मुंबई; विशेष प्रतिनिधी : कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की, आणखीन काही कारण असो, या दुर्घटनेतील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. (Varsha Gaikwad)
कुर्ला रेल्वे स्टेशन जवळील एस. जी. बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. यात सात जणांचा मृत्यू झाला तर, अनेक जण जखमी झाल्याची बातमी मन पिळवटून टाकणारी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यावी तसेच पीडित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत केली पाहिजे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मृतांच्या वारसांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळणारी आहे. ही मदत अत्यंत तुटपंजी असून मृतांच्या वारसांना प्रत्यकी २५ लाख रुपये दिले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
बेस्ट प्रशासन मागील काही वर्षांपासून बसेस चालविण्यासाठी भाडेकरार प्रक्रिया राबवत आहे. याअंतर्गत बसच्या देखभालीपासून ते बसमधील चालक-कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेपर्यंतची सर्व कामे कंत्राटावर नियुक्त कंपन्यांकडून केली जात आहेत. ही प्रणाली लागू झाल्यापासून मुंबईतील बस प्रवाशांनी त्यातील अनेक उणिवा निदर्शनास आणून दिल्या आहेत. या व्यवस्थेत बसेस आणि बस कर्मचाऱ्यांच्या देखभालीवर सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. तसेच कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षणही दिले जात नाही. कुर्ला अपघातातील बसही या प्रणालीअंतर्गत येत असून या बसचा चालकही कंत्राटी कर्मचारी आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असे भाडेकरार त्वरित रद्द करावेत ,अशी मागणी त्यांनी केली आहे. (Varsha Gaikwad)
मुंबई महानगरपालिकेत दोन वर्षांपासून निवडून दिलेले नगरसेवक नाहीत. प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारचा मनमानी कारभार सुरु आहे, बीएमसीला कोणी वाली राहिलेला नाही. असे त्यांनी सांगितले आहे.
कुर्ला रेल्वे स्टेशन जवळील एस जी बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसनं अनेकांना चिरडल्याची अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली असून यामध्ये काही जणांचा दुर्दैवी मृत्यू व अनेक जण जखमी झाल्याची बातमी मन पिळवटून टाकणारी आहे. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.… pic.twitter.com/rautymjruM
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 9, 2024
हेही वाचा :