महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क
तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादाचा वाद एका नव्याच वळणावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने आंध्रप्रदेश सरकार व मुख्यमंत्र्यांना तीव्र शब्दांत फटकारले. देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा, असे खडे बोल सुनावले.
प्रसादाच्या लाडूसाठी वापरण्यात आलेल्या तुपात जनावरांची चरबी असल्याचा आरोप झाल्यानंतर देशभर मोठी खळबळ माजली होती. त्या संबंधात खंडपीठासमोर आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी अत्यंत तीव्र शब्दांत नाराजीची निरीक्षणे नोंदवली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपानंतर हा वाद उफाळला. आधीचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळातच तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा दावा नायडू यांनी केला होता. त्यामुळे देशभर खळबळ माजली होती.
खंडपीठाने सोमवारी नायडू यांच्यावर थेट ताशेरे ओढताना, ‘‘तुमच्या प्रशासनाने या संदर्भात चौकशीचे आदेश दिले असताना तुम्ही जाहीर वक्तव्ये करण्याची गरजच काय? असा सवाल केला. तुम्ही घटनात्मक पदावर आहात. आम्ही अशी अपेक्षा करतो की, तुम्ही देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा. भेसळयुक्त तुपाचा वापर झाला की नाही याबाबतचे तथ्य अद्याप तपासाच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत तातडीने प्रसिद्धी माध्यमांकडे धाव घेण्याची काय गरज होती? धार्मिक भावनांचा आदर करण्याची आत्यंतिक गरज आहे.’’
Maharashtra Dinman
कोल्हापूर : प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी हे चार आणि पाच ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गांधी यांच्या दौऱ्यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत दिली. चार ऑक्टोबर रोजी दुपारी राहुल गांधी यांचे कोल्हापुरात आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. शिल्पकार सतीश घारगे यांनी हा पुतळा तयार केला आहे. पाच ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास राहुल गांधी नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे भेट देणार आहेत. त्यानंतर ते संविधान सन्मान संमेलनाकडे रवाना होतील. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील एक हजारहून अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत. सर्व धर्मातील प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला खासदार शाहू महाराज, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके, करणसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.
२००० कलाकार सादर करणार छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटक
५ ऑक्टोबरला सायंकाळी कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर २००१ कलाकार नाटक सादर करणार आहेत. यामध्ये १ हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मध्यमातून केला जाणार असल्याचे आ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस पक्ष ‘हाऊस फुल्ल!’
राज्यातील मोठे नेते कोल्हापुरात येत असल्याने काँग्रेसमध्ये इनकमिंग होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर काँग्रेस भरगच्च आहे, आधीच हाऊस फुल्ल आहे. मात्र येणाऱ्यांचे स्वागतच असेल, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये सर्वांना न्याय देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क
अहमदाबाद : सोने खरेदीच्या बहाण्याने येथील एका सराफाला जवळपास १ कोटी ९० लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे सोने खरेदीसाठी दिलेले पैसे पाहून ज्वेलर्स मालकाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, त्या भामट्यांनी दिलेल्या बंडलमध्ये ५०० च्या नोटांवर चक्क अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो होता.
अहमदाबाद येथील सराफ बाजारात करोडो रुपयांचा गंडा घातल्याची ही घटना उघडकीस आली आहे. सीजी रोडवरील लक्ष्मी ज्वेलर्सचे मॅनेजर प्रशांत पटेल यांनी सराफ व्यापारी मेहुल
ठक्कर यांना कांतिलाल मदनलाल आंगडिया फर्मला २१०० ग्रॅम सोने द्यायला सांगितले होते. त्यानुसार ठक्कर यांनी आपले कर्मचारी भरत जोशी यांना २१०० ग्रॅम सोने आंगडिया फर्ममध्ये देण्यासाठी पाठविले. जोशी दुकानात पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील एका व्यक्तीकडे काउंटिंग मशिन दिले. दुसऱ्याने जोशी यांच्याकडून सोने घेतले. बॅगेत १ कोटी ३० लाख आहेत. ते मोजून होईपर्यंत पुढच्या ऑफिसमधून ३० लाख घेऊन या, असे तिसऱ्या व्यक्तीने सांगितले. दरम्यान, जोशी यांची नजर चुकवून तिघे भामटे सोने घेऊन तेथून पसार झाले. बॅगेतील नोटांचे बंडल तपासले असता त्या सर्व नोटांवर महात्मा गांधींच्या फोटोऐवजी अनुपम खेर यांचा फोटो होता. तसेच नोटांवर रेसोल बँक ऑफ इंडिया असेही लिहिल्याचे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. गुन्हे शाखेकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघांचा शोध घेतला जात आहे.
कोल्हापूर : प्रतिनिधी
श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव काळातील बुंदी लाडू प्रसादाचे कंत्राट यंदाही कळंबा कारागृहातील बेकरी विभागाला देण्यात आले आहे. या विभागाकडून १ लाख ८० हजार लाडू बनवून घेतले जाणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाकडून चाचणी झाल्यानंतर हे लाडू मंदिरात आणले जातील, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले.
दरम्यान, श्री अंबाबाई देवीच्या नित्यपूजेतील सोन्याच्या जडावी अलंकारांची स्वच्छता रविवारी पूर्ण झाली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मंदिर आवारातील मंडपात देवीचे सर्व दागिने लख्ख करण्यात आले. स्वच्छता आणि इतर कामांसाठी मंदिर व्यवस्थापनांसह भाविकही सेवा देऊ लागले आहेत. सुमधूर भक्तिगीतांमुळे मंदिर परिसरात नवरात्रोत्सव काळातील प्रसन्नतेची छटा उमटू लागली आहे. विक्रेत्यांकडून विविध साहित्यांचे स्टॉल सजू लागले आहेत.
दर्शन रांग शेतकरी संघाच्या कार्यालयातूनच सुरू होणार आहे. तेथून भाविक बाहेरील दर्शन मंडपात दाखल होतील, असे नियोजन आहे. मंडपावर पत्रे घातले असून पिण्याच्या पाण्याचीही सोयही केली आहे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्थाही देवस्थान समितीकडून सक्रीय ठेवण्यात येणार आहे. घाटी दरवाजा, नवगृहाजवळ असलेले आरोग्य तपासणी केंद्र सुसज्ज ठेवले जाणार आहे.
जुन्या गरूड मंडपाच्या जागी मंडपाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. पालखी सोहळा व देवीचे धार्मिक विधी येथे होणार आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई केली जात आहेत.
११६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच
अंबाबाई मंदिर व परिसरावर ९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच आहे. त्यांचा आढावा घेऊन आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समिती प्रशासक अमोल येडगे यांनी मंदिर व भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आणखी वीस कॅमेरे बसवले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यानेही मंदिर परिसरावर वॉच ठेवण्यात येणार आहे.
डॉ. शरद भुथाडिया यांना पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती नाट्य पुरस्कार जाहीर
कोल्हापूर; प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार नामवंत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुथाडिया यांना जाहीर झाला आहे. रोख रुपये २१ हजार आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या वर्षीपासून परिषदेच्यावतीने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ४ ऑक्टोबर रोजी परिषदेचे विश्वस्त आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. परिषदेचे १०० वे नाट्यसंमेलन आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त कोल्हापूर शाखेच्या वतीने हा महोत्सव होत आहे. त्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात उद्योग मंत्री व नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल. पालकमंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षतेखाली आणि आ. सतेज पाटील प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी दि.५ ऑक्टोबर रोजी नाट्य कलेचा जागर हा विशेष कार्यक्रम आणि सायंकाळी पाच वाजता ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
रविवारी, दि.६ रोजी सायंकाळी चार वाजता महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी डॉ. वासुदेव देशिंगकर संकलित आणि संशोधित ‘मराठी रंगभूमीचे प्रतिभावंत नाटककार’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी कला क्षेत्रात उलेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यासागर अध्यापक, मयूर कुलकर्णी, सागर बगाडे, मंजुश्री गोखले आणि ऑलिंपिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर अभिराम भडकमकर लिखित आणि ऋषिकेश जोशी दिग्दर्शित ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी मोफत प्रवेशिका उपलब्घ करून देण्यात आल्या आहेत.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, नाट्य परिषदेचे कार्यवाह गिरीश महाजन, श्रीकांत जोशी, शिवकुमार हिरेमठ, प्रा. शशिकांत चौधरी, श्रीमती हेमसुवर्णा मिरजकर, आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
महोत्सवात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम
- शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर, दुपारी ३.३० वा. : महोत्सवाचे उदघाटन आणि संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा. त्यानंतर ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रम : सादरकर्ते : संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी
- शनिवार, दि. ५ ऑक्टोबर, सकाळी ११ वा. नाट्यकलेचा जागर : सादरकर्ते : नाट्य परिषद, मुंबई. सायं. ५ वा. अमेरिकन अल्बम (मराठी नाटक)
- रविवार दि. ६ ऑक्टोबर, दुपारी ४.३० वाजता समारोप आणि ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’चे सादरीकरण.
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे. (Dadasaheb Phalke Award )
मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार
चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट सृष्टीत अत्यंत मानाचा मानला समजला जातो. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी चित्रपट सृष्टीवर बराच काळ अधिराज्य केलं. त्यांच्या डिस्को डान्सचे चाहते देशासह परदेशातही आहेत. हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीत संवाद शैली, नृत्य, अभिनयात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 17 व्या सोहळ्यात 8 ऑक्टोबर रोजी या पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०२४ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. तसेच तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात रामकृष्ण परमहंस या भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
Dadasaheb Phalke Award : कलारसिकांच्या मनावर अधिराज्य केले : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटंल आहे की, ” आपल्या चतुरस्त्र अभिनयाने व अनोख्या नृत्यशैलीने दोन पिढ्यांतील रसिक तरुणाईच्या मनावर गारुड घालणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा ‘ दादासाहेब फाळके पुरस्कार ‘ जाहीर करण्यात आला आहे. हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये भूमिका साकारताना आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा आणि नृत्यशैलीचा ठसा उमटवून त्यांनी कलारसिकांच्या मनावर अधिराज्य केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दलच्या या पुरस्काराचे मानकरी ठरलेले मिथुन चक्रवर्ती यांचे मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! मिथुन दा आपला भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवास भावी पिढयांना प्रेरणा देणारा आहे.”
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने व अनोख्या नृत्यशैलीने दोन पिढ्यांतील रसिक तरुणाईच्या मनावर गारुड घालणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा ‘ दादासाहेब फाळके पुरस्कार ‘ जाहीर करण्यात आला आहे. हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये भूमिका साकारताना… pic.twitter.com/RdDGkAtnQ8
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 30, 2024
हेही वाचा
Sangali News : म्हैसाळमध्ये विजेच्या शॉकने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
महाराष्ट्र दिनमान, सांगली प्रतिनीधी : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे काळीज पिळवून टाकणारी घटना आज (दि.२९) घडली आहे. या घटनेमध्ये एकाचवेळी घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकाच घरातील तीनजण अचानक मृत्यू पावल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिशनाथ मारुती वनमोरे (वय ४० ), साईराज वनमोरे (वय १३) आणि प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय ३५) असे मृतांची नावे आहेत. विजेच्या शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Sangali News)
Sangali News : वैरण आणायला जाणं ठरलं शेवटचं…
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हैसाळ (ता.मिरज) पारिशनाथ वनमोरे मुलासोबत त्यांच्या शेतात चारा काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेतालगत असणाऱ्या सुभाष राजाराम पाटील यांच्या शेतामध्ये मुख्य विद्युत प्रवाह करणारी थ्री फेज विजेची तार तुटून पडली होती. पारिश नाथ आणि साईराज यांना शॉक लागून ते जागीच ठार झाले. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला त्यांचा चुलत भाऊ प्रदीप आणि मुलगा हेमंत यालाही शॉक लागला. यामध्ये प्रदीप हा जागीच ठार झाले तर हेमंत गंभीर जखमी झाला आहे. तर हेमंत पारिशनाथ वनमोरे (वय १४) असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमी मुलाला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वनमोरे कुटुंबासोबत गेलेला कुत्रा देखील विजेचा शॉक लागून मृत पावला आहे.
हेही वाचा