निंगबो : आशिया चॅन्पियनशीप अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचा किरण जॉर्जने एकेरीत, तर हरिहरन अम्साकरुणन-रुबेन रेठीनासबापती जोडीने पुरुष दुहेरीत विजय नोंदवले. लक्ष्य सेन, एच. सी. प्रणॉय, मालविका बनसोड, आकर्षी कश्यप, अनुपमा उपाध्याय या भारतीय खेळाडूंना मात्र एकेरीत पराभव पत्करावा लागला. (Kiran George)
चीनमधील निंगबो येथे ही स्पर्धा सुरू आहे. पुरुष एकेरीमध्ये सलामीच्या सामन्यात किरणने कझाखस्तानच्या दिमित्री पनारिनचा अवघ्या ३५ मिनिटांत २१-१६, २१-८ असा सहज पराभव केला. पुढील फेरीत किरणसमोर थायलंडचा तृतीय मानांकित कुनलावत वितिदसार्नचे आव्हान आहे. या गटातील अन्य सामन्यांत चीनच्या गुआंग झू लूने प्रणॉयला १ तास ८ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१६, १२-२१, २१-११ असे हरवले. या सामन्यामध्ये पहिला गेम गमावल्यानंतर प्रणॉयने दुसरा गेम जिंकून बरोबरी साधली होती. परंतु, तिसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्ध्यासमोर त्याचा टिकाव लागला नाही. लक्ष्य सेनला तैपेईच्या चिया हाओ लीकडून १८-२१, १०-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. लीने हा सामना अवघ्या ३५ मिनिटांमध्ये जिंकला. (Kiran George)
महिला एकेरीमध्ये चीनच्या फांगजिए गाओने मालविकावर ३७ मिनिटांमध्ये २१-१४, २१-८ अशी मात केली. थायलंडच्या आठव्या मानांकित रॅचनॉक इंतेनॉनने अनुपमाला ३६ मिनिटांत २१-१३, २१-१४ असे नमवले. चीनच्या द्वितीय मानांकित युए हानने आकर्षीला २१-१३, २१-७ असे पराभूत केले. भारताच्या या तीन खेळाडू पहिल्याच फेरीत गारद झाल्यामुळे महिला एकेरीतील भारताच्या सर्व आशा पी. व्ही. सिंधूवर टिकून आहेत. (Kiran George)
पुरुष दुहेरीत हरिहरन-रुबेन यांना सलामीच्या सामन्यात सोपा ड्रॉ मिळाला. त्याचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी मधुका दुलंजाना-लाहिरू वीरासिंघे या श्रीलंकन जोडीला अवघ्या १९ मिनिटांत २१-३, २१-१२ असे हरवले. पुढील फेरीत मात्र ॲरन चिया-वूई यिक सोह या मलेशियाच्या सहाव्या मानांकित जोडीविरुद्ध होणारा सामना त्यांचा कस पाहणारा ठरेल. पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय-के. साई प्रतीक ही भारताची दुसरी जोडी मात्र पुरुष दुहेरीत सलामीलाच गारद झाली. तैपेईच्या ची-लिन वँग-सियांग चिए चिऊ या जोडीने पृथ्वी-साई जोडीचा ३५ मिनिटांत २१-१९, २१-१२ असा पराभव केला. भारताच्या स्मृती मिश्रा-प्रिया कोंजेंगबाम या जोडीला महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चिएन हुई यू-शुओ यून सुंग या तैपेईच्या जोडीने स्मृती-प्रिया यांना २१-११, २१-१३ असे सहज पराभूत केले. (Kiran George)
हेही वाचा :
चार सुवर्णांसह भारत अग्रस्थानी