चेन्नई : बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या फेंगल वादळाचे आज चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. येत्या दोन दिवसांत ते तमिळनाडूकडे सरकणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, या काळात ७५-८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. चेन्नई, चेंगलपेट, कांचीपुरम, तिरुवल्लूर, कुड्डालोर, नागापट्टिनम येथे संततधार पाऊस सुरू आहे. या सहा जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी वादळाच्या प्रभावाबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. तिरुवरूर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम आणि कुड्डालोर जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद दलाच्या सात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
Maharashtra Dinman
सांगली : अंकली येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून कार कोसळून पती-पत्नी सह तिघांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवाली जखमी झाले. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील मृत आणि जखमी सांगलीचे आहेत. याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Sangli)
प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ३५), प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय ३६ दोघे रा. गावभाग, सांगली), वैष्णवी संतोष नार्वेकर (वय २१ रा. आकाशवाणी केंद्रजवळ, सांगली) अशी मृत्यू व्यक्तींची नावे आहेत. कोल्हापूरातून लग्न सोहळा आटपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते. अंकली पुलावर आल्यावर गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी पुलावरून सुमारे ३५ फूट खाली कोसळली. यात तिघांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले.
समरजीत प्रसाद खेडेकर (वय ७), वरद संतोष नार्वेकर (वय १९), साक्षी संतोष नार्वेकर वय (४२, सर्व रा. सांगली) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना सांगलीच्या सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
-प्रा. प्रशांत नागावकर
सुगुण नाट्यकला संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेले प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाने ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेला कोल्हापूर केंद्रावर सुरुवात झाली.
१९६२ साली प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले. ते कमालीचे लोकप्रिय ठरले. नाटकाची पार्श्वभूमी ऐतिहासिक असली तरी त्यात कौटुंबिक ताणतणाव आहेत. नाटक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्यावर बेतलेले असले तरी खऱ्या अर्थाने ते आधुनिक काळातील पितापुत्र संबंधावर आधारित आहे. त्यातही एका बापाच्या हृदयातील खंत अधिक तीव्रतेने व्यक्त करते. थोडक्यात, ते भवतालच्या ढासळत्या एकत्र कुटुंब व्यवस्थेसंदर्भातील आहे.
सुगुण नाटकाला संस्थेने या नाटकाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक निवडण्यामागे दिग्दर्शकाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आपल्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनात ते स्पष्ट म्हणतात की, दोन पिढ्यातील भिन्न विचारसरणी आणि स्वभावधर्म यातील अंतर या नाटकात अधोरेखित होत असल्यामुळे ते अंतर अजूनही अखिल मानवजातीमध्ये आहे. ते यापुढेही असणारच, अशा स्वरूपाची समकालीन मूल्ये या नाटकातून अधिक तीव्रतेने येत असल्यामुळेच हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी निवडल्याचे स्पष्टच आहे.
सुगुण नाट्यकला संस्था ही कोल्हापुरातील एक महत्त्वाची नाट्य संस्था आहे. ती सातत्याने राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेत आली आहे. आतापर्यंत त्यांनी ‘नटसम्राट, ’ ‘ती फुलराणी,’ ‘नागमंडल, ’ ‘विच्छा माझी पुरी करा,’ ‘हमीदाबाईची कोठी,’ ही काही प्रमुख नाटके उत्तमपणे सादर केली आहेत. दिग्गज मातब्बर नाट्यसंस्थेच्या गजबजाटात ‘सगुण’ ने नेहमीच आपले वेगळेपण जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अशा संस्थेचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते,’ या नाटकाच्या माध्यमातून अतिशय उत्तम असे सादरीकरण नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेला रंगतदार सुरुवात झाली आहे.
मराठी रंगभूमीवर ऐतिहासिक नाटक सादर करण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे. तीच पारंपरिक ऐतिहासिक नाट्यशैली ‘सुगुण’नेही स्वीकारली. आजपर्यंत काही अपवादात्मक ऐतिहासिक नाटके रूढ ऐतिहासिक नाटकांच्या सादरीकरणाची चौकट मोडून सादर झाली आहे. पण बहुतांशी ऐतिहासिक नाटके ही पारंपरिक अभिजात शैलीत सादर करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. सगुण याला अपवाद नाही. राज्य नाट्य स्पर्धा म्हणून ऐतिहासिक नाटकाला वेगळ्या प्रायोगिक शैलीत सादर करण्याचा अट्टहास त्यांनी ठेवला नाही. ऐतिहासिक नाटकाचे सादरीकरण हे ‘स्टाईलाइज्ड’ असते याचा पुन: प्रत्यय हे नाटक बघताना आला.
ऐतिहासिक नाटक हा एका अर्थाने ‘कॉश्च्युम प्ले’ म्हणजे पोशाखी नाट्यच असते, असाही एक प्रवाद आहे. सगुणने सादर केलेले हे ऐतिहासिक नाटकही ‘कॉश्च्युम प्ले’ चा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक ऐतिहासिक अशा पारंपरिक शैलीत सादर केले. बॉक्ससेट, ऐतिहासिक काळाला साजेशी झगमगीत वेशभूषा अशा अनेक पारंपारिक गोष्टी स्वीकारलेल्या आहेत.
या नाटकातील अभिनय शैली ही वास्तविक नाटकातल्या अभिनय शैलीशी फटकून ती ऐतिहासिक स्वरूपाची असल्याने ‘कृत्रिमता’ नाटकातील सर्व कलाकारांच्या अभिनयाच्या शैलीत कळत नकळतपणे दिसून येते. कदाचित हा दोष कलाकारांच्या अभिनयाचा नसून दिग्दर्शकाने जाणिवपूर्वक दिलेल्या किंवा निवडलेल्या स्टाइलाइज्ड अॅक्टिंग ट्रिटमेंटचा असावा. ऐतिहासिक नाटक असल्याने नाटकातील संवाद मेलोड्रमॅटिक, कृतक, भावुक स्वरूपाचे आहेत. उत्तम पाठांतर त्याचबरोबर संवादातील आशय समजून घेत केलेली संवादफेक, त्याला साजेसा अभिनय, ही वैशिष्ट्ये सर्वच कलाकारांमध्ये पाहायला मिळाली. कमालीचा आत्मविश्वास सर्वच कलाकारांच्या अभिनयांमधून दिसून आला. ही अत्यंत महत्त्वाची आणि जमेची बाजू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या ओंकार नलवडे यांनी आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तीरेखेला अत्यंत कौशल्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला. अत्यंत प्रिय असणाऱ्या शिवाजी महाराजांची भूमिका आपण साकार करतो आहोत, याचे भान त्यांनी संपूर्ण नाटकभर ठेवल्याचे दिसून आले. गैरसमजातून आपल्यापासून दुरावलेल्या मुलाच्या संदर्भात होणाऱ्या यातना त्यांनी नेमकेपणाने अभिनित केल्या. एका बापाची खंत तीव्रतेने प्रेक्षकांसमोर मांडण्यात ते यशस्वी ठरले.
रोहन घोरपडेने संभाजीराजे अत्यंत प्रगल्भतेने सादर केला. पित्यानेच आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय केल्याचे शल्य मनात ठेवूनही वडिलांविषयीचा आदर तितक्याच तीव्रतेने प्रकट केला. यातून त्याच्या अभिनयाची समज लक्षात येते. या दोन्ही कलाकारांनी मनातील अंतरिक संघर्ष तितक्याच ताकदीने अभिनयातून व्यक्त केला.
पद्मजा पाटील आणि सुप्रिया अनुक्रमे सोयराबाई आणि येसूबाईची भूमिका संयतपणे सादर करण्यात यशस्वी ठरल्या. राजघराण्यातील स्त्रियांचा आदबशीरपणा त्यांनी हुबेहूब पकडला.
या सगळ्यातही कीर्ती कुमार पाटील यांनी उभारलेला राजाराम आपल्या भूमिकेत शोभून दिसतो. त्याने अल्लडपणा बाहेर काढण्यासाठी अत्यंत खुबीने काही क्लृप्त्या शोधल्याचे दिसते. त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. शरद पाटील, योगेंद्र माने आणि राहुल पाटील यांनी हंबीरराव, अण्णाजी आणि मोरोपंत या व्यक्तिरेखा समजून घेऊन आपापल्या भूमिकांना न्याय दिला. या व्यक्तिरेखा इतरांच्या दृष्टीने गौण असल्या तरी त्यांच्या अभिनयामुळे नाटकात त्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत. याबरोबरच शाहीर-सारंग सोनुले, बाळ शंभू – कु. मंजिरी चव्हाण यांनी आपल्या वाट्याच्या छोट्या भूमिकाही उत्तमपणे साकारल्या. त्यामुळे एक संपूर्ण सांघिक आविष्कार पाहायला मिळाला.
प्रकाश योजनेतील झगमगीत आणि चकचकीतपणा प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करत असला तरी काही वेळेला दिवाळीच्या रोषणाईची आठवण आल्या वाचून राहत नाही. नाटकाचे नेपथ्य बॉक्ससेट स्वरूपाचे असल्याने सूचकात्मकता किंवा प्रतीकात्मकता दाखवून देण्यास फारसा वाव नव्हता. पार्श्वसंगीत प्रसंगाला साजेसे. पण काही ठिकाणी वापरलेली ध्वनिमुद्रिके रसभंग करत होती. ऐतिहासिक पात्रांना शोभेशी वेशभूशा होती. त्यातील रंगसंगतीची निवड लक्षणीय तितकीच आशयपूर्ण ठरली. दिग्दर्शक म्हणून सुनील घोरपडे यांनी काही जागा अत्यंत खुबीने हेरल्या आहेत. काही ठिकाणी त्यांनी मांडलेल्या कम्पोझिशन्समधून प्रसंगाचा आशय व्यक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
- नाटक : रायगडाला जेव्हा जाग येते
- लेखक : प्रा. वसंत कानेटकर
- सादरकर्ते : सुगुण नाट्यकला संस्था, कोल्हापूर
- दिग्दर्शक : सुनील बाळासाहेब घोरपडे
- नेपथ्य आणि पार्श्वसंगीत : ओंकार घोरपडे
- रंगमंच व्यवस्था : सागर भोसले, समीर भोरे, पार्थ घोरपडे
- प्रकाश योजना : सुनील घोरपडे
- वेशभूषा : सुप्रिया घोरपडे, शिवानी घोरपडे, रोहिणी पाटील
- रंगभूषा : सुनील मुसळे
- रेकॉर्डिंग : ओंकार सुतार (स्वरतृप्ती रेकॉर्डिंग स्टुडिओ)
पात्र परिचय
- शिवाजी महाराज : ओंकार नलवडे
- राजाराम महाराज : कीर्तीकुमार पाटील
- हंबीरराव : शरद पाटील
- आण्णाजी : योगेंद्र माने
- मोरोपंत : राहुल पाटील
- येसूबाई : सुप्रिया पाटील
- सोयराबाई : पद्मजा पाटील
- शिवाजी राजे आणि मावळा : समीर भोरे
- बाळ शंभू : कु. मंजिरी चव्हाण
- शाहीर : सारंग सोनुले
- शंभूराजे : रोहन सुनील घोरपडे
-अमोल उदगीरकर
आपल्याकडे पाश्चात्य देश म्हणून अनेकदा सरसकटपणे युरोपियन राष्ट्रांना ओळखलं जातं. युरोप म्हटलं की आपल्याकडे इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी एवढंच डोळ्यासमोर येतं. वास्तविक पाहता युरोप हा खंड खूप विस्तीर्ण आहे. उत्तर युरोपात असणारे नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड हे देश (ज्यांना नॉर्डिक देश म्हणून ओळखलं जातं ) आपल्याला ऐकून माहित असले तरी फारसे परिचीत नाहीत. हे देश छोटे असले तरी जगाच्या राजकारणात त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. दरडोई उत्पन्नात जगात सरस असलेली आणि अतिशय समृद्ध असणारी ही राष्ट्र कुणाच्या अध्यात मध्यात नसतात. कुठल्याही पेचप्रसंगात त्यांना आपली तटस्थता प्यारी असते. जगात कुठं रक्तरंजित संघर्ष चालू असेल तर नॉर्वेसारख्या नॉर्डिक राष्ट्राला त्या संघर्षात मध्यस्थी करायला प्रचंड आवडतं. श्रीलंकेत जेंव्हा तमिळ बंडखोर आणि श्रीलंकन सैन्य यांच्यात भयानक रक्तपात होत असताना नॉर्वेने या दूरच्या संबंध नसलेल्या देशात मध्यस्थी केली होती आणि संबंधित पक्षांना चर्चेच्या टेबलवर आणलं होतं. पण या चिमुकल्या राष्ट्रांच्या तटस्थतेवर काहीवेळा हुकूमशाही रणगाडा फिरला आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने आपले रणगाडे या सुंदर देशात घुसवले होतेच. ही नॉर्डिक राष्ट्रं अजून एका गोष्टीसाठी ओळखली जातात. ती गोष्ट म्हणजे तिथलं निष्ठूर निर्दयी वातावरण. सतत ढगाळ आणि बर्फाच्छादित वातावरण असतं तिथलं. माणसांना साध्या साध्या गोष्टींसाठी संघर्ष करायला लावणारं वातावरण. इंगमार बर्गमनसारखा काही मूलभूत अस्तित्ववादी प्रश्न विचारणारा आणि काहीसा नैराश्याकडे झुकलेले सिनेमे बनवणारा स्वीडनमधला महान दिग्दर्शक घडण्यात या वातावरणाचा वाटा मोठा असणार. पण गेल्या काही वर्षात नॉर्वे आणि डेन्मार्क या दोन नॉर्डिक देशांमधून मोठ्या प्रमाणावर उत्तम सिनेमे आणि वेबसिरीज बनत आहेत. चोखंदळ भारतीय प्रेक्षकांमध्ये सध्या ‘बोर्गन‘ या डॅनिश मालिकेचा मोठा बोलबाला आहे. ‘बोर्गन‘ ही पॉलिटिकल ड्रामा श्रेणीत येणारी सीरिज आहे. पण अनेक लोकांसाठी ही सीरिज केव्हिन स्पेसीच्या ‘गेम ऑफ कार्ड्स‘ या गाजलेल्या पॉलिटिकल ड्रामापेक्षा पेक्षा अनेक पटींनी सरस आहे. ग्रीनलँडमध्ये तेलाच्या विहिरी खणण्यावरून या शांत सुशेगात देशात राजकारणाचा आगडोंब उसळतो. या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे एक महिला राजकारणी जिचा उदय पंतप्रधान म्हणून होतो .
आम्हाला राज्यशास्त्र शिकवणाऱ्या एका सरांची एक फार इंटरेस्टिंग थिअरी होती. ते म्हणायचे, ‘आपल्या प्रत्येक कृतीमागे राजकारण असतं. आपण किचनमध्ये गेल्यावर माठातलं पाणी प्यायचं किंवा फ्रिजमधलं असा विचार करून माठातलंच पाणी पितो. त्या कृतीमागेही राजकारण असतं.’ राजकारण म्हणजे दरवेळी सत्ता मिळवण्यासाठीचं साधन असंच नसतं. हवीहवीशी प्रत्येक गोष्ट- बंगला, गाडी किंवा कुठलीही भौतिक सुखं असो, इतकंच काय हाडामांसाचा माणूस मिळवण्यासाठीही आपण राजकारण एक साधन म्हणून वापरतो.
थोडक्यात काय, राजकारण हे सर्वव्यापी आहे. माणूस म्हणून जन्माला आलो, तेव्हाच राजकारण आपल्या पाचवीला पुजलेलं असतं. आणि त्या अर्थानं आपण सगळेच राजकारणी. मायक्रो राजकारण खेळणारे राजकारणी. प्रेमातलं राजकारण किंवा स्त्री-पुरुष नात्यातलं राजकारण हा तर प्राचीन खेळ आहे. इव्ह आणि अॅडमइतकाच प्राचीन. फक्त नावं बदलत जातात. खेळ तोच राहतो. ‘बोर्गन‘ राजकारणाच्या वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही पीचवर फ्रंटफूटवर बॅटिंग करतो. मोठ्या देशातल्या राजकारणाला एक ग्लॅमर असतं, ते छोट्या देशातल्या राजकारणाला नसतं. पण ग्रीनलँडसारख्या छोट्या देशातलं राजकारण पण तितकंच क्रूर ,निर्दयी आणि थंड डोक्यानी खेळलेलं असतं. राजकारणी लोकांची वैयक्तिक आयुष्यं, राजकारणाचा त्यावर होणारा परिणाम, आधुनिक राजकारणात असणारं माध्यमांचं महत्व, माध्यमांचा राजकारणातला सहभाग यावर ‘बोर्गन ‘ ही मालिका अप्रतिम भाष्य करते. ‘बोर्गन ‘ बघताना आपल्यासारख्या राजकारणात प्रचंड रस असणाऱ्या देशातल्या पॉलिटिकल सीरिजचा दर्जा आठवतो आणि मन विषण्ण होतं. नेटफ्लिक्सवर एक ‘नॉर्डिक नॉईर ‘ नावाची सब कॅटेगरी आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या नजरेतून एखाद्या गूढ रहस्यमय केसचा घेतलेला आढावा असं या सिरीजचं ढोबळमानाने वर्णन करता येईल. ‘नॉर्डिक नॉईर‘ ही नेटफ्लिक्सवरची सगळ्यात अफाट श्रेणी आहे. अनेक उत्तम सीरिज आणि सिनेमे या कॅटेगरीमध्ये आहेत. बर्फ़ाळ वातावरण, या नॉर्डिक देशांमधला रात्र -दिवसांचा अनोखा खेळ, अख्खा देश थांबवणारी बर्फ़ाळ वादळं, लोकसंख्येची घनता कमी असल्याने एकूणच स्क्रीनवर आपसूक येणारी निर्मनुष्य स्क्रीन, रस्ते आणि फ्रेम्स या, गच्च ओली पण भयाण सुंदर जंगल गोष्टी नॉर्डिक देशांना अशा क्राईम शोज साठी एक आदर्श सेट अप बनवतात. या देशांच्या वातावरणातच काहीतरी गूढ असं, शब्दात पकडता न येण्यासारखं काही तरी आहे. नेटफ्लिक्सवरच उपलब्ध असणारी ‘बॉर्डरटाऊन‘ ही सिरीज बघणं ‘नोईर प्रेमींनी‘ प्रचंड आवश्यक आहे. ह्या सीरिजमधलं मुख्य पात्र असणारा जो डिटेक्टिव्ह आहे त्याला ‘फोटोग्राफिक मेमरी‘ चं वरदान आहे. पण हे स्मृतीचं वरदान आहे की शाप ? सिटीझन केन ‘ मध्ये तो प्रख्यात संवाद आहे न – The greatest curse is memory . तर असा हा यातला वेगळा नायक. नायक असण्याचे पारंपरिक साचे तोडणारा. प्रत्येक सिझनला नवीन खलनायक आहेच. ते पण नायकाइतकेच रोचक आहेत. यातला एक खलनायक सार्वजनिक पाणी पुरवठ्यात विष मिसळून पूर्ण शहर संपवण्याचा प्रयत्न करत असतो. एक व्हिलन भूल देऊन लोकांना मारत असतो. या दुष्ट सुष्ट वृतींमधला लढा म्हणजे ‘बॉर्डरटाऊन ‘. ‘ट्रॅपड ‘ ही अजून एक अफाट नॉर्वेजियन सीरिज. वर उल्लेख केल्याप्रमाणे अनिश्चित आणि क्रूर वातावरण हे ‘नॉर्डिक नॉईर ‘ मधलं एक पात्रंच आहे. ‘ट्रॅपड‘ मध्ये बर्फाच्या दरडी कोसळणं, बर्फाची वादळं बघून बघून एका टप्प्यानंतर आपल्या डोळ्यांच्या साईडला छोटासा बर्फाचा थर साचल्यासारखं वाटायला लागतं. पण बर्फाच्या वादळामुळे एका शहराचा उर्वरित देशाशी संपर्क तुटतो. बाहेरून रसद मिळण्याचे सगळे मार्ग खुंटतात आणि तिथल्या छोट्या पोलीस फोर्ससमोर आव्हान येतं एका गूढ गुन्ह्यांचं. निव्वळ छायाचित्रणासाठी ही सीरिज बघावी. ‘द वोलहला मर्डर्स‘ , ‘द ब्रिज‘ , आणि ‘द किलिंग‘ या पण नॉर्डिक नॉईर श्रेणीतल्या आवर्जून बघण्यासारख्या वेबसिरीज. एखाद्या पावसाळी किंवा थंडीचा कडेलोट झालेल्या हुरहुरत्या संध्याकाळी कॉफीचा भरपूर पुरवठा असताना नॉर्डिक सिरीज बघणं हा परमानंद आहे.
–शामसुंदर महाराज सोन्नर
संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधान कीर्तन मालिका
भाग ३
महिलांनी कीर्तन करू नये, अशा मानसिकतेचे लोक सातशे वर्षांपूर्वी होते. पण वारकरी संतांनी स्रियांचा दाबलेला आवाज खुला केला. मात्र आज त्याच वारकरी संप्रदायाला विषमतावादी वळण देण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. खरं तर वारकरी संप्रदायातील फडकरी मंडळींनी पिढ्यान पिढ्या परंपरा जपत संत चळवळ प्रवाहित ठेवली. मात्र विषमतावादी शक्तींनी आता काही फडक-यांना आपल्या कह्यात घेतले आहे. म्हणूनच आपलं श्रेष्ठत्व आणि वेगळेपण दाखविण्यासाठी काही फडकरी आपल्या फडावर महिलांना कीर्तन करू देत नाहीत.
भारतीय संविधान आणि त्याची तीन मूल्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर जर समाजव्यवस्था निर्माण झाली तर ती समाज व्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होता. घटना समितीमधल्या सर्व महापुरुषांना होता. म्हणून त्यांनी ही तीन मूल्ये संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट केली. जात, धर्म, लिंग यावरून कुणाचा द्वेष केला जाऊ नये, हे घटनेच्या १४ ते १६ अनुच्छेदामध्ये स्पष्ट केलेले आहे. त्यातील जात आणि धर्मावरून कुणाचाही भेद करू नये, हा संविधानात आलेला विचार संत साहित्यात जागोजागी कसा पहायला मिळतो, हे आपण दुस-या भागात पाहिले. या भागात कुणाचा लिंगावरून म्हणजे तो स्री आहे की पुरुष आहे, यावरून भेद केला जाऊ नये याबाबत संत साहित्यात काय उल्लेख आहेत, संतांच्या या प्रबोधन चळवळीत स्री संतांचे योगदान काय आहे, याचा धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न या भागात करणार आहोत.
स्त्रियांची लोकसंख्या ५० टक्के असताना आजही स्त्रियांना जितक्या प्रमाणात संधी मिळायला पाहिजे, तितकी मिळताना दिसत नाही. म्हणूनच सरकारला स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी अस्थापनामध्ये महिलांना खास आरक्षणाची व्यवस्था करावी लागली. परंतु संत चळवळीकडे पाहिले तर कोणताही आरक्षणाचा कायदा नसता मोठ्या प्रमाणात महिला संत दिसतात. या महिला संतांची कामगिरी तितकीच डोळे दीपविणारी आहे. बरं या संत परंपरेत ज्या महिला संत झाल्या यातील कुठलीही पाटलाची मुलगी नाही, कुठली सावकाराची मुलगी नाही, कुठलीही खासदाराची मुलगी नाही. एक संत मीराबाई सोडल्या तर बाकी सर्व महिला संत समाजातील शेवटच्या घटकातील असल्याचे आपल्याला दिसून येतात. आजही कायद्याने स्त्रियांना अनेक अधिकार दिलेले असले तरी स्त्रियांना जितके स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, तितके मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला आरक्षणामुळे महिलांना पद मिळाले पण त्या पदाचा वापर अनेकदा त्यांच्या पतीकडून केला जात असल्याचे पहायला मिळते. मग सातशे वर्षांपूर्वी ही संत चळवळ आकार घेत होती तेव्हा महिलांना किती कठीण प्रसंगातून जावे लागले असेल. परंतु चळवळीने महिलांना मोठ्या प्रमाणात सामील करून घेतले. या महिला संत ज्या परिस्थितीतून आल्या आणि उतुंग काम केले त्याचा नुसता विचार केला तरी थक्क होऊन जायला होतं. आता संत जनाबाईचेच पहा ना! जनाबाईंचे कुळ कोणतं? त्यांचे आई-वडील श्रीमंत होते काय? तर नाही. जनाबाई ही आई-वडिलांशिवाय पोरकी झालेली आणि संत नामदेव महाराजांचे वडील दामाजीशेठी यांच्या घरी वाढलेली एक अनाथ मुलगी होती. शेवटपर्यंत ‘नामयाची दासी‘ म्हणून ती दामाजीशेठी यांच्या घरीच राहिली. एका धुणीभांडी करणाऱ्या दासी महिलेला संतपदी विराजमान करण्याचे औदार्य दाखविणारं जर कोण असेल तर ती संत परंपरा आहे. दुस-या आमच्या सोयराबाई. तत्कालीन समाज व्यवस्थेनुसार त्या अस्पृश्य समाजात जन्माला आलेल्या. त्यामुळे त्यांना गावकुसाबाहेर रहावे लागत होते. त्या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. त्यावेळच्या समाज व्यवस्थेप्रमाणे चोखामेळा यांना गावात वावरायला बंदी होती. मंदिरात जायची बंदी होती. तरीही त्या संत होऊ शकल्या. एखाद्या वेळी गावात राहून धुणीभांडी करणारी, दळणकांडण करणारीबद्दल मनात आपुलकी निर्माण होईल, गावकुसाबाहेर राहणारीबद्दल आपुलकी निर्माण होईल पण महिलांचा एक घटक असा आहे, ज्याबद्दल समाजाला कधीच उघडपणे आपलेपणा वाटणार नाही तो घटक म्हणजे वेश्या. अशा समाजातून तिरस्कारणीय असलेल्या वेश्येची मुलगी असणाऱ्या कान्होपात्राला संतपद बहाल करण्याचं औदार्य जर कोणी दाखवलं असेल तर ते वारकरी संप्रदायानं दाखवलं आहे. संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई पाठक या उच्च कुळात जन्माला आल्या असल्या तरी दोघींनाही तत्कालीन विषमतावादी समाज व्यवस्थेचा खूप त्रास सहन करावा लागला. तरीही सर्व परिस्थितीवर मात करून महिला संत चळवळीत सहभागी झाल्या. तिथे मात्र त्यांना समानतेचा अधिकार देण्याचे काम संत परंपरेने केलेले आहे. महिलांना ज्यावेळी संधी मिळते तेव्हा त्या आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात. संत परंपरेतील या महिला संतांना दिलेल्या समतेमुळे त्यांनी उत्तुंग कार्य केल्याचे दिसते. अर्थात त्यांना तत्कालीन समाजातील विषमतावादी प्रवृत्तीकडून प्रचंड त्रास झाला तरी त्या विरोधाला धीराने सामोरे जात संतांचा समतावादी, विवेकवादी डोळस विचार पुढे घेऊन जाण्यासाठी धीराने पावले टाकलेली दिसतात. त्यातील वानगीदाखल काही उदाहरणे पाहू.
जनाबाईंचे वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका, मुक्ताई यांनी एका वर्षामध्ये समाधी घेतलेली आहे. संत गोरोबा कुंभार आणि संत सावता महाराज यांचे वयपरत्वे देहावसान झाले आहे. संत नामदेव महाराज हे संतांचा समतेचा विचार घेऊन देशभ्रमण करायला निघाले आहेत आणि त्यांनी त्यांचा मोठा कालखंड पंजाबमध्ये व्यतीत केला आहे. नामदेव महाराज पंजाबमध्ये असताना पंढरपूरच्या वाळवंटातील वारकऱ्यांना सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत जनाबाईंनी केलेलं आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की एखादी स्त्री अशा प्रकारचे जर काम करू लागली तर ते पुरुषसत्ताक परंपरेला सहजासहजी सहन होत नाही. जनाबाई धीराने वारकरी परंपरा वाढविण्याचे काम, कीर्तन, भजन, अभंग रचनाच्या माध्यमातून करत होत्या. एक स्री वारक-यांचे नेतृत्व करते आहे, हे पुरुषसत्ताक व्यवस्थेला सहन होण्या सारखे नव्हते. पण जनाबाई यांचं काम इतकं नेक होतं की त्यावर काही आक्षेपही घेता येत नव्हता. स्रीच्या कर्तृत्वावर जेव्हा आक्षेप घेता येत नाही, तेव्हा तिला कमी लेखण्यासाठी तिच्या राहणीमानावर बोट ठेऊन चारित्र्याबाबत संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. जनाबाईंच्याबाबतीत तेच झाले. जनाबाईला बदनाम करण्यासाठी काही लोक म्हणू लागले, “काय ही जनाबाई! बाजारात जाते, डोक्यावरून पदर घेत नाही, तिला पदराचं भान नाही”. अशा लोकांना जनाबाईंनी थेट सांगितलं, केवळ पदर सांभाळण्याची नाही तर वारकरी संप्रदाय सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर नामदेव महाराज यांनी सोपवली आहे. ती जबाबदारी मला अधिक महत्वाची वाटते. म्हणून या पुढे तर मी डोक्यावरचा पदर खांद्यांवर आला तरी भरल्या बाजारातून जाईल….
डोईचा पदर आला खांद्यावरी l
भरल्या बाजारी जाईल मी ll
अशी थेट भूमिका संत जनाबाईंनी घेतली. जेव्हा राहणीमानावर शंका घेऊन जनाबाईला नामोहरम करता येत नाही, असे लक्षात आले तेव्हा तिच्या व्यक्त होण्याच्या स्वतंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला. तुला अभंग लिहिण्याचा, कीर्तन करण्याचा अधिकार नाही, असे सांगून तिच्या प्रबोधन चळवळीलाच थांबविण्याचे कारस्थान रचले गेले. एवढा विरोध पाहून एखादी लेचीपेची स्री सरळ सगळं सोडून घरात बसली असती. पण जनाबाईंची भूमिका इतकी तकलादू नव्हती. त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्या व्यवस्थेला ठणकावून सांगितले-
हातामध्ये टाळ खांद्यावरी वीणाl
आता मज मना कोण करीll
“अरे! मी भजनासाठी हातामध्ये टाळ घेतलेला आहे, कीर्तनासाठी खांद्यावर वीणा घेतलेली आहे, मला मनाई करणारे कोण तुम्ही आहात?
तत्कालीन स्त्रियांना कमी लेखणा-या व्यवस्थेविरोधात लढा देत असतानाच इतर स्त्रियांच्यामध्ये आत्मभान जागृत करताना जनाबाई म्हणतात-
स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास l
साधु संत ऐसे केले जनी ll
महिलांनी कीर्तन करू नये, अशा मानसिकतेचे लोक सातशे वर्षांपूर्वी होते. पण वारकरी संतांनी स्रियांचा दाबलेला आवाज खुला केला. मात्र आज त्याच वारकरी संप्रदायाला विषमतावादी वळण देण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. खरं तर वारकरी संप्रदायातील फडकरी मंडळींनी पिढ्यान पिढ्या परंपरा जपत संत चळवळ प्रवाहित ठेवली. मात्र विषमतावादी शक्तींनी आता काही फडक-यांना आपल्या कह्यात घेतले आहे. म्हणूनच आपलं श्रेष्ठत्व आणि वेगळेपण दाखविण्यासाठी काही फडकरी आपल्या फडावर महिलांना कीर्तन करू देत नाहीत. इतकेच नव्हे तर ज्या गावात त्या फडाची परंपरा आहे तिथल्या लोकांनाही महिलांची कीर्तनं घेण्यास मज्जाव करतात. काही कर्मठ कीर्तनकार तर आपल्या कीर्तनात महिलांना टाळ घेऊनही उभा राहू देत नाहीत. अशा वेळी प्रश्न पडतो की, या कीर्तनकारांना –
या रे या रे लहान थोर lभलते याती नारी नरll
हा अभंग म्हणण्याचा अधिकार आहे का? महिलांना कीर्तन करण्यास प्रतिबंध करण्याबाबत जे कारण दिले जाते ते तर अत्यंत हस्यास्पद आहे. अलिकडेच वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने मुंबईत संत साहित्य संमेलन झाले. यावेळी झालेल्या खुल्या चर्चेत महिलांच्या कीर्तनाचा विषय चर्चेला आला. तेव्हा महिलांनी कीर्तन का करू नये यावर बोलताना एक महाराज म्हणाले, ” महिला कीर्तन करायला उभ्या राहिल्या तर त्यांच्या सौंदर्याकडे पाहून श्रोत्यांच्या मनातील विकार जागे होतात. त्यामुळे कीर्तनातील सात्विकतेला धक्का लागतो. म्हणून महिलांनी कीर्तन करू नये. म्हणजे पुरूषांना आपले विकार काबूत ठेवता येत नाहीत, म्हणून महिलांनी कीर्तन करू नये. वा रे तर्क! कीर्तनात ज्यांचे विकार जागे होतात त्यांची कीर्तनाला येण्याची पात्रता आहे का? अशा पुरूषांना उपदेश करण्यापेक्षा त्यांच्यासाठी महिला कीर्तनकारांच्या कीर्तन करण्यावर बंधन आणणे केवळ भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हननच नाही तर संतांच्या `या रे या रे लहान थोर भलते याती नारी नर` या संत वचनाचा उपमर्द करणारे आहे. आज संविधानाने महिलांना समान अधिकार दिलेले असतानाही जर अशी परिस्थिती असेल तर सातशे वर्षांपूर्वी स्रियांवर किती निर्बंध असतील? सातशे वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल? परंतु त्या काळात पंढरपूरच्या वाळवंटात उभ्या राहिलेल्या संत परंपरेने महिलांना पुरुषांच्या बरोबरोबरीचा अधिकार दिला, ही केवढी क्रांती होती?महिला संतांना वारकरी संप्रदायात समतेचा अधिकार मिळाल्यानंतर या महिलांनी जे विचार मांडले ते अत्यंत धाडसी होते. महिलांच्या मासिक पाळी बद्दल आजही पवित्र-अपवित्र अशा संकल्पना मांडल्या जातात. पण सातशे वर्षांपूर्वी संत सोयराबाई यांनी स्रियांच्या या विटाळाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाने तत्कालीन धर्म मार्तंडांना निरुत्तर केले होते. विटाळाबद्दल त्या लिहितात-
देहासी विटाळ म्हणती सकाळ l
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ll
देहीचा विटाळ देहीच जन्मला l
सोवळा तो झाला कवण धर्म ll
विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान l
कोण देह निर्माण नाही जगी ll
विटाळच उत्पतीच स्थान असून तो नसेल तर देहाची उत्पत्तीच होऊ शकत नाही. हा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा सोयराबाई किती विज्ञानवादी होत्या, हे सिद्ध करतो. त्यांचे हे धाडसी विचार आजही विचार करायला लावणारे आहेत. मासिक पाळी बद्दल बुरसटलेल्या कल्पना घेऊन जगणारांना सोयराबाईने दिलेली ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. संत चळवळीतील इतरही संतांचे कार्य खूपच मोलाचे आहे. ज्यात मुक्ताबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, निर्मळा यांनी अभंगातून मांडलेले विचार आजही तितकेच टवटवीत आहेत.
मुक्ताबाईंचे तर वारकरी संप्रदायावर खूप मोठे उपकार आहेत. मुक्ताबाई नसत्या तर ज्ञानेश्वरीच लिहून होऊ शकली नसती. आळंदीतील कर्मटांनी ज्ञानेश्वर महाराज यांचा छळ केला. त्यांनी भिक्षा मागून आणलेले पीठ हिसकावून मातीत मिसळले तेव्हा उद्विग्न होऊन ज्ञानेश्वर महाराज आपल्या झोपडीची ताटी लावून बसले. केवळ संन्याशाची मुलं म्हणून विषमतावादी क्रूर व्यवस्थेकडून होणारा छळ सहन न होऊन ज्ञानेश्वर महाराज यांनी या जगाशी कायमचा संबंध संपवून टाकण्याचा निर्धार करून झोपडीची ताटी बंद केली होती. तेव्हा मुक्ताबाई यांनी ज्ञानेश्वर महाराज यांची समजूत काढली. ही समजूत काढण्यासाठी मुक्ताबाई यांनी जे ताटीचे अभंग लिहिले त्यात ख-या संतांची लक्षणे सांगितलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराज यांना मुक्ताबाई सांगतात.
विश्व रागे झाले वन्ही l
संती सुखे व्हावे पाणी ll
शब्द शस्त्रे झाला खेद l
संती मानावा उपदेश ll
संपूर्ण विश्व रागाने आगी सारखे तप्त झाले असेल तर संतांनी पाण्यासारखे शीतळ झाले पाहिजे. कठोर शब्दामुळे मनाला खेद होत असतील तर संतानी तो उपदेश समजावा, अशी समजूत घालून दया क्षमा ज्याच्या अंगात आहे, त्यालाच संत म्हणावे, असे मुक्ताबाई म्हणतात. संत कुणाला म्हणावे हे सांगत असतानाच संत कुणाला म्हणू नये हे सांगताना मुक्ताबाई लिहितात-
वरी भगवा झाला नामे l
अंतरी वश केला कामे ll
त्याशी म्हणू नये साधू l
जगी विटंबना बाधू ll
केवळ नावाला भगवे कपडे घातले असतील आणि अंतःकरणात कामाने वश केलेला असेल तर त्याला साधू म्हणू नये, असेही मुक्ताबाई सांगतात. आपण सुख सागर होऊन बोधाने जगाला निववावे, अशी समजूत मुक्ताबाई काढतात आणि ज्ञानेश्वर महाराज यांना-
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
अशी साद घालतात. लहानग्या मुक्ताबाईने विवेक जागा केल्याने ज्ञानेश्वर महाराज झोपडीचा दरवाजा उघडतात. पुढे समाजात अखंड ज्ञानगंगा प्रवाहित राहील अशी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरीपाठा ही साहित्य रचना करतात. वारकरी संप्रदायाचा पाया होण्याचा मान त्यांना मिळतो तो मुक्ताबाई यांनी काढलेल्या समजुतीमुळे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या संत बहिणाबाई शिवूरकर यांनी तर-
संत कृपा झाली lइमारत फळा आली ll
या अभंगाद्वारे वारकरी संप्रदायाचे डॉक्युमेंट करून ठेवलेले आहे. केवळ स्रिया म्हणून महिलांना जी दुय्यम वागणूक दिली जात होती, ती दूर करून संत चळवळीने त्यांना बरोबरीचे स्थान दिले. त्याचेच प्रतिबिंब आपल्याला संविधानात दिसते.
भारतीय संस्कृतीमध्ये संतांच्या प्रबोधन चळवळीने स्त्रियांविषयी एक उदार दृष्टिकोन या मातीत रुजवला. आणि याचेच प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानामध्ये पाहायला मिळाले. भारतीय संविधानाने महिलांना जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या बळावर या देशातल्या अनेक महत्त्वाच्या पदांवर महिलांना बसण्याचा मान मिळाला यावरून आपलं संविधान किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला दिसून येतं. देशामध्ये राष्ट्रपतीपद हे घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पद मानलं जातं. या राष्ट्रपतीपदावर बसण्याचा मान आपल्याच महाराष्ट्राच्या कन्या असणार्या प्रतिभाताई पाटील तसेच द्रौपदी मुर्मू यांना मिळाला. पंतप्रधानपदी बसण्याचा मान एका महिलेला इंदिरा गांधी यांच्या रूपाने मिळाला. इंदिरा गांधीनी आपल्या कारकिर्दीत मजबूत आणि कणखर भूमिका घेत त्यांनी ज्या ज्या वेळी परकीय आक्रमणे झाली त्यावेळी देशाचा प्रमुख म्हणून देशाचे रक्षण केले आहे. भारताला पाकिस्तानचा वेळोवेळी डिवचण्याचा प्रयत्न असतो. अशावेळी इंदिरा गांधींनी सर्जिकल स्ट्राइकसारख्या भानगडी न करता थेट पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले. हा भारतीय संविधानाने एका महिलेला दिलेला अधिकार आणि त्या अधिकाराचा त्यांनी केलेला योग्य वापर आपल्याला दिसून येतो. भारताचा राज्यकारभार चालवणारे लोकसभा हे एक सभागृह आहे. या लोकसभेच्या पीठासनपदी बसण्याचा मानसुद्धा मीराकुमार, सुमित्रा महाजन यांच्या रूपाने महिलांना मिळाला. अशा विविध क्षेत्रांत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने आघाडी घेतली आहे. आपले संविधान प्रगल्भ आणि मजबूत असल्याचे हे लक्षण आहे. या संविधानाची मूल्ये जर संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये रुजली तर खऱ्या अर्थाने आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकेल असा विश्वास मला वाटतो.
एका गावात एका गाढवावर बसून एक साधू आला.
गावातल्या एका माणसाने त्याला आश्रय दिला, त्याची त्या साधूवर श्रद्धा बसली. त्याने साधूची खूप सेवा केली. गावातले लोकही त्या साधूला मानू लागले. होता होता एक दिवस साधूला त्या गावातला मुक्काम आवरता घेण्याची इच्छा झाली. त्याने एके रात्री बाडबिस्तरा आवरला आणि दुसऱ्या गावाला प्रयाण केलं. आपल्या परमभक्ताला सांगून निघालो, तर तो ऐकायचा नाही, जाऊ द्यायचा नाही, आपल्यासोबत येण्याचा हट्ट करेल, या भीतीने त्याने गुपचूप प्रयाण केलं. इतक्या दिवसांच्या सेवेचं काहीतरी फळ द्यायला हवं म्हणून त्याने गाढव मागे सोडलं. त्या माणसाला ते मेहनतीच्या कामांमध्ये उपयोगी पडेल, असा त्याचा होरा होता.
पण, परमभक्ताची जेवढी श्रद्धा साधूवर होती, तेवढीच त्याचं वाहन असलेल्या गाढवावरही होती. त्या गाढवात त्याला साधूचीच स्थितप्रज्ञता दिसली असावी. त्याने त्याचा ओझी वाहण्यासाठी उपयोग केला नाही. उलट त्याला साधूचा आशीर्वाद मानून त्याचीही पूजा सुरू केली. रोज त्याची आरती होऊ लागली, त्याच्या गळ्यात हार पडू लागले, शेंदराचे टिळे लागायला लागले. ज्याअर्थी हा परमभक्त गाढवाची पूजा करतोय, त्याअर्थी त्यात काही ना काही दैवी शक्ती असणार, अशी गावकऱ्यांचीही समजूत झाली. त्यांनीही पूजाअर्चा सुरू केली.
दोन दिवस पूजा करणारा माणूस तिसऱ्या दिवशी नवस मागितल्याशिवाय राहात नाही. तसंच झालं. मूल होऊदेत, मुलगाच होऊदेत, पीक जोरदार येऊदेत, व्यवसायात बरकत येऊदेत, अभ्यास न करता पहिला नंबर येऊ दे, काही न करता ढीगभर पैसे मिळूदेत असे नाना तऱ्हेचे नवस लोक गाढवाकडे बोलू लागले. ज्यांची इच्छापूर्ती होत नसे, ते नशिबाला बोल लावत; ज्यांना फळ मिळत असे, ते गाढवाला श्रेय देत.
गाढवाचा बोलबाला वाढला. त्याचा मठ उभा राहिला. गर्दभमहाराजांचे प्रतिपाळकर्ते म्हणून परमभक्ताला मानसन्मान, पैसाअडका, जमीनजुमला असं सगळं मिळत गेलं.
वयोमानाप्रमाणे एक दिवस गाढवाचा मृत्यू झाला आणि परमभक्त धाय मोकलून रडू लागला. त्याला गाढवाचा लळा लागला होताच. पण, त्याचबरोबर गाढवाबरोबर आपलं ऐश्वर्यही लयाला जाणार, याची भीती अधिक दाटली होती. नेमका त्याचवेळी त्याच गावातून जात असलेला तोच साधू पुन्हा त्याला शोधत शोधत त्याच्याकडे आला. आपण याच्याकडे सोडलेल्या गाढवाला याने गर्दभमहाराज बनवलंय, हे पाहिल्यावर तो थक्क झाला.
व्यथित परमभक्ताने गाढवाच्या मृत्यूनंतर ओढवलेल्या परिस्थितीची माहिती दिल्यावर साधू हसला आणि त्याने भक्ताच्या कानात उपदेश करून पुन्हा प्रस्थान ठेवलं…
…काही दिवसांतच मठात गर्दभमहाराजांची भली मोठी मूर्ती वाजत गाजत आणली गेली, तिची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मठ पुन्हा गजबजला, पूजा पुन्हा सुरू झाली, नवस पुन्हा बोलले जाऊ लागले…
गर्दभसंप्रदाय पुन्हा फोफावू लागला.
-मुकेश माचकर
एका गावात एक शेतकरी आणि एक व्यापारी राहात होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला दर आठवड्याला पाच किलो गहू जायचा आणि शेतकऱ्याकडून दर आठवड्याला पाच किलो ज्वारी किंवा बाजरी व्यापाऱ्याकडे जायची. हा त्यांचा वर्षानुवर्षांचा व्यवहार होता.
दोघांमध्ये एकदा कडाक्याचं भांडण झालं. दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाकलं. पण, दोघांमधला व्यवहार सुरू राहिला. एक दिवस व्यापाऱ्याला शंका आली की शेतकऱ्याकडून आलेली ज्वारी पाच किलो नसावी. त्याने त्याच्याकडच्या काट्यावर तोलून पाहिली. ती साडेचार किलो भरली. पुढच्या वेळी चार किलोच ज्वारी आली.
तो खूप संतापला. त्याने शेतकऱ्याला धडा शिकवायचा निर्धार केला. पंचायतीत तक्रार केली.
पंचायतीत जाहीर सुनावणी झाली. पंचांनी शेतकऱ्याला विचारलं, तू व्यापाऱ्याला का फसवतोस? शेतकरी म्हणाला, भांडण झालं म्हणून मी मापात पाप करीन हे शक्यच नाही. व्यापारी भडकून म्हणाला, आता निदान खोटं तरी बोलू नकोस. माझ्याकडच्या काट्यावर तोलून पाहिलीये मी ज्वारी. पाच किलोच्या जागी कधी चार किलो, कधी साडेचार किलो.
शेतकरी तरीही मानायला तयार नव्हता. तेव्हा पंच वैतागून म्हणाले, तुझ्याकडच्या वजनांमध्ये काही गडबड आहे का? शेतकरी म्हणाला, मी काय व्यापारी आहे का वजनं ठेवायला? माझ्याकडे वजनं नाहीत.
पंच म्हणाले, मग तू व्यापाऱ्याला पाच किलो ज्वारी कशी तोलून देतोस?
शेतकरी म्हणाला, त्याच्याकडून दर आठवड्याला जो पाच किलो गहू येतो, तीच पिशवी मी तागडीत एका बाजूला टाकतो आणि तेवढीच ज्वारी मापून पाठवतो.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून पहिल्याच दिवशी स्थगित झालेल्या कामकाजावरून त्याची कल्पना येऊ शकते. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएच्या दणदणीत विजयामुळे सत्ताधा-यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला असला तरीसुद्धा विरोधकांच्याकडे सरकारला अडचणीत आणण्यासाठी अनेक विषय आहेत. त्यामुळे वारंवार गोंधळाचा अनुभव येऊ शकेल. खरेतर गोंधळाऐवजी चर्चा करून आपापले म्हणणे मांडले तर त्यातून देशवासीयांना संबंधित प्रश्नांचे गांभीर्य लक्षात येऊ शकेल आणि त्यावरून लोक आपली भूमिका तयार करू शकतील. परंतु माध्यमांचा प्रभाव वाढल्यामुळे त्यातही चोवीस तास वृत्तवाहिन्यांचा मोठा प्रभाव असल्यामुळे दृश्य बाबींनाच अधिक ठळक प्रसिद्धी मिळते. त्यासाठी अनेकांचा आटापिटा असतो, त्यामुळे गंभीर चर्चेऐवजी गोंधळ घालण्याबरोबरच आणि विचित्र कृती करून लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकांचे प्राधान्य असते. संसदेतील चर्चेची आणि गंभीर भाषणांची परंपरा त्यामुळे खंडित होत चालली आहे. गोंधळी खासदार हेच उत्तम संसदपटू असल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. कोणत्याही विषयावर चर्चेची तयारी असल्याचे सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात सरकारला अनेक विषयांवर चर्चा घडू द्यायची नाही. त्यातही उद्योगपती गौतम अदानी ही सरकारची दुखरी नस आहे आणि त्यांच्यासंदर्भात कोणतीही चर्चा होणे सरकारसाठी अडचणीचे ठरणारे आहे. त्याचमुळे अमेरिकन कोर्टाने दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल इथे चर्चा करण्याची गरज नसल्याची भूमिका सत्ताधारी मांडत आहेत. काँग्रेससह विरोधकाना ठाऊक आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारसाठी अदानींचा विषय अडचणीचा आहे. अलीकडच्या काळात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने अदानी-अंबानी यांना लक्ष्य केले आहे. हम दो हमारे दो हे सरकारचे धोरण असल्याचे सांगितले आहे. अदानींवर सरकारकडून केल्या जाणा-या मेहेरबानीवरून कितीही टीका केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराच्या भाषणात कधी अदानी या नावाचा उल्लेखही केलेला नाही. आताही अमेरिकेतील प्रकरणावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधक सातत्याने करतील आणि तोच गोंधळाचा प्रमुख मुद्दा असेल.
संसदेत कायदे करताना बहुमत महत्त्वाचे ठरते, परंतु संसदीय आयुधांचा प्रभावी वापर केला तर बहुमताच्या पलीकडे जाऊन संसदेच्या व्यासपीठावरून अनेक जनहिताच्या गोष्टी साध्य करून घेता येतात. त्यामुळे निवडणुकीतील जय-पराजयामुळे खचून न जाता काँग्रेस पक्ष आणि अन्य विरोधक संसदेच्या अधिवेशनाला आत्मविश्वासाने सामोरे गेले, तर लोकांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न मार्गी लावू शकतात. सरकारला अडचणीत आणू शकतात. अदानींबरोबरच मणिपूर हाही सरकारसाठी अडचणीचा दुसरा मुद्दा आहे. पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याच्या बढाया मारणा-या सत्ताधा-यांना मणिपूरमधील हिंसाचाराचे उत्तर द्यावे लागेल. सरकारने मणिपूरच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून पंतप्रधान मणिपूरकडे एकदाही फिरकलेले नाहीत. तेथील हिंसाचारापेक्षा मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्यासाठीच सत्ताधा-यांचे प्राधान्य असल्याचे दिसून आले आहे. वाढते रेल्वे अपघात, वक्फ बोर्ड, वन नेशन वन इलेक्शन असे इतरही काही महत्त्वाचे विषय आहेत. संसदेच्या कार्यसूचीमध्ये सोळा विधेयांचा समावेश असून त्यात पाच नवी विधेयके आहेत. इतर अकरा विधेयके आधीपासूनच लोकसभा किंवा राज्यसभेत प्रलंबित असलेली आहेत. नव्या विधेयकांध्ये सहकार विद्यापीठाशी संबंधित विषय महत्त्वाचा आहे. अधिवेशन सुरळीत चालवण्याच्या अनुषंगाने सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी बैठका घेतल्या, त्याचबरोबर विरोधकांनीही एकत्र येऊन सरकारची कोंडी करण्यासंदर्भातील व्यूहरचना आखली आहे. मात्र विरोधकांच्यातील एकीही महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील पराभवावरून तृणमूल काँग्रेसने पुन्हा काँग्रेसला लक्ष्य केले आहे. दिल्लीच्या राजकारणात आपणच श्रेष्ठ असल्याच ममता बॅनर्जी यांचा जो अहंकार आहे, त्याला खतपाणी घालण्याचे काम तृणमूलचे भाट करीत राहणार. इतर पक्षही काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे सरकारशी लढण्यासाठी जो एकोपा आवश्यक आहे, तो विरोधक दाखवणार की नाही हा खरा प्रश्न आहे. विरोधक सक्षम असल्याशिवाय लोकशाही निरोगी आणि निकोप राहू शकत नाही. ते सक्षम नसतील तर सत्ताधारी मुजोर बनतील आणि त्यातून लोकांचे हित बाजूला राहील, लोकविरोधी धोरणे राबवली जातील. महाराष्ट्रात विरोधक दुबळे झाले आहेत, परंतु लोकसभेत विरोधक मजबूत आहेत, त्यांनी सत्तेवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न एकजुटीने करण्याची गरज आहे.
कागल : प्रतिनिधी ; रामकृष्णनगर (ता. कागल) येथील आदिती सुनील पाटोळे हिची भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. (Aditi Patole)
पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गहुंजे स्टेडियममध्ये महाराष्ट्र संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातून अनेक मुली सहभागी झाल्या होत्या. आदिती ही फलंदाज असून, तिने जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती. त्याचीच दखल घेऊन एमसीएच्या समितीने आदितीची महाराष्ट्र राज्य संघ निवड चाचणीला निमंत्रित केले आहे. (Aditi Patole)
या चाचणीतून निवडलेल्या महाराष्ट्र संघाचे कटक व भुवनेश्वर येथे स्टेडियममध्ये साखळी पद्धतीने सामने होणार आहेत. महाराष्ट्राच्या गटात आंध्र प्रदेश, उत्तराखंड, पांडेचरी, हिमाचल प्रदेश, मेघालय या संघांचा समावेश आहे. आदितीही सध्या पुण्यात शिकत असून, तिला कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव मदन शेळके यांचे, तर अनिल सांगावकर, ज्योती काटकर, मोहन चव्हाण, चेतन सावरे, खालील शेख, साई हायस्कूलचे सरदार पाटील, पुण्याचे सागर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. वडील सुनील पाटोळे यांचे प्रोत्साहन मिळत आहे. या निवडीने अदितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
झाशी : वृत्तसंस्था : बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांची हिंदू एकता यात्रा उत्तर प्रदेशातील झाशी येथे पोहोचली. या प्रवासादरम्यान एक विचित्र घटना घडली. प्रवासादरम्यान कोणीतरी बाबांवर मोबाईल फेकून मारला. मोबाईलने बाबांच्या गालाला स्पर्श केला; पण बाबांनी ते हलकेच घेतले आणि या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली.
हिंदू एकता यात्रेच्या सहाव्या दिवशी बाबा धीरेंद्र शास्त्री आपल्या भक्तांसह पायी जात असताना ही घटना घडली. बाबा माईकवरून भक्त आणि समर्थकांना संबोधित करत असताना कोणीतरी मोबाईल फेकून मारला. तो बाबांच्या गालावर लागला. यानंतर बाबा म्हणाले, ‘आम्हाला कोणीतरी फुलांसह मोबाईल फेकून मारला आहे. आम्हाला मोबाईल सापडला आहे.’ या घटनेनंतर बाबांनी गांभीर्याने न घेता हा आपल्या प्रवासाचा एक भाग मानून पुढे जाण्याचा संदेश दिला. धीरेंद्र शास्त्री यांच्या या यात्रेला २१ तारखेरपासून सुरुवात झाली असून आजपर्यंत त्याला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. ते झाशीला पोहोचले तेव्हा प्रवासाचा सहावा दिवस होता आणि या वेळी हजारो लोक त्यांच्यासोबत चालत होते.
यात्रा मार्गांवरून जिथे जाईल तिथे भाविकांकडून फुलांनी स्वागत केले जाते. जनतेचा पाठिंबा आणि लोकांचा या यात्रेवर असलेला विश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे. या यात्रेत काही प्रसिद्ध व्यक्तीही सहभागी झाल्या आहेत. अभिनेता संजय दत्त आणि द ग्रेट खली देखील सहभागी झाले होते. याशिवाय भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, भाजप आमदार राजेश्वर शर्मा आणि काँग्रेसचे आमदार जयवर्धन सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनीही यात्रेला पाठिंबा दिला आहे.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, की समाजातील जातीय भेदभाव संपवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. ‘जाती-जातीला निरोप द्या, आम्ही सारे हिंदू बांधव आहोत’ अशा घोषणा त्यांनी यात्रेदरम्यान दिल्या. बाबांनी आपल्या भक्तांना संघटीत होऊन सनातन धर्म मजबूत करण्याचे आवाहन केले आणि समाजात कोणताही भेदभाव नसावा. समाजात एकता वाढवून सनातन धर्माला प्रगतीच्या दिशेने नेणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
बंधुता आणि समता वाढवण्यावर भर
धीरेंद्र शास्त्री यांची हिंदू एकता यात्रा केवळ धार्मिक एकतेचा संदेश देत नाही, तर समाजात बंधुता आणि समता वाढवण्याचाही प्रयत्न आहे. प्रवासादरम्यान घडलेल्या मोबाईल फेकीच्या घटनेने काही काळ लक्ष वेधून घेतले; पण बाबांनी ते मनावर घेतले नाही.