राधानगरी : भुदरगड विधानसभेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅटट्रिक केली आहे. या मतदारसंघातून हॅटट्रिक करणारे आबिटकर पहिले आमदार ठरले आहेत. यावेळी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत महायुती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकरांनी प्रारंभापासूनचे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवले. परिणामी तालुक्यात दोनदा निवडून आलेला आमदार तिसऱ्यांदा निवडून येत नाही या शक्यतेला आबिटकरांनी सुरुंग लावला. गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे याही वेळी ३८,५७२ मताधिक्याने विजय मिळविला आहे. गेली दहा वर्षे केलेली कामे, तरुण चेहरा, युवावर्गाचा पाठिंबा, कामाची तत्परता, मतदारसंघातील जनसंपर्क व वाड्या-वस्त्यांपर्यंत असलेला वावर या आबिटकरांच्या जमेच्या बाजू होत्या. (Prakash Abitkar)
Maharashtra Assembly Elections 2024
सातारा, प्रतिनिधी : अतंत्य चुरशीने झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का हा महायुतीच्या फायद्याचा ठरला आहे. जिल्ह्याने पहिल्यांदाच शरद पवारांची साथ सोडताना काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांना पराभवाची धुळ चारली आहे. जिल्ह्यातील आठही मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकला असून महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी न झाल्याने तीन्ही पक्षांचा जिल्ह्यात सुफडासाफ झाला आहे. (Satara Election)
विधानसभा निवडणूक लागल्यापासून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रावर जास्तीचे लक्ष दिले होते. एकीकडे बालेकिल्ला सावरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी खास प्रयत्न केले होते. तर, दुसरकीकडे पवारांचा हाच बालेकिल्ला हस्तगत कण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रचाराची आखणी केली होती. असे असले तरी शरद पवारांच्या सभांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून सातारा जिल्ह्यात कराड उत्तर, फलटण, कोरेगाव, माण हे मतदारसंघ त्यांच्या पक्षाला मिळतील असे अनेकांचे अंदाज होते.
मात्र, हे अंदाज फोल ठरवत कराड उत्तरमधून भाजपाचे मनोज घोरपडे यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पराभव केला. कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा दुसर्यांदा पराभव केला आहे. माणमधून भाजपाचे जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे प्रभाकर घार्गे यांचा पराभव करून विजयाचा चौकार मारला आहे. कराड दक्षिण या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा जिंकतील असे वाटत होते. मात्र, भाजपाचे अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून जायंट किलर म्हणून विधानसभेत जाणार आहेत.
सातारा मतदारसंघात भाजपाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे अमित कदम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अरूणादेवी पिसाळ यांचा पराभव करून विजयाचा चौकार मारला आहे. फलटण मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षापेक्षा मोठा धक्का रामराजे नाईक निंबाळकर यांना असून गेली तीस वर्षे त्यांचे वर्चस्व असलेल्या त्यांच्या मतदारसंघ दीपक चव्हाण यांचा पराभव भाजपाच्या सचिन पाटील यांनी केला. पाटण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे हर्षल कदम आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर सत्यजित पाटणकर यांचा पराभव केला आहे. (Satara Election)
सातारा जिल्ह्यात आठपैकी एकाही मतदारसंघात महाविकास आघाडीला विजयी होता आले नसल्याने सातारा आता भाजपाचा आणि महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे चित्र आहे. बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे दीपक चव्हाण यांचे पराभव हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीला सातारा जिल्ह्यातून क्लीन स्वीप मिळालेला आहे. 1978 ते 1999 काँग्रेसचा त्यानंतर 1999 ते 2024 पर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा आता महायुतीचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे . भारतीय जनता पार्टीने अतिशय कौशल्यपूर्ण अशी राजकीय डावपेच आखत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेला जिल्हा ताब्यात घेतला. या निकालामुळे जोशात असलेेली महायुती आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड देण्यासाठी तयार झाली आहे.
ठळक मुद्दे
- आ.जयकुमार गोेरे, आ.मकरंद पाटील चौथ्यांदा विधाससभेत
- आ.सचिन पाटील,आ.मनोज घोरपडे,आ.अतुल भोसले पहिल्यांचा विधानसभेत जाणार
- आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले मताधिक्याने पाचव्यांदा विधानसभेत
- आ. महेश शिंदे दुसर्यांचा विधानसभेत
- आ.शंभूराज देसाईं, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात पालकमंत्री पदासाठी चुरस
- विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे यांची पराभवाची मालिका सुरूच
या दिग्गजांचा पराभव
या दिग्गजांचा पराभव काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,कराड उत्तरचे सलग पाचवेळा आमदार असलेले माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, फलटणचे तीनवेळा आमदार राहिलेले दीपक चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
जयसिंगपूर; प्रतिनिधी : शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे ४१ हजार १९६ मताधिक्याने विजयी झाले आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून राजेंद्र पाटील यड्रावकर प्रत्येक फेरीत आघाडी घेतली. साडेबाराच्या सुमारास शिरोळ मधील ३०७ मतदान केंद्रावरील १२ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मत मोजणी झाली. यात महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. तर स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांना जोराचा धक्का बसला असून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. शिरोळ तालुक्यातील जनतेने विकास कामांना प्राधान्य दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. गत विधानसभेत राजेंद्र पाटील यड्रावकर २७००० च्या फरकांनी निवडून आले होते. (Rajendra Patil Yadravkar)
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्याच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज (दि.२३) सकाळी ११ पर्यंत आकडेवारीनुसार भाजप १२७ जागांवर आघाडीवर आहे. तर, महायुती २१५ जागांवर आघाडीवर आहे. निवडणुकीचा निकाल पाहून प्रविण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, भाजप महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे. तर, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच इतके मोठे यश मिळवले आहे.
ही आहेत भाजपच्या विजयीची कारणे :
लाडकी बहीण योजना
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात लाडकी बहिण योजना राबवली होती. या योजनेतून राज्य सरकारच्या वतीने लाभार्थी महिलांना महिन्याला १,५०० रूपये देण्यात येत आहेत. यासह महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात सरकार आल्यास २१०० रूपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा महायुतीला झाला आहे.
सज्जाद नोमाणींचं विधान
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमाणी यांनी एक विधान करुन राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यावरुन भाजपने वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केला होता.
‘बटेंगे तो कटेंगे’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात बदल करत ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला होता. यामुळे राज्यातील हिंदू मते आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आले आहे.
जरांगेंचा तो निर्णय
राज्यात मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात फुट निर्माण झाली होती. आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी अनेक मागण्या केल्या होत्या. परंतु, महायुती सरकारने त्या मान्य केल्या नाहीत. यामुळे ओबीसी मतदार महायुतीच्या बाजूने होते. याचा निवडणूकीत महायुतीला फायदा झाला.
मुंबई : प्रतिनिधी : राज्यात कोणाचे सरकार येणार? हे उद्या (ता.२३) समजणार आहे. त्यामुळेच राजकीय गोटातही मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून आता अपक्ष, बंडखोर यांच्याशी संपर्क साधला जात आहे. दरम्यान, एकीकडे सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागलेली असताना दुसरीकडे राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे हे आपापल्या पक्षातील नेतेमंडळींशी संवाद साधत आहेत. एकूणच सत्तेसाठी जोर-बैठका सुरू असल्याचे चित्र शुक्रवारी दिवसभर दिसत होते.
याबाबत शिंदे उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झाले, हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात, मतमोजणी संपताना सी-१७ फॉर्मवरील माहिती काय होती आणि मतमोजणीवेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे, हे तपासण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीत महाविकास आघाडी १५७ जागांपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. असे असले तरी प्रत्यक्ष निकाल काय लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार, की महायुतीची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. शनिवारी निकाल लागण्यापूर्वी शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलान बैठक पार पडली. बैठकीत मतमोजणीविषयी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती मिळाली. सोबतच महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार याबाबत उमेदवारांना सांगितल्याची माहिती आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीचे ‘एक्झिट पोल’ जाहीर झाले असून, महायुती आणि महाआघाडी या दोघांनाही बहुमताचा १४५ हा जादुई आकडा गाठणे अवघड असल्याचे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसने हमखास निवडून येणाऱ्या आपल्या बंडखोरांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यावर काँग्रेसच्या पदरात १०१ जागा पडल्या. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. यात रामटेक मतदारसंघातील बंडखोर राजेंद्र मुळक आणि सोलापूरचे धर्मराव काडादी हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या बंडखोरांशी संपर्क साधला आहे. आबा बागूल, सुरेश जेथलिया, मनीष आनंद, कल्याण बोराडे, जयश्री पाटील, अविनाश लाड या अपक्ष निवडणूक लढलेल्या उमेदवारांशी काँग्रेसने संपर्क साधला आहे. राहुल मते या बंडखोरांना सहा वर्षांसाठी काँग्रेसने निलंबित केले आहे, तरीही त्यांच्याशी संपर्क झाला आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसच्या बंडखोरांशी महायुतीचे नेतेही संपर्क साधत आहेत. इतरही बंडखोरांना काँग्रेस नेत्यांचे फोन गेले आहेत. रामटेक ही जागा महविकास आघाडीत ठाकरे गटाच्या वाट्याला गेली होती. तेथे काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. काँग्रेसची पूर्ण संघटना त्यांचा प्रचार करत होती. ते निवडून येतील, असे काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.
बंडखोरांशी संपर्क साधण्याची जबाबदारी
भाजप महायुतीची बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर असणार आहे. बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपने जबाबदारी वाटून दिली आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नीतेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख नेत्यांकडून आढावा घेतला. बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आणि चित्रा वाघ उपस्थित होत्या. प्रत्येक नेत्याला एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय मंगलप्रभात लोढा, भूपेंद्र यादव आणि पराग शाह, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, मिहिर कोटेचा हे नेतेदेखील उपस्थित होते. उद्या मतमोजणीनंतर मुख्यमंत्रिपदाचे गणित जुळवण्यासाठी भाजपचे सगळे नेते, पदाधिकारी आणि उमेदवार सागर बंगल्यावर उपस्थित होते. विशेष म्हणजे मनसेचे बाळा नांदगावकर देखील सागर बंगल्यावर दिसून आले.
काडादींवरून काँग्रेसमध्ये गोंधळ
दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचे सांगितले; मात्र त्यांना शेवटपर्यंत एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला. वास्तवात ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आमचा पाठिंबा अपक्ष उमेदवार काडादी यांना असल्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळ आहे.
मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मतमोजणीत गडबड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी अधिकारी वर्ग गडबड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर पहारा द्यावा, असे ते म्हणाले. उद्या (ता. २३) संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत हे स्वतःच पक्षश्रेष्ठी असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचा टोला ठाकरे गटाला हाणला. पटोले म्हणाले, की निवडणूक आयोगाची यंत्रणाच चुकीची आहे. लोकसभा निवडणुकीतही मतदानाच्या टक्केवारीत मोठा गोंधळ झाला होता. निवडणूक आयोगाला तक्रार केली, तर त्यांनी आपणच बरोबर असल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळे तर सर्व उमेदवारांना फॉर्म नंबर १७ सी देणे बंधनकारक केले आहे. त्यांनी तो आमच्याकडे जमाही केला आहे. मतदान वाढीच्या प्रकियेत काही दोष आढळला, तर त्यास निवडणूक आयोग जबाबदार राहील.
प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटवर बोलणे योग्य नाही. निकाल काही तासांवर आला आहे. मी काल माहूरला देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याने कालच्या बैठकीला गेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पटोले म्हणाले, की काही ठिकाणी अधिकारीही गडबड करतील. रात्रभर आमचे लोक स्ट्रॉगरूमच्या बाहेर थांबतील. मतदान मोजणी केंद्रावर आमची टीम थांबणार आहे. आमचा कोणताही आमदार कुठेही जाणार नाही. आम्ही आमचे सर्व आमदार निकाल लागताच मुंबईत बोलावून घेणार असून सरकार स्थापनेसाठी दावा करणार आहोत. कारण सत्ता स्थापनेसाठी वेळ कमी आहे.
पटोले म्हणाले, की उद्या दुपारपर्यंत निकाल आले तर उद्याच सर्व आमदारांना बोलवून घेत त्यांच्या सह्यांचे पत्र घेऊन रात्रीच राज्यपालांकडे जाणार आहोत. कारण या सरकारचा २६ तारखेला शेवटचा दिवस आहे. महायुतीमध्ये गडबड सुरू आहे. ते काही पाप करू शकतात. भाजपचा काही अपक्षांना पाठिंबा असून शिंदे गटाच्या उमेदवाराला विरोध आहे. ते उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे.
-राजेंद्र साठे
महायुतीत अजितदादा हा कच्चा दुवा असल्याचे चित्र होते. प्रत्यक्षात भाजप हा अधिक कच्चा दुवा होता. कारण सर्वाधिक जागा लढवत असल्याने त्याच्या जितक्या जागा घटतील तितका युतीला मोठा फटका होता. भाजपचा मुख्य एक्का मोदी चालत नव्हता. भाजपची एकूण मोहीम काहीशी गडबडीची होती.
युती आणि आघाडी यांच्यात फार फरक नसेल असे सर्वसाधारण भाकित आहे. मात्र मतांचा टक्का ज्या रीतीने वाढला आहे ते पाहता या दोहोंपैकी एकाला भक्कम बहुमत मिळेल ही शक्यताही वाढली आहे.
शक्यतेचा हा काटा महायुतीच्या बाजूने झुकला तर त्याची कारणे अशी असतील :
१) लोकसभेला मोदी-विरोध हा एकच एक ठळक मुद्दा होता. यावेळी आघाडीला असा मुद्दा काढता आला नाही. तिघांच्या तीन तऱ्हा असा प्रकार होता. ठाकरे आणि शरद पवार आपापल्या गद्दारांशी लढण्यात मग्न होते. तर काँग्रेस लोकसभेचाच पुढचा अंक असल्याप्रमाणे लढत होती. राहुल गांधी संविधानावरच अधिक बोलत होते.
२) महाराष्ट्राचा स्वाभिमान हा जबरदस्त मुद्दा होता. पण आघाडीला त्याचे नीट भांडवल करता आले नाही. तो विस्कळित रुपात मांडला गेला. ‘संयुक्त महाराष्ट्राची पुढची लढाई’ किंवा ‘मोदी विरुध्द महाराष्ट्र’ असे एखादे पकड-वाक्य आघाडीला शोधता आले नाही.
३) महायुतीच्या योजनांची कॉपी वाटेल असा जाहीरनामा हा या गोंधळाचाच नमुना होता.
४) सोयाबीन, कापूस यांचे भाव हा प्रश्न महायुतीला अडचणीत आणेल असा सर्वांचाच तर्क आहे. मात्र कांद्याच्या प्रश्नाबाबत जशी आंदोलने झाली होती तितक्या प्रमाणात संघटित संताप सोयाबीन वा कापूस पट्ट्यात व्यक्त झाला होता असे वाटत नाही. त्यामुळे तिथल्या असंतोषापेक्षा जाती, धर्म, लाडकी बहीण वगैरे मुद्दे प्रभावी ठरू शकतात. जरांगे यांच्या उमेदवार उभे करण्याच्या उलटसुलट भूमिकांमुळे युतीविरोधी रागाची धार नाहीशी झाली.
५) महायुतीने लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी व मार्केटिंग प्रभावी होते. त्याने महिलांची मते निर्विवादपणे फिरवली आहेत. (समजा मविआचा विजय झाला तरी या योजनेमुळे महायुतीचा मोठा पराभव टळलेला असेल.) कुटुंब वा जातीच्या आदेशाच्या बाहेर जाऊन स्त्रिया स्वतंत्रपणे मतदान करीत वा करू शकत नाहीत हे गृहितक या निवडणुकीनंतर बहुदा खोटे ठरेल.
६) महायुतीत शिंदे गटाची निवडणूक मोहिम, त्यांच्या जाहिराती, शिंदे यांची भाषणे एका सूत्रात बांधलेली व प्रभावी होती. गद्दारीच्या आरोपाला त्यांनी चांगले प्रत्युत्तर दिले. कोकणातील शिंदे यांचे यश ही त्याची पावती किंवा पुरावा आहे. उद्धव यांचे हस्तिदंती मनोऱ्यातील वास्तव्य आणि कथित भ्रष्टाचार हा त्यांच्या पिढीतील अनेक नेत्यांचा अनुभव आहे. शिंदे यांच्या या बाबतीतील आरोपांना ठाकरे यांनी ज्या रीतीने शिंगावर घ्यायला हवे होते तसे घडलेले नाही. उलट ‘होय मी घरात बसलो होतो. पण..’ असे म्हणून ते काहीशी त्याची कबुलीच देत असतात. ठाकरे सेनेबाबतची सहानुभूती हा मुद्दा पातळ झाल्याचेही खुद्द त्यांनीच मान्य केलेले दिसले. अनेक टीव्ही मुलाखतींमध्ये प्रश्नकर्ता शिंदेंची गद्दारी, भाजपची फसवणूक वगैरेंवर विचारू लागला की, उद्धव त्याला आपण त्यापेक्षा सोयाबीनवर बोलूया असे म्हणू लागत.
७) काय वाटेल ते करून शिंदे सरकार गेलेच पाहिजे अशी भावना निर्माण करण्यात आघाडीला अपयश आले. मालवण पुतळा आणि बदलापूर अत्याचार यासारखी प्रकरणे विरून गेली. प्रचारात त्यांचे केवळ चुटपुटते उल्लेख झाले. बदलापूरचा संस्थाचालक इतक्या उशिरा का सापडला, शिल्पकार आपटेला कोणी कंत्राट दिले या मुद्द्यावरून रान उठवायला हवे होते. ते आघाडीने सोडून दिले. (मालवण प्रकरणातील कंत्राटदाराला मतदानानंतर लगेच जामीन मिळाला हे उल्लेखनीय आहे.)
८) उद्या पुन्हा अस्थिरता येण्यापेक्षा शिंदे सरकार पुन्हा आलेले परवडले असे मतदारांना वाटावे इतकी विश्वसनीयता युतीने निर्माण केली. आघाडी असे गुडविल निर्माण करण्यात कमी पडली.
८) महायुतीत अजितदादा हा कच्चा दुवा असल्याचे चित्र होते. प्रत्यक्षात भाजप हा अधिक कच्चा दुवा होता. कारण सर्वाधिक जागा लढवत असल्याने त्याच्या जितक्या जागा घटतील तितका युतीला मोठा फटका होता. भाजपचा मुख्य एक्का मोदी चालत नव्हता. भाजपची एकूण मोहीम काहीशी गडबडीची होती. काँग्रेसविरुध्दच्या खोट्या जाहिराती, राहुल गांधींचा हात पिरगळताना दाखवण्यासारखा मूर्ख व नकारात्मक प्रचार आणि सरतेशेवटी व्होट जिहादचा मुद्दा आणणे यावरून भाजप भयंकर त्रस्त व घाबरलेला आहे हे दिसत होते. भाजपविरुध्द सर्वाधिक जागा काँग्रेस लढत होती. या स्थितीत भाजपला खच्ची करण्यासाठी काँग्रेसने अधिक ताकद लावून हल्लाबोल करायला हवा होता. खोट्या जाहिरातींविरुध्दचा काँग्रेसने आकांडतांडव करायला हवे होते. इतर राज्यांमधील लाभार्थींचे व्हिडिओ करायला हवे होते. पण काँग्रेसचा प्रतिसाद अगदीच कोमट होता. भाजपची फजिती करण्याची संधी काँग्रेसने दवडली. राहुल हे मनाने कितीही चांगले असले व ते काही मूलभूत प्रश्न मांडायचा प्रयत्न करीत असले तरी जनतेच्या मनाला भिडण्यात ते कमी पडतात.
दरम्यान एक्सिस माय इंडियाचा अंदाज आला आहे. त्याने युतीला १७८ जागा दिल्या आहेत. त्या अविश्वसनीय वाटतात. मात्र छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि हरियाणा यांची उदाहरणे विसरून चालणार नाही.
महायुतीला इतके नाही तरी अगदी साधे बहुमत मिळाले तरीही तो त्यांच्या विजयापेक्षा आघाडीचा पराभव अधिक असेल. याउलट वाढीव टक्का व एकूण असंतोष आघाडीच्या बाजूने झुकलाच तर तो मात्र त्यांचा व पैशाच्या आमिषांना दाद न देणाऱ्या जनतेचा विजय म्हणावा लागेल.
(लेखक मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (ता. २३) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्रिपदाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. सत्ताधारी महायुतीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदारांची नावे पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत विशेषतः महाविकास आघाडी सतर्क झाली आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांसह ऑनलाइन बैठक घेतली. पवार आणि ठाकरे या दोघांचेही पूर्वीचे अनुभव चांगले नाहीत. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनीदेखील त्यांचे काका शरद पवार यांना धक्का देऊन राष्ट्रवादीत बंड पुकारले आणि महायुतीत सामील झाले.
शिंदे आणि अजित पवारांमुळे महाराष्ट्रात दोन नवीन पक्ष उदयास आल्याने राज्याची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला पुन्हा अशा प्रकरची फूट पडू द्यायची नसल्यामुळे ते आपल्या आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. याआधी मुख्यमंत्री चेहऱ्यावरून विरोधकांच्या गोटात खडाजंगी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपापल्या नेत्यांची आणि उमेदवारांची ऑनलाइन बैठक घेतली असून, शनिवारी निकालानंतर सायंकाळपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही गटांनी विजयी उमेदवारांसाठी मुंबईत राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते, की राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पटोले यांची भूमिका आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले. निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर घटक पक्षांशी चर्चा करून मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा ठरवू, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, की विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढली आहे. मतदारांनीही एकनाथ शिंदे यांनाच पसंती दिली आहे. त्यामुळेच शिंदे यांनाच पुढील मुख्यमंत्री होण्याचा अधिकार आहे.
किंगमेकरचा दावा
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. निवडणुकीचे निकाल काहीही लागोत, राष्ट्रवादी काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत राहील, असे ते म्हणाले.
मुंबई : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. २३) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्या निकाल येईल. आम्हाला खात्री आहे, की आम्हाला बहुमत मिळेल. आमचे १६०-१६५ आमदार निवडून येतील; पण काही जण त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आम्ही त्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची व्यवस्था केली आहे,’ असे राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यात शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका असेल. महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. आम्ही सर्वानुमते निर्णय घेऊ. अजून कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्ही सगळे एकत्र बसून मुख्यमंत्री निवडू, असे राऊत यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना महायुतीसह महाविकास आघाडीनेही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आ. कडू हे नक्की कोणाच्या बाजूने जाणार, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुती सरकारमध्ये कडू सहभागी होते. त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान त्यांनी महायुतीपासून दूर जात परिवर्तन महाशक्तीच्या रूपाने तिसरी आघाडी निर्माण केली. या आघाडीला महाराष्ट्रात १५ जागा मिळतील, असा दावा आ. कडू यांनी केला आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीने आ. कडू यांच्याशी संपर्क साधत त्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
‘आमच्या ‘प्रहार’चे किमान १० आमदार निवडून येतील. महाशक्ती परिवर्तन आघाडी मिळून १५ आमदार होतील. कोणत्याही आघाडीची सत्ता येईल, अशी आकडेवारी जुळत नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत. हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. लहान पक्ष आणि अपक्ष, अशी आघाडी झाल्यानंतर मग सत्तेचे स्वरूप आणि दिशा बदलेल,’ असा दावा कडू यांनी केला आहे.
उद्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासारखे संख्याबळ मिळाल्यास आम्ही जो सरकार स्थापन करू शकेल, अशा आघाडीसोबत जाणे पसंत करू, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे आंबेडकर यांचा पाठिंबा कोणाला असणार, हे उद्याच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतात, त्यावरच अवलंबून असणार आहे.
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. बहुतांश ‘एक्झिट पोल’ हे महायुतीच्या बाजूने असले, तरी निकालाच्या दोनच दिवसांनी आधीच्या विधानसभेची मुदत संपत असल्याने जर अटीतटीच्या लढतींत कोणालाच बहुमत मिळाले नाही, तर सरकार स्थापन होणे अशक्य आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.
२३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे, तर २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी केवळ ४८ तास हातात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने अपक्ष, छोटे पक्ष आणि महाशक्तीच्या नेत्यांना फोनाफोनी सुरू केली असून, बहुतासाठी गरज लागलीच तर मदत कोण करू शकेल याची चाचपणी सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे सत्ता स्थापन करण्यापेक्षा मुख्यमंत्री कोण असेल यावरूनच मोठे वाद होण्याची शक्यता आहे. यानंतर मंत्रिपदे, यात काही फिस्कटले तर या बाजूचे त्या बाजूला आणि त्या बाजूचे या बाजूला होण्याचीही दाट शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी होण्याचीही शक्यता आहे.
राजकारणात काहीही होऊ शकते, असे संकेत अजित पवार यांनी निवडणूक काळातही दिले आहेत. यामुळे सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्रही येऊ शकतात. भाजपच्या जागा कमी आल्या, तर पुन्हा एकनाथ शिंदे तोडपाणी करत मुख्यमंत्रिपद घेऊ शकतात. या सर्व गोष्टी ४८ तासांत करणे जवळपास अशक्य आहे. यामुळे राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याची शक्यता अधिक आहे.
महायुती सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्लॅनिंगमध्ये असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. राऊत यांचा आरोप खरा-खोटा ठरविण्यापेक्षा सध्याची परिस्थिती तिकडेच बोट दाखवत आहे. आमदारांना राज्यभरातून मुंबईत यासाठी यावे लागणार आहे. २३ तारखेला अनेकांना रात्री उशिरा निवडणूक आयोग प्रमाणपत्र देणार आहे. यानंतर त्यांना मुंबईत येण्यासाठी मिळेल तो मार्ग पकडून यावे लागेल.
घोडेबाजाराला ऊत येणार
बहुमताचा आकडा कोणालाच पार करता आला नाही, तर या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू होतात. यामुळे या आमदारांना कुठेतरी दूर हॉटेलमध्ये नेऊन एकत्र ठेवावे लागते. यात आमदारांच्या घोडेबाजारालाही ऊत येतो. अनेक आमदार फोन बंद करून बसतात. यामुळे तो पक्षही या काळात गॅसवरच राहतो. महाराष्ट्रात अशी परिस्थिती बनेल, असे संकेत मिळत असले तरी बऱ्याचशा गोष्टी उद्या ठरणार आहेत.