- विजय चोरमारे
घर असो किंवा संसद भवन, जाहीर सभा असो किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या पेहरावात कधी बदल झाला नाही. पांढ-या रंगाची कॉटनची साडी हाच नेहमीचा पेहराव. कधीतरी त्या पांढ-या साडीला निळ्या किंवा फिकट रंगाची बॉर्डर असते तेवढंच. पायात असते रबरी हवाई चप्पल. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलीच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरं झाली. अगणित संघर्षाचे प्रसंग आले. बंगालमधल्या रस्त्यांपासून संसदेपर्यंत संघर्ष झडला. जसा संघर्ष झडला तसेच सर्वोच्च अधिकारपदाचे ऐश्वर्यही लाभले. परंतु सघर्ष असो की सत्तेचे ऐश्वर्य त्यांचे राहणीमान कधी बदलले नाही. सगळीकडे पांढ-या साडीतली आणि पायात हवाई चप्पल असलेली ही रणरागिणी दिसली. (Mamata Banerjee)
साडेचार दशकांच्या राजकीय प्रवासात ममता बॅनर्जी यांचं हेच एक रूप देशवासीयांच्या नजरेत आहे. वयोमानानुसार त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल होत गेले तेवढेच. तेही पुन्हा चेह-यावरच्या सुरकुत्या आणि केसांच्या रंगापुरतेच. बाकी देहबोली, कार्यशैली आणि कोणत्याही संकटाला भिडण्याची निडर वृत्ती तीच आणि तशीच. त्याचमुळं देशातल्या शक्तिशाली माणसाशी, त्यांच्या विक्राळ सत्ता-संपत्तीशी आणि विषारी फौजेशी त्या एकहाती समर्थपणे मुकाबला करू शकल्या. परंतु संघर्ष फक्त आक्रमकपणे करता येत नाही. त्याला मुत्सद्देगिरीची जोड द्यावी लागते. तडजोड करून काही बेरजा कराव्या लागतात. ममता बॅनर्जी यांचा अहंकार एवढा की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या अहंकाराची बेरीज केली तर त्यांचा अहंकार थोडा वरचढच ठरावा असा. आणि सत्तेच्या राजकारणात अँटिइन्कम्बन्सी असतेच. कम्युनिस्टांनाही ती टाळता आली नाही, कुणालाच टाळता आली नाही. ममता बॅनर्जीही अपवाद ठरणार नव्हत्या. (All India Trinamool Congress)
त्यात पुन्हा त्यांच्याविरोधात दीर्घकाळ धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाची पेरणी झाली होती. एसआयआरच्या माध्यमातून ९२ लाख मतदार वगळण्यात आले होते. केंद्रीय सुरक्षा दल रस्त्यावर उतरवण्यात आले होते. भारतीय जनता पक्ष, केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट अशा सगळ्या यंत्रणांविरुद्ध एकट्या बाईने लढण्याला मर्यादा होत्या. बेरजेचे राजकारण केले असते तर, त्या मर्यादांवरही मात करता आली असती. परंतु अहंकाराने घात केला. लोकशाहीवर विश्वास असलेली प्रत्येक व्यक्ती ममता बॅनर्जी यांच्या लढाईशी भावनिकदृष्ट्या जोडली गेली होती. आपलीच दीदी, मोठी बहीण मोदी-शहांच्या सत्तेशी झुंजतेय असं प्रत्येकाला वाटत होतं आणि लाखो लोक त्यांच्या विजयासाठी प्रार्थना करीत होते. परंतु कशाचाच उपयोग झाला नाही. अखेर बंगालची सत्ता त्यांच्या हातातून निघून गेली. (Mamata Banerjee)
गरिबीतलं बालपण
ममता बॅनर्जी यांचं बालपण तसं सामान्य होतं. कुठल्याही गरीब कुटुंबात असती तशी ओढग्रस्त परिस्थिती होती. लहानपणीच वडिल वारल्यामुळं जबाबदारीचं ओझं आलं होतं. त्यासाठी त्यांनी दूध विकण्याचं काम केलं. राजकारणात प्रवेश करण्याआधी त्यांनी स्टेनोग्राफऱ, प्राथमिक शिक्षिका, सेल्स गर्ल अशी अनेक प्रकारची कामं केली. जगण्यासाठीचा सामान्य माणसांचा संघर्ष त्यांनी जवळून अनुभवला. भविष्यातल्या राजकीय आयुष्यात सामान्य माणसांशी जोडून घेण्यात त्यांना ती शिदोरी उपयोगी पडली. मुख्यमंत्रिपदाची कवचकुंडले लाभल्यानंतरही त्यांनी आपल्यामध्ये आणि सामान्य जनतेमध्ये अंतर पडू दिलं नाही. (Mamata Banerjee)
घटना २०१२ सालातली आहे. केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीएचे सरकार सत्तेवर होते. वर्षभरापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने डाव्यांचा किल्ला उद्ध्वस्त करून पश्चिम बंगालची सत्ता मिळवली होती. केंद्रातल्या सरकारमध्ये तृणमूल काँग्रेसचाही सहभाग होता. परंतु केंद्राच्या आर्थिक सुधारणांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्याची प्रतिक्रिया म्हणून पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनेही ममता सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यासुमारास झालेल्या एका कार्यक्रमात ममता म्हणाल्या होत्या, `माँ, माटी मानुष ही आमच्या लोकशाहीची संपत्ती आहे, मी त्यांच्यासमोर झुकेन. आम्हाला धमकी देण्याचा काही उपयोग होणार नाही,आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो.`
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची बातमी आली होती. त्यावर एका सभेत बोलताना ममता म्हणाल्या होत्या, `या भाजपवाल्यांकडं काही काम नाही. गृहमंत्री सारखे इथंच पडून असतात. बाकी वेळेला चड्ढा, नड्डा, फड्डा, भड्डा, गड्डा इकडंच असतात. त्यांच्याकडं बघायला कुणी नसतं, तेव्हा ते आपल्या कार्यकर्त्यांना नौटंकी करायला लावतात चर्चेत राहतात.`(Mamata Banerjee)
पक्षातले अनेक नेते भाजपमध्ये गेल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या, `काही बदमाश टीएमसी सोडून बीजेपीमध्ये गेले आहेत आणि दंगा करताहेत. हंबाहंबा-रंबारंबा- कांबाकांबा-तुंबातुंबा-बंबाबंबा करत असतात.`
ही स्टाईल खास ममता बॅनर्जी यांची आहे.
कुणाशीही भिडायची त्यांची तयारी असते. ज्या त्वेषानं त्या केंद्रातल्या युपीए सरकारविरोधात भिडत होत्या, त्याहून शतपटीने त्यांचा भाजपविरोधात लढतानाचा जोश असतो. त्यांना त्यांच्याच भाषेत, त्यांच्याच पद्धतीने भिडून नामोहरम करण्याची क्षमता त्यांच्या अंगी बाणवली. किंबहुना मोदी-शहांच्या धटिंगणशाहीला तेवढ्याच समर्थपणे प्रतिकार करण्याची क्षमता असलेल्या देशातील मोजक्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांचं नाव प्राधान्यानं घ्यावं लागतं. अनेक वर्षे केंद्रात मंत्री आणि पंधरा वर्षे पश्चिम बंगालसारख्या राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतरही ममता बॅनर्जी आजही वयाच्या ७१ व्या वर्षी रस्त्यावरच्या लढणा-या कार्यकर्त्या वाटतात. पश्चिम बंगालमधल्या सर्वसामान्य माणसांना आपल्यातल्याच वाटतात, त्याचमुळं त्यांचं दीदी हे संबोधन केवळ राजकीय पातळीवरचं प्रतिकात्मक संबोधन न वाटता, सामान्य बंगाली माणसाच्या काळजातून आलेली हाक वाटते. म्हणूनच तर गेल्या विधानसभेवेळी देशाचे प्रधानमंत्री अत्यंत घाणेरड़्या पद्धतीनं `दीद्दी ओ दीद्दी` अशी हाक मारून लाखोंच्या सभांमध्ये टाळ्या मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते, त्यांना बंगालच्या जनतेने चोख उत्तर दिले होते.
माँ, माटी, मानुष हा ममता बॅनर्जी यांचा व्यक्तिशः आणि त्यांच्या पक्षाचाही मंत्र. `आपलं सरकार माँ, माटी, मानुषचं सरकार आहे. हे तिघे कधी धोका देत नाहीत, विश्वासघात करीत नाहीत. आम्ही खोटं बोलून मतं मागणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो आणि हीच आमच्या काम करण्याची पद्धत आहे. म्हणूनच यावेळी आम्ही आपल्याकडं काही मागण्यासाठी आलो आहोत`, असा ममता बॅनर्जी यांच्या निवडणुकीआधीच्या भाषणाचा सारांश असायचा. आरएसएसच्या गुंडांनी बंगालमध्ये घुसखोरी केली आहे. विद्वेष पसरवणा-या आऱएसएसच्या हिंदू धर्माच्या ब्रँडवर आमचा विश्वास नाही. आम्ही त्यांच्यासमोर कदापि झुकणार नाही,असा निर्धार त्या व्यक्त करायच्या.
ममता बॅनर्जी यांच्या जिद्दीच्या गोष्टी
त्यातली एक आहे रायटर्स बिल्डिंगमधल्या प्रवेशाची.
जुलै १९९३ मध्ये ममता बॅनर्जी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष असतानाच्या एका आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तेरा युवकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी याही जखमी झाल्या होत्या. परंतु या घटनेच्या आधी जानेवारीमध्ये नदिया जिल्ह्यात झालेल्या एका मूकबधीर मुलीवरील बलात्कारप्रकरणी मुख्यमंत्री ज्योती बसू यांना त्या भेटायला गेल्या होत्या. ज्योती बसू यांच्या चेंबरच्या दरवाजाच्या समोरच बैठक मारून त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. राजकीय हितसंबंधांमुळे बलात्कार प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नसल्याचा ममतांचा आरोप होता. त्यावेळी त्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या, तरीही ज्योती बसू यांनी त्यांना भेटण्याचे नाकारले. ज्योती बसू कार्यालयात येण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतसे पोलिस अधिकारी ममतांची मनधरणी करून आंदोलन मागे घेण्यासठी विनंती करू लागले. हरत-हेने प्रयत्न करूनही ममता बधल्या नाहीत. तेव्हा ममता बॅनर्जी आणि त्या बलात्कार पीडितेला महिला पोलिसांनी जिन्यावरून फरफटत खाली नेले आणि तिथून त्यांची रवानगी पोलिस ठाण्यात करण्यात आली. यावेळी ममता बॅनर्जी यांचे कपडे फाटले.
ममता बॅनर्जी यांनी त्याचदिवशी शपथ घेतली, की यापुढं मुख्यमंत्री होऊनच या इमारतीत प्रवेश करेन. तोपर्यंत रायटर्स बिल्डिंगची पायरी चढणार नाही. आणि आपल्या शपथेला जागून ममता बॅनर्जी पुढची अठरा वर्षे रायटर्स बिल्डिंगची पायरी चढल्या नाहीत. २० मे २०११ रोजी मुख्यमंत्री म्हणूनच रायटर्स बिल्डिंगमध्ये पाऊल ठेवले. पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळाल्यानंतरची त्यांची प्रतिक्रियाही खूप बोलकी होती. `माँ, माटी, मानुषचा हा विजय आहे. बंगालच्या लोकांना जल्लोष साजरा करण्याची संधी आहे, परंतु त्याचवेळी ज्या लोकांनी तीन दशके डाव्या राजवटीविरुद्ध संघर्ष करून बलिदान दिले त्यांचीही आठवण ठेवायला हवी.`(Mamata Banerjee)
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील ज्योती बसू सरकारविरोधात खूप संघर्ष केला. ज्योती बसू यांची राजवट, त्यांचे व्यक्तिमत्त्व यासंदर्भात देशभर आदराने बोलले जात असले तरी ज्योतिबाबू विरोधकांबाबत एवढे सहिष्णू नव्हते, हे ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांच्या व्यवहारावरून दिसून येत होते. केंद्रीय राज्यमंत्री असतानाही ते त्यांना भेटायला तयार नव्हते. एवढेच नव्हे, तर सार्वजनिक सभा, समारंभांत ते कधी ममता बॅनर्जी यांचं नावही घेत नव्हते. `ती बाई` असा उल्लेख करायचे. राजकीय विरोधकाबाबतच्या तिरस्काराचा हा एक वेगळाच नमुना होता आणि एका ज्येष्ठ नेत्याकडून ममता बॅनर्जी यांनी त्याचा अनुभव घेतला होता.(Mamata Banerjee)
जायंट किलर म्हणून प्रवेश
ममता बॅनर्जी यांचा संसदीय राजकारणातला प्रवेश जायंट किलर म्हणून झाला होता.१९८४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना त्यांनी जाधवपूर मतदार संघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मातब्बर नेते सोमनाथ चटर्जी यांचा पराभव केला होता. बंगालच्या राजकारणात डाव्यांच्या सत्तेविरुद्ध लढताना अनेकदा ममता बॅनर्जी यांचे आक्रमक रूप बघायला मिळाले. काही जीवघेण्या हल्ल्यातूनही त्या बचावल्या. १६ ऑगस्ट १९९० ला प्रदेश काँग्रेसने बंगाल बंदचे आवाहन केले होते. या आंदोलनावेळी ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्या असताना लालू आलम या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. लालू आलमने ममतांच्या डोक्यात लाठीचा असा जोरदार तडाखा दिला होता, की त्यामुळं त्यांची कवटी सरकली होती. घटना पाहणा-यांच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि आता सारा खेळ संपला, असंच वाटलं होतं. परंतु ममता त्यातून बचावल्या आणि डोक्याला पट्टी बांधून पुन्हा रस्त्यावर उतरल्या. त्यावेळी नंतरही दीर्घकाळ त्यांच्यावर उपचार करावे लागले होते. मारहाणीचे हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर ममतांनी एकदा न्यायालयात हजर राहून आपली साक्ष नोंदवली होती. फेब्रूवारी २०१९मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यानंतर ममतांनी वकिलामार्फत सांगितलं, की या प्रकरणातले अनेक साक्षीदार थकले आहेत, काही निवर्तले आहेत. त्यामुळं खटला पुढं चालवणं योग्य वाटत नाही. ममतांच्या या भूमिकेनंतर लालू आलमची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली.
नॅनो प्रकल्पाविरोधातला लढा
सिंगूरमधला टाटांच्या नॅनो प्रकल्पाविरोधातला लढा हे ममतांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारे आंदोलन ठरले. यादरम्यान त्यांनी २६ दिवसांचे उपोषण केले. त्यांच्यातल्या लढाऊ वृत्तीचे दर्शन देश-विदेशातील जनतेला घडले. टाटांना आपला प्रकल्प पश्चिम बंगालमधून हलवावा लागला. याच आंदोलनाच्या हवेवर स्वार होऊन ममतांनी डाव्यांचा बंगालमधील किल्ला नेस्तनाबूत केला. नंदीग्राममध्ये २०२१च्या निवडणुकीत ममतांचा पराभव झाला, परंतु त्यांची राज्याच्या राजकारणातली सत्तेच्या दिशेने वाटचाल इथूनच सुरू झाली होती. नंदीग्राममध्ये पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या लोकांसाठी ममतांनी केलेला संघर्ष फार जुना नाही.नंदीग्राम हा सुवेंदू अधिकारी यांचा गड आहे आणि इथली ममतांची जी ताकद होती ती त्यांच्या बळावरच होती, याची जाणीव ममतांना होती. त्यामुळं इथली लढाई अवघड आहे हेही माहीत होतं. परंतु नंदीग्राममधून लढण्याची घोषणा करून त्यांनी आपल्याकडं लक्ष वेधून घेतलंच, शिवाय सुवेंदू अधिकारी आणि कंपनी अन्य पन्नासेक मतदारसंघात प्रभाव टाकू शकले असते, त्यांना स्वतःच्या मतदारसंघात अडकवून टाकलं. नंदीग्रामची हरणारी लढाई जाणीवपूर्वक खेळून त्यांनी बंगालची लढाई जिंकली होती, यातून त्यांचे राजकीय कौशल्यही दिसून येते. मोदी आणि त्यांचे चाणक्य नंदीग्राममध्ये ममतांना हरवण्यात अडकून पडले आणि ममतांनी अख्ख्या बंगालमधली त्यांच्या पायाखालची सतरंजी ओढली होती. एका सामान्य लढवय्या महिलेने जे लढे दिले आणि त्याद्वारे जे राजकीय परिवर्तन घडवले, ते कुठल्याही सिनेमाहून कमी रंजक आणि थरारक नाही. ममतांच्या आयुष्याचा सगळा प्रवासच संघर्षमय आणि थरारक आहे. २००४मध्ये लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी एकट्याच निवडून आल्या होत्या. २००९ मध्ये त्यांनी आपली ताकद १९ खासदारांपर्यंत वाढवली आणि देशाच्या राजकारणातही त्या महत्त्वाची भूमिका बजावू लागल्या.
ममता बॅनर्जी यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप केला जातो. भ्रष्ट नेत्यांना संरक्षण दिल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातो. त्याव्यतिरिक्त होणारा आणखी एक आरोप म्हणजे अल्पसंख्यांकांचा अनुनय. परंतु राजकीय विरोधकांकडून होणा-या अशा अनेक आरोपांची पर्वा न करता ममता बॅनर्जी यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. आणि या प्रवासात सामान्य माणसाशी असलेली नाळ तुटणार नाही याची खबरदारी घेतली.(Mamata Banerjee)
कवी, चित्रकार वगैरे…
ममता बॅनर्जी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या केवळ राजकीय नेत्या नाहीत,तर कवी आणि चित्रकारही आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी आपली पेंटिंग्ज विकून लाखोंचा निवडणूक निधी जमा केला होता. परंतु अनेक चिटफंड कंपन्यांनी त्यांची पेंटिग खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांच्या कवितांची आणि कथांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, यावरून त्यांची साहित्यनिष्ठा दिसून येते. आपल्या भाषणातही त्या नेहमी रवींद्रनाथ टागोर, शरद्चंद्र यांच्या साहित्याचे दाखले देतात. सुतपा पाल यांचे ‘दीदीः द अनटोल्ड ममता बनर्जी’ आणि डोला मित्र यांचे ‘डिकोडिंग दीदी’ ही दोन पुस्तके ममता बॅनर्जी यांच्या जीवनावर प्रसिद्ध आहेत.(Mamata Banerjee)
२०२१च्या विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने बंगालमधील हिंदी भाषिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या `मां माटी मानुष` या कवितासंग्रहाच्या हिंदी अनुवादाच्या प्रती हिंदी भाषिकांमध्ये वाटण्यात आल्या. त्याच्या प्रस्तावनेमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपल्या हिंदी प्रेमाविषयी सविस्तर लिहिले आहे. त्यांची एक कविता अशी आहे –
एक मुठ्ठी माटी दे न माँ रे
मेरा आँचल भरकर
मीठापन माटी का सोने से शुद्ध
देखोगे यह जगह जुडकर
थोडासा धन-धान देना माँ
लक्ष्मी को रखूंगी पकड
नई फसल से नवान्न करूंगी
धान-डंठल सरपर रखकर
उद्धटासी उद्धट
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरेत काही नुकसान झाले, तर ते भरून काढण्यासाठी नव्या जागा शोधताना नरेंद्र मोदी-अमित शहा पश्चिम बंगालकडे वळले आणि त्यांनी तिथे विद्वेषाची पेरणी करायला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी एक हिंदु-मुस्लिम दंगल घडवून आणली. परंतु तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. मोठे यश मिळवायचे तर मोठी दंगल व्हायला पाहिजे, अधिक लोक मरायला पाहिजेत तरच फायदा होतो, तो फायदा दीर्घकाळ टिकतो असा त्यांचा गुजरातमधला अनुभव असल्यामुळे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये अधिक लक्ष केंद्रित केले. अमित शहा यांच्या एका सभेनंतर उसळलेला हिंसाचार ही त्याची झलक होती. त्याआधी अमित शहा यांना पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढायची होती. त्याला ममता बॅनर्जी यांनी विरोध केला. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयानेही भाजपच्या मनसुब्यांना साथ दिली नाही. म्हणून मग विद्वेषाची पेरणी करणारे एकेक नग पश्चिम बंगालमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. अमित शहा तर त्यांचे शिरोमणी. त्यांनी योगी आदित्यनाथ यांची सभा ठेवली होती. परंतु ममता बॅनर्जी यांनी त्याच्या हेलिकॉप्टरला परवानगी दिली नाही, त्यामुळे परत जावे लागले. त्यांनी फोनवरून सभेला संबोधित केले. भाजप ज्या विद्वेषाची पेरणी करीत होते, त्याला यश येत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे मोदी-शहा यांचे धाडस वाढले. त्यातूनच कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी सीबीआयचे पथक पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला.
मोदी यांची सभा झाल्यानंतर ४८ तासांच्या आत आणि योगी यांचे हेलिकॉप्टर अडवल्यानंतर दोन तासांत राजीव कुमार यांच्याकडे सीबीआयचे पथक पोहोचले. तिथून खरे नाट्य सुरू झाले. राजीव कुमार हे काही आदर्श आणि स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी नव्हते. शारदा चिटफंड घोटाळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख असताना त्यांनी घातलेला गोंधळ संशयास्पद होता. तीन हजार कोटी रुपयांचा चिटफंड घोटाळा २०१३ मध्ये उघडकीस आला होता. राज्य सरकारने शारदा चिटफंड घोटाळा आणि रोज व्हॅली घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली होती, त्याचे प्रमुख राजीव कुमार होते. नंतर ते कोलकात्याचे पोलिस आयुक्त झाले आणि ममता बॅनर्जी यांचे लाडके अधिकारी बनले. त्यामुळेच त्यांना अटक करून ममता बॅनर्जी यांना घायाळ करण्याची भाजपची योजना होती.
सुप्रीम कोर्टाने २०१४ मध्ये शारदा चिटफंड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणे तपासासाठी सीबीआयकडे सोपवली. या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, मोबाइल फोन राजीव कुमार यांनी सीबीआयकडे दिलीच नसल्याचा सीबीआयचा आरोप होता. वारंवार चौकशीसाठी समन्स पाठवूनही त्यांनी चौकशीसाठी सहकार्य केले नाही. म्हणून सीबीआयची टीम एका रविवारी सायंकाळी राजीव कुमार यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी पोहोचली. परंतु सीबीआय टीमचा वार आणि वेळही चुकली आहे. सीबीआयकडे वॉरंट सोबत नसल्यामुळे कार्यपद्धतीही चुकली. त्यामुळे कोलकाता पोलिस सीबीआय अधिका-यांना घेऊन पोलिस ठाण्यात गेले. ममता बॅनर्जी यानी स्वतः राजीव कुमार यांच्या घरी भेट दिली आणि हा केंद्राचा राज्यावर हल्ला असल्याचा आरोप केला. या घटनेचा आधार घेऊन ममता बॅनर्जी यांनी रातोरात कोलाकात्यात धरणे आंदोलन सुरू करून राजकीय महानाट्य उभे केले होते.(All India Trinamool Congress)
ममतांचा वळणावळणाचा प्रवास
ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ १९७० साली काँग्रेस पक्षाकडून झाला. १९७५ साली त्यांच्या एका कृतीमुळं सगळ्या माध्यमांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं. ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्याविरोधात आंदोलन करताना त्यांच्या कारवर चढून त्या नाचल्या होत्या. तो काळ काही टीव्ही मीडियाचा नव्हता, तरीही ममतांच्या या कृतीला खूप प्रसिद्धी मिळाली आणि स्थानिक महिला काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांना बढती मिळाली. १९७६ ते १९८० पर्यंत त्या या पदावर होत्या. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी जाधवपूर मतदार संघातून सोमनाथ चटर्जी यांचा पराभव केला. १९८४ मध्ये त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस बनल्या. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी लाटेत माकपच्या मालिनी भट्टाचार्य यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. १९९१च्या निवडणुकीत त्या दक्षिण कोलकाता मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या. त्याच ठिकाणाहून त्यांनी १९९६, १९९८, १९९९, २००४ आणि २००९मध्ये विजय मिळवले. पीव्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. १९९९ मध्ये त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारध्ये सामील झाल्या आणि त्यांना रेल्वे मंत्रिपद मिळाले. (All India Trinamool Congress)
सरकारमध्ये असतानाही त्यांची बंडखोर वृत्ती उफाळून येत होती. २००० साली इंधन दरात वाढ झाल्याच्या निषधार्थ त्यांनी आणि अजित पांजा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नंतर तो मागेही घेतला. १९९८ मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणा-या समाजवादी पक्षाच्या एका खासदाराला त्यांनी कॉलरला धरून वेलच्या बाहेर खेचले होते. २००१ मध्ये तहलका नियतकालिकाने स्टिंग ऑपरेशन करून केंद्रसरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली तेव्हा ममता बॅनर्जी सरकारमधून बाहेर पडल्या. २००३ मध्ये त्या पुन्हा सरकारमध्ये सामील झाल्या आणि २००४ची लोकसभा निवडणूक त्यांनी भाजपसोबत युती करून लढवली, त्यामध्ये त्या एकट्याच निवडून आल्या. २००६ ची बंगालमधील निवडणूक ममतांनी एनडीएसोबत लढवली होती. म्हणजे त्यावेळी त्यांनीच भाजपला बोट धरून बंगालमध्ये नेले. तेव्हा ममतांच्या तृणमूलने २५७ आणि भाजपने २९ जागा लढवल्या होत्या. आज त्याच भाजपने ममता बॅनर्जी यांच्या बंगालमधील पंधरा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. ममता बॅनर्जी यांच्या अहंकाराचा कडेलोट झाला आहे. आता तरी त्यांनी काँग्रेस, डाव्यांसह विरोधकांशी जुळवून घेऊन भाजपविरोधात देशपातळीवर एकजुटीने लढण्यासाठी सज्ज व्हायला हवे. अहंकार बाजूला ठेवून पुढे जायला हवे.