-राजेंद्र साठे
महायुतीत अजितदादा हा कच्चा दुवा असल्याचे चित्र होते. प्रत्यक्षात भाजप हा अधिक कच्चा दुवा होता. कारण सर्वाधिक जागा लढवत असल्याने त्याच्या जितक्या जागा घटतील तितका युतीला मोठा फटका होता. भाजपचा मुख्य एक्का मोदी चालत नव्हता. भाजपची एकूण मोहीम काहीशी गडबडीची होती.
युती आणि आघाडी यांच्यात फार फरक नसेल असे सर्वसाधारण भाकित आहे. मात्र मतांचा टक्का ज्या रीतीने वाढला आहे ते पाहता या दोहोंपैकी एकाला भक्कम बहुमत मिळेल ही शक्यताही वाढली आहे.
शक्यतेचा हा काटा महायुतीच्या बाजूने झुकला तर त्याची कारणे अशी असतील :
१) लोकसभेला मोदी-विरोध हा एकच एक ठळक मुद्दा होता. यावेळी आघाडीला असा मुद्दा काढता आला नाही. तिघांच्या तीन तऱ्हा असा प्रकार होता. ठाकरे आणि शरद पवार आपापल्या गद्दारांशी लढण्यात मग्न होते. तर काँग्रेस लोकसभेचाच पुढचा अंक असल्याप्रमाणे लढत होती. राहुल गांधी संविधानावरच अधिक बोलत होते.
२) महाराष्ट्राचा स्वाभिमान हा जबरदस्त मुद्दा होता. पण आघाडीला त्याचे नीट भांडवल करता आले नाही. तो विस्कळित रुपात मांडला गेला. ‘संयुक्त महाराष्ट्राची पुढची लढाई’ किंवा ‘मोदी विरुध्द महाराष्ट्र’ असे एखादे पकड-वाक्य आघाडीला शोधता आले नाही.
३) महायुतीच्या योजनांची कॉपी वाटेल असा जाहीरनामा हा या गोंधळाचाच नमुना होता.
४) सोयाबीन, कापूस यांचे भाव हा प्रश्न महायुतीला अडचणीत आणेल असा सर्वांचाच तर्क आहे. मात्र कांद्याच्या प्रश्नाबाबत जशी आंदोलने झाली होती तितक्या प्रमाणात संघटित संताप सोयाबीन वा कापूस पट्ट्यात व्यक्त झाला होता असे वाटत नाही. त्यामुळे तिथल्या असंतोषापेक्षा जाती, धर्म, लाडकी बहीण वगैरे मुद्दे प्रभावी ठरू शकतात. जरांगे यांच्या उमेदवार उभे करण्याच्या उलटसुलट भूमिकांमुळे युतीविरोधी रागाची धार नाहीशी झाली.
५) महायुतीने लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी व मार्केटिंग प्रभावी होते. त्याने महिलांची मते निर्विवादपणे फिरवली आहेत. (समजा मविआचा विजय झाला तरी या योजनेमुळे महायुतीचा मोठा पराभव टळलेला असेल.) कुटुंब वा जातीच्या आदेशाच्या बाहेर जाऊन स्त्रिया स्वतंत्रपणे मतदान करीत वा करू शकत नाहीत हे गृहितक या निवडणुकीनंतर बहुदा खोटे ठरेल.
६) महायुतीत शिंदे गटाची निवडणूक मोहिम, त्यांच्या जाहिराती, शिंदे यांची भाषणे एका सूत्रात बांधलेली व प्रभावी होती. गद्दारीच्या आरोपाला त्यांनी चांगले प्रत्युत्तर दिले. कोकणातील शिंदे यांचे यश ही त्याची पावती किंवा पुरावा आहे. उद्धव यांचे हस्तिदंती मनोऱ्यातील वास्तव्य आणि कथित भ्रष्टाचार हा त्यांच्या पिढीतील अनेक नेत्यांचा अनुभव आहे. शिंदे यांच्या या बाबतीतील आरोपांना ठाकरे यांनी ज्या रीतीने शिंगावर घ्यायला हवे होते तसे घडलेले नाही. उलट ‘होय मी घरात बसलो होतो. पण..’ असे म्हणून ते काहीशी त्याची कबुलीच देत असतात. ठाकरे सेनेबाबतची सहानुभूती हा मुद्दा पातळ झाल्याचेही खुद्द त्यांनीच मान्य केलेले दिसले. अनेक टीव्ही मुलाखतींमध्ये प्रश्नकर्ता शिंदेंची गद्दारी, भाजपची फसवणूक वगैरेंवर विचारू लागला की, उद्धव त्याला आपण त्यापेक्षा सोयाबीनवर बोलूया असे म्हणू लागत.
७) काय वाटेल ते करून शिंदे सरकार गेलेच पाहिजे अशी भावना निर्माण करण्यात आघाडीला अपयश आले. मालवण पुतळा आणि बदलापूर अत्याचार यासारखी प्रकरणे विरून गेली. प्रचारात त्यांचे केवळ चुटपुटते उल्लेख झाले. बदलापूरचा संस्थाचालक इतक्या उशिरा का सापडला, शिल्पकार आपटेला कोणी कंत्राट दिले या मुद्द्यावरून रान उठवायला हवे होते. ते आघाडीने सोडून दिले. (मालवण प्रकरणातील कंत्राटदाराला मतदानानंतर लगेच जामीन मिळाला हे उल्लेखनीय आहे.)
८) उद्या पुन्हा अस्थिरता येण्यापेक्षा शिंदे सरकार पुन्हा आलेले परवडले असे मतदारांना वाटावे इतकी विश्वसनीयता युतीने निर्माण केली. आघाडी असे गुडविल निर्माण करण्यात कमी पडली.
८) महायुतीत अजितदादा हा कच्चा दुवा असल्याचे चित्र होते. प्रत्यक्षात भाजप हा अधिक कच्चा दुवा होता. कारण सर्वाधिक जागा लढवत असल्याने त्याच्या जितक्या जागा घटतील तितका युतीला मोठा फटका होता. भाजपचा मुख्य एक्का मोदी चालत नव्हता. भाजपची एकूण मोहीम काहीशी गडबडीची होती. काँग्रेसविरुध्दच्या खोट्या जाहिराती, राहुल गांधींचा हात पिरगळताना दाखवण्यासारखा मूर्ख व नकारात्मक प्रचार आणि सरतेशेवटी व्होट जिहादचा मुद्दा आणणे यावरून भाजप भयंकर त्रस्त व घाबरलेला आहे हे दिसत होते. भाजपविरुध्द सर्वाधिक जागा काँग्रेस लढत होती. या स्थितीत भाजपला खच्ची करण्यासाठी काँग्रेसने अधिक ताकद लावून हल्लाबोल करायला हवा होता. खोट्या जाहिरातींविरुध्दचा काँग्रेसने आकांडतांडव करायला हवे होते. इतर राज्यांमधील लाभार्थींचे व्हिडिओ करायला हवे होते. पण काँग्रेसचा प्रतिसाद अगदीच कोमट होता. भाजपची फजिती करण्याची संधी काँग्रेसने दवडली. राहुल हे मनाने कितीही चांगले असले व ते काही मूलभूत प्रश्न मांडायचा प्रयत्न करीत असले तरी जनतेच्या मनाला भिडण्यात ते कमी पडतात.
दरम्यान एक्सिस माय इंडियाचा अंदाज आला आहे. त्याने युतीला १७८ जागा दिल्या आहेत. त्या अविश्वसनीय वाटतात. मात्र छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि हरियाणा यांची उदाहरणे विसरून चालणार नाही.
महायुतीला इतके नाही तरी अगदी साधे बहुमत मिळाले तरीही तो त्यांच्या विजयापेक्षा आघाडीचा पराभव अधिक असेल. याउलट वाढीव टक्का व एकूण असंतोष आघाडीच्या बाजूने झुकलाच तर तो मात्र त्यांचा व पैशाच्या आमिषांना दाद न देणाऱ्या जनतेचा विजय म्हणावा लागेल.
(लेखक मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)