-
कुणाल अनिल पाटील
स्वातंत्र्यपूर्व काळात गांधींच्या समकालीन असंख्य समाजसुधारक कार्यरत होते. बाबासाहेबांपासून विनोबांपर्यंत अनेकांनी ज्योती-सावित्रीने सुरु केलेल्या सामाजिक क्रांतीची मशाल आयुष्यभर तेवत ठेवली. परंतु पराकोटीचा द्वेष आणि जीवानिशी संपवून टाकण्याचं “षडयंत्र” २५ जून १९३४ ते ३० जानेवारी १९४८ पर्यंत महात्मा गांधीसाठीच का रचलं गेलं याचं उत्तर थोडं खोलात जाऊन तर्काच्या कसोटीवर सहज मिळून जातं. (Gandhi Murder)
आज तुम्ही एखादी सुधारणावादी, रूढींना डावलणारी समाजमाध्यमांवर एखादी पोस्ट टाका. तुमच्या पोस्ट वर येऊन कोणताही भक्त किंवा अतिरेकी रूढीवादी तोपर्यंत आपली विषारी गरळ ओकणार नाही, जोपर्यंत तुमची पोस्ट व्हायरल होत नाही किंवा लोकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नाही. (Gandhi Murder)
गांधी विचार आणि कृती, या अशाच व्हायरल होत्या.
त्यांचा अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम, आंतरजातीय विवाहाचा टोकाचा पुरस्कार आणि आपल्याच मुलाच्या रूपात त्याची अंमलबजावणी, सामाजिक समतेचा आणि जातीअंताचा कार्यक्रम, हे सगळं इतकं “प्रभावी” होतं, की पुण्यात काही अतिरेकी सनातन्यांनी भर सभेत “या गांधींचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे” अशी घोषणाही केलेली होती.
ज्यांच्यावर अत्याचार होतोय त्यांनी त्याविरुद्ध उठाव करणं हे नैसर्गिक क्रांतीचं प्रतीक आहे. परंतु अत्याचार करणारेच म्हणू लागले की आमचं चुकतंय, आपण हे थांबवायला हवं, तर? अशी क्रांती पिडीतांनी केलेल्या उठावापेक्षाही प्रचंड परिणामकारक असते. (Gandhi Murder)
गांधींचा प्रभाव उच्चवर्णीयांवर
गांधींचे कार्यक्रम, कृती आणि विचारांचा प्रभाव सर्वात जास्त कोणावर झाला असेल तर तो उच्चवर्णीय समाजातील लोकांवर. असंख्य लोकांच्या व्यवहारात आणि आचरणात समता, जातीअंताच्या भावना बळकट होऊ लागल्या. हाच होता तो गांधींचा व्हायरल विचार. हीच होती गांधींची व्हायरल कृती, ज्याने समाजात खोलवर रुतलेल्या रूढींच्या ढाच्याला मुळासकट हलवून टाकले, रुढिवाद्यांच्या अहंकाराला डिवचून काढले.
बरं, या बदलाला आपल्या कृतींनी थोपवायची ताकत कोणत्या रुढिवाद्यात होती? कोणाच्यातच नाही. मग राहता राहिला उपाय कोणता? गांधींचा “बंदोबस्त” करण्याचा? बरं, गांधींना मारून तो तरी सफल झाला का? (Gandhi Murder)
ते सोडा, “एखाद्याला” भडकावून, बळीचा बकरा बनवून, गांधींचा बंदोबस्त करू पाहणाऱ्या षड्यंत्रकारांनी त्या “बंदोबस्ताची” जबाबदारी तरी घ्यायचं धाडस दाखवलं का?
गांधींचा बंदोबस्त
गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून ही लोकं पुनःपुन्हा हेच सिद्ध करतायत, १९४८ ला “बंदोबस्त” करता आला नव्हता, अजूनही झाला नाही, आणि अनंतकाळापर्यंत होणारही नाही!
असो, तुम्ही उडवत रहा गांधींच्या पुतळ्यावर बंदुकीच्या “केपा”,
संपूर्ण “जग” मात्र घालत राहिल गांधीविचारांचा जागर, जागोजागी, घरोघरी, देशोदेशी..!
टेकवत राहतील जगातल्या सर्वात बलाढ्य अशा राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख आपला माथा आमच्या म्हाताऱ्याच्या समाधीवर, आणि तुम्ही मात्र मत्सराने “तोंडातल्या तोंडात” फक्त पुटपुटत राहा, “त्याचा” बंदोबस्त अजून झाला नाही, “त्याचा” बंदोबस्त अजून झाला नाही..
हेही वाचाः
Maharani Tararani : महाराणी ताराराणी हे इतिहासातील सुवर्णपान
Lal Bahaddur Shastri : नेहरुंनी दिला होता शास्त्रींना ब्रेक
Gandhi statue inauguration : बेळगावात महात्मा गांधींचा २५ फुटी पुतळा