मुंबई : प्रतिनिधी : भाजप-शिवसेना शिंदे पक्षाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत एक कोटी मतदार घुसवले आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक कोटी घुसखोर शोधण्यास सुरुवात करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अमित शहांनी महाराष्ट्रात घुसखोर शोधावेत
दीपावलीच्या पहिल्या दिवशी खासदार राऊत यांनी भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले, काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत आम्ही घुसखोरांना शोधून काढू असे म्हटले होते. सध्या महाराष्ट्रात एक कोटी घुसखोर मतदार आहेत ते भाजप शिवसेना शिंदे पक्षांच्या लोकांनी घुसवले आहेत. घुसखोरांना शोधून काढू असे म्हणणाऱ्यांनी अमित शहांनी महाराष्ट्रात घुसखोरांना शोधण्यास सुरुवात करावी. मतदार यादीत घोटाळा असल्याने निवडणुका निष्पक्ष होणार नाहीत. त्यामुळे देशाचे लक्ष वेधण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल, असे ते म्हणाले. (One crore infiltrator voters)
भाजप, निवडणूक आयोगात मिलीभगत
लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ४६ लाख मतदार वाढले. ते मतदान एकाच पक्षाला कसे जाऊ शकते असा सवाल खासदार राऊत यांनी केला. मतचोरीचा आरोप होत असताना निवडणूक आयोग उत्तर न देता भाजपचे नेते आहेत. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असेल तर आमच्या शंकांचे निरसन करावे. आमच्या आरोपाचे उत्तर भाजप देत असेल त्यांची मिलीभगत आहे असा आरोपही त्यांनी केला.
उप मुख्यमंत्री शिंदेवर टीका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करताना खासदार राऊत म्हणाले, आज नरकचतुर्दशी असून नरकासुराजा जन्म गुवाहटीला झाला असा टोलाही मारला. ते गुवाहटीला जाऊन पूजा करतात. गुवाहटीला रेड्यांचा बळी देऊन हे सरकार निर्माण झाले असल्याने त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवालही त्यांनी केला. (One crore infiltrator voters)