ढाका : ढाका येथील एका शाळेच्या इमारतीवर सोमवारी (२१ जुलै) बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले. त्यात १९ जणांचा मृत्यू झाला. यात बहुतेक मुलांचा समावेश आहे. अनेकजण जखमी झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Plane crash in Bangla Desh)
ही घटना ढाकाच्या उत्तरा भागात घडली. माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज कॅम्पसमध्ये विमान कोसळले.
हे जेट विमान एफ-७ बीजीआय असल्याचे ओळखले जात होते, जे माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या परिसरात विद्यार्थी कॅम्पसमध्ये उपस्थित असताना कोसळले. विमानाने नियमित प्रशिक्षण मोहिमेसाठी उड्डाण केले होते, परंतु दुपारी १:०६ च्या सुमारास ते कोसळले. (Plane crash in Bangla Desh)
अपघातामुळे परिसरात ज्वाळा आणि धुराचे लोट उठल्याचे दिसत होते. घटनास्थळी भयंकर स्थिती होती. जो तो सैरावैरा धावत होता. घटनास्थळाकडे अनेकांनी धाव घेतल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. शिवाय अग्निशमन दल आणि लष्कराचे बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. (Plane crash in Bangla Desh)
बांगलादेश लष्कराच्या जनसंपर्क कार्यालयाने एका संक्षिप्त निवेदनात हे विमान हवाई दलाचे असल्याचे म्हटले आहे. निवेदनात अपघाताचे कारण किंवा वैमानिक सुरक्षित आहे की नाही याबाबतचा तपशील देण्यात आलेला नाही.
माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, वर्ग सुरू असताना विमान शाळेच्या गेटजवळ कोसळले. विमान कोसळले त्या ठिकाणी एक वर्ग सुरू होता. जखमींना बाहेर काढण्यात येत आहे.
पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे यासंबंधीच्या फुटेजमध्ये दिसून येत आहे.