वॉशिंग्टन : खलिस्तानवादी गुरपतवंत पन्नू याच्या हत्येच्या कटात भारताचा हात नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. पन्नू याच्या हत्येच्या कटात निखिल गुप्ता नामक रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. भारताने पन्नू याच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर अमेरिकेने याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती.
पन्नू याच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या व्यक्तीचा भारतीय तपास यंत्रणेशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचे अमेरिकन तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आले आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यु मुल्लर यांनी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी करून ही माहिती दिली. पन्नू याच्या हत्येच्या कटाच्या चौकशीमध्ये भारताने सहकार्य केल्याचेही मुल्लर यांनी म्हटले आहे. दरम्यान, खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो यांनी केला होता. यानंतर भारताने हा आरोप फेटाळून लावत कॅनडाच्या दूतावासातील सहा अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता.
भारताने मात्र कॅनडाकडून चुकीच्या पद्धतीने भारतावर आरोप करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुंडांना भारताच्या स्वाधिन करण्याची मागणी करण्यात आली असतानाही कॅनडाकडून प्रतिसाद देण्यात आला नसल्याचा पलटवारही भारताने केला.
टुड्रो बॅकफूटवर
भारत आणि कॅनडामध्ये तणावाचे वातावरण तयार झाल्यानंतर अमेरिकेने याप्रकरणी भारतीय उच्चपदस्थ समितीसोबत चर्चा करणार असल्याचे जाहीर केले होते. नंतर हा निर्णय अमेरिकेने अधिकृतरीत्या मागे घेतला. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो हेसुद्धा बॅकफूटवर आले असून निज्जर याच्या हत्येत भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे पुरावे नसल्याची कबुली दिली आहे.