मुंबईः राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात शह-काटशहाचा खेळ सुरू आहे. तिकीट न मिळाल्याने कुणी बंडखोरी करत आहेत, कुणी अश्रू ढाळत आहेत, तर कुणी राजकीय पर्याय शोधत आहेत. निवडणूक लढवून आमदार होण्याच्या इच्छेने राजकीय पक्षांमध्ये कुटुंबेही विभागली गेली आहेत. पिता-पुत्र आणि भाऊ-भाऊ, काका-पुतणी, वडील-मुलगी वेगवेगळ्या पक्षांत असून, काही तर परस्पराविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
महाराष्ट्रात केवळ पवार आणि ठाकरे घराणेच दोन राजकीय गटात विभागलेले नाहीत, तर राणे घराण्यापासून नाईक घराण्यापर्यंत हीच परिस्थिती दिसून येत आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी ही लिटमस टेस्ट आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत, तर त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश नाईक भाजपकडून निवडणूक लढवत असताना, त्यांचा मुलगा संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवणार आहेत. धर्मारामबाबा अत्राम यांच्याविरोधात त्यांची मुलगी, तर डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात त्यांची पुतणी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे हे भाजपच्या तिकीटावर सिंधुदुर्गमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. राणे यांचे धाकटे पुत्र नितीश राणे हे सिंधुदुर्ग कणकवली मतदारसंघातून आमदार असून त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर या जागेवरून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे, तर राणे यांचे ज्येष्ठ पुत्र नीलेश राजकीय सांधा बदलणार आहेत. नीलेश शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत. ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून, त्यासाठी त्यांनी कणकवलीला लागून असलेल्या कुडाळची जागा निवडली आहे. कुडाळची जागा भाजपऐवजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या कोट्यात आहे. त्यामुळे नीलेश यांनी भाजपऐवजी शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्गातील राणे कुटुंबाचे राजकीय वर्चस्व पाहता शिंदे त्यांना निवडणुकीत उतरवू शकतात, असे मानले जात आहे. नीलेश यांचा सामना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याशी होणार आहे.
नव्या मुंबईचे नाईक कुटुंब भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये विभागले गेले आहे. नवी मुंबईच्या राजकारणावर नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपने गणेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे; मात्र त्यांचा मुलगा संदीप नाईक यांनी भाजपला अलविदा करून आमदार होण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. संदीप नाईक यांना बेलापूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची होती; मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी राजकीय भूमिका बदलली. बेलापूर मतदारसंघात सध्या भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. गणेश नाईक २०१९ पर्यंत राष्ट्रवादीत होते आणि निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये दाखल झाले. या प्रकाराने नाईक कुटुंब दोन गटात विभागले गेले आहे. आता शिंदे यांच्या शिवसेनेने प्रश्न उपस्थित केल्याने भाजप गणेश नाईकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपचे दिग्गज नेते धनंजय महाडिक यांचे कुटुंबही या दोन्ही पक्षांत फूट पडण्याच्या मार्गावर आहे. धनंजय महाडिक हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. महाडिक यांचे थोरले पुत्र कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत; मात्र जागावाटपात ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेच्या कोट्यात गेली आहे. धनंजय यांनी आपल्या मुलासाठी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिंदे यांच्या पक्षाचे राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या शर्यतीत आहेत. शिंदे यांनी कोल्हापूरची जागा सोडली नाही, तर धनंजय यांचे पुत्र कृष्णराज महाडिक पक्ष बदलून शिवसेनेत प्रवेश करू शकतात.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे कुटुंबही विघटनाच्या मार्गावर आहे. छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अजित पवारांसोबतच छगन भुजबळ यांनीही शरद पवारांची साथ सोडली. भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे; मात्र नांदगावचे विद्यमान आमदार सुहास कांदे हे शिंदे गटात आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेला ही जागा मिळाल्याने ते आता राजकीय पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या संपर्कात असताना, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतचे पर्यायही शोधत आहेत. नांदगाव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे, त्यामुळे शरद पवार गटाला ही जागा न मिळाल्यास समीर भुजबळ ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात. अजित पवार यांनी त्यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यात जमा आहे.
बारामतीत काका-पुतण्या लढत
बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पुन्हा अजित पवार यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार निवडणुकीत उतरणार आहेत. श्रीनिवास पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. बारामतीत अजितदादाविरुद्ध अन्य पवार असा संघर्ष आहे.
हेही वाचा :