा दाह शांत करण्यासाठी त्याने भीमा नदीत जीव दिला. व वर सेतू राजाचा शेवट झाला. नारायण मुनिनी देवीस प्रार्थना करून सन्मत्ती या क्षेत्री आणले. व तेथे स्थापना केली. हीच ती चंद्रलांबा देवी. नंतर देवीने- साऱ्या भ्रमराना आज्ञा केली ते सारे पुन्हा पाच भ्रमर झाले. उजव्या पायात तीन व डाव्या पायात दोन भ्रमर गुप्त झाले. श्री क्षेत्र सन्नत्ती भीमा नदीच्या तीरावर असून जिल्हा गुलबर्गा कर्नाटक येथे आहे. हिला हिंगुळांबा किंवा भ्रमरांबा देवी संबोधतात.
ही पूजा श्रीपूजक विद्याधर मुनिश्वर, मयुर मुकुंद मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यानी बांधली.
हेही वाचा :