मुंबई; विशेष प्रतिनिधी : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर बाबा सिद्दिकी बरोबरच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनाही संपवण्याची सुपारी मारेकऱ्यांना देण्यात आली होती. अशी माहिती मुंबई पोलिसांना अटक केलेल्या आरोपीची केलेल्या चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी आमदार सिद्दिकी यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. (Baba Siddique)
शनिवारी रात्री वांद्रेतील खेरवाडी येथे बाबा सिद्दिकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामध्ये मृत्यू झाला. यामुळे देशभरात खळबळ उडाली. सिद्दिकी यांचे राजकारणासह बॉलीवूडमध्येही घनिष्ठ संबंध आहे. या घटनेने बॉलीवूड ही हादरून गेले आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या तिघांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. बाब सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी सोशल पोस्टद्वारे लॉरेन्स बिश्नोई गॅगचा सदस्य शुभम लोणकरने सोशल मीडियावर पोस्ट करून स्वीकारली आहे. मात्र तो सध्या फरार आहे. त्याचा भाऊ प्रवीण लोणकर याला रविवारी रात्री मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्यापूर्वी अटक केलेल्या हरियाणाच्या गुरमेल बलजीत सिंग आणि उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यपला कोठडी मिळाली आहे. (Baba Siddique)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पोलिसांना तपासा दरम्यान दिलेल्या माहितीनुसार झिशान सिद्दीकी हे देखील बिश्नोई टोळीचे लक्ष्य होते. दोघांनाही एकत्र मारण्याची संधी मिळाली नाही तर जो समोर दिसेल, त्याला मारावे असे आदेशदेण्यात आले होते.
गुरमेल हा गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला आरोपी आहे. तिसरा आरोपी शिवानंद कुमार हा घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. त्याला पकडण्यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत अनेक ठिकाणी पोलीस पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी कुर्ला येथून दररोज वांद्रे येथे जात होते. ते कुर्ला इथं भाड्याने राहत होते. बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या मुलाशी संबंधित ठिकाणे, त्यांचे घर, कार्यालय आणि कार्यक्रमांवर आरोपी पाळत ठेवून होते. गोळीबार करणाऱ्यांना झिशान यांनाही लक्ष्य करण्याचे आदेश मिळाल्याचा संशय पोलिसांना आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी दोघेही एकाच ठिकाणी होते. याबाबतची माहिती आरोपींना होती. (Baba Siddique)
सिद्दिकींच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणार : मुख्यमंत्री
बाबा सिद्दिकी यांची हत्या व राज्यातील वाढते गुन्हेगारी बाबत विरोधकांकडून राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, विरोधकांनी राजकारण करण्याचे सोडून द्यावे ,बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील आरोपींना पकडण्यात यश आले असून मुख्य सूत्रधारांनाही अटक केली जाईल, आरोपींना फासावर लटकवण्यात येईल. (Baba Siddique)
हेही वाचा :