कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि. २०) मतदान होणार असून जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतील ३३ लाख पाच हजार ९८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
महायुती विरुद्ध महायुतीमध्ये थेट लढत असून पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री आमदार विनय कोरे, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी आमदार अमल महाडिक, के.पी. पाटील, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके हे कमबॅक करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. समरजित घाटगे, राहुल पाटील, राहुल आवाडे, गणपतराव पाटील, नंदिनी बाभूळकर, शिवाजी पाटील, अप्पी पाटील, राजेश लाटकर, अशोकराव माने या नवीन चेहऱ्यांना मतदारांचा कौल कसा मिळणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
दहा विधानसभा मतदारसंघांत प्रशासनाने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली असून, १६ हजार २३७ कर्मचारी कार्यरत झाले आहेत. जिल्ह्यात तीन हजार ४५२ मतदान केंद्रे आहेत. आज, मंगळवारी सकाळी मतदान केंद्रप्रमुख, कर्मचारी रवाना झाले. तत्पूर्वी आज सकाळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना तिसरे प्रशिक्षण देण्यात आले. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्रावर नाव आणि चिन्ह यांची नोंद करण्यात आली. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर प्रकिया कशी राबवायची याची माहिती दिली जाणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी केएमटी बसेस आणि एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी ४५२ एसटी बसेस बुक करण्यात आल्या आहेत. केएमटी बसेसचा वापर करण्यात आला. त्यामुळे एसटी आणि केएमटी बसेसच्या फेऱ्यांत कपात केल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.