कागल : प्रतिनिधी ; रामकृष्णनगर (ता. कागल) येथील आदिती सुनील पाटोळे हिची भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. (Aditi Patole)
पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गहुंजे स्टेडियममध्ये महाराष्ट्र संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातून अनेक मुली सहभागी झाल्या होत्या. आदिती ही फलंदाज असून, तिने जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती. त्याचीच दखल घेऊन एमसीएच्या समितीने आदितीची महाराष्ट्र राज्य संघ निवड चाचणीला निमंत्रित केले आहे. (Aditi Patole)
या चाचणीतून निवडलेल्या महाराष्ट्र संघाचे कटक व भुवनेश्वर येथे स्टेडियममध्ये साखळी पद्धतीने सामने होणार आहेत. महाराष्ट्राच्या गटात आंध्र प्रदेश, उत्तराखंड, पांडेचरी, हिमाचल प्रदेश, मेघालय या संघांचा समावेश आहे. आदितीही सध्या पुण्यात शिकत असून, तिला कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव मदन शेळके यांचे, तर अनिल सांगावकर, ज्योती काटकर, मोहन चव्हाण, चेतन सावरे, खालील शेख, साई हायस्कूलचे सरदार पाटील, पुण्याचे सागर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. वडील सुनील पाटोळे यांचे प्रोत्साहन मिळत आहे. या निवडीने अदितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.