सतीश घाटगे; कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप, उमेदवारी निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठका सुरु असताना कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यात भुदरगड आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन आणि प्रारंभ करत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आमदार प्रकाश आबिटकर यांना बळ दिले. (Eknath Shinde)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यभर एकत्रित दौरे करत आहेत. शिंदे, फडणवीस आणि पवार कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. पण फडणवीस बुधवारी, नऊ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये कार्यक्रमात व्यग्र होते. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघे कोल्हापूर दौऱ्यावर आले. मात्र दोघांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतले. मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी नसल्याने मंगळवारचा (दि. ८) त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्यामुळे ते कोल्हापूर दौऱ्यावर येणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी क्षीरसागर आणि आबिटकरांसाठी वेळ काढत या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असणार आणि क्षीरसागर, आबिटकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. जिल्ह्यात बुधवारी सर्वत्र पाऊस असतानाही मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमांना हजेरी लावत शिवसैनिकांना प्रोत्साहित केले. (Eknath Shinde)
मुख्यमंत्री रायगडवरुन हेलिकॉप्टरने थेट राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाच्या घळभरणी कार्यक्रमास आले. या प्रकल्पाचा फायदा राधानगरी, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना होणार आहे. या प्रकल्पावर आजअखेर ५९५ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. भुदरगड तालुक्यातील २०० कोटींच्या विकास कामांचा शुभारंभही त्यांनी केला. त्यामध्ये भुदरगड प्रांत कार्यालय, भुदरगड पोलिस स्टेशन, तहसीलदार कार्यालयाचे उद्घाटन केले. दूधगंगा धरणाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजना कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. कोल्हापूर शहरातील विकास कामांचा शुभारंभ त्यांनी दसरा चौकात केला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री रात्री नऊ वाजता कोल्हापुरात दाखल झाले. उशीर झालेला असतानाही शिवसैनिकांच्या उपस्थितीने मैदान भरले होते. मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेवर फोकस करत महिलांची मते शिवसेनेकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणाला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
२०१९, २०२० मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरनियंत्रण प्रतिबंधक कामांसाठी ३२०० कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राजाराम तलावावरील कन्वेक्शन सेंटरसाठी २७७ कोटी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी, शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी, अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १५२ तर दुसऱ्या टप्प्यासाठी १३९ कोटी, पंचगंगा घाट सुशोभिकरण, रंकाळ्यासाठी ११ कोटी अशा कामांसाठी भरीव निधी कोल्हापूर शहराला प्रथमच मिळाल्याने राजेश क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीसाठी बळकटी मिळणार आहे.
हेही वाचा :