कोल्हापूर; प्रतिनिधी : सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर जाहीर जहरी टीका केली. त्यांनाच घोटाळ्याच्या फाईलवरील सही देवेंद्र फडणवीस यांनी कशी दाखवली? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर कोणतीही कागदपत्रे दाखवली जात नाहीत. तो गोपनियतेचा भंग आहे. सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे दाखवून फडवणीसांनी राज्यातील सर्व जनतेला फसवले आहे. महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे, अशी टीका करत त्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे. तसेच या प्रकाराची चौकशी करुन फडवणीसांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
आम्ही राजकारण गणितासाठी करत नाही तर पॉलिसी मेकिंगसाठी लढतोय असे सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीतील अदृश्य शक्तीला घाबरायचे की, त्याबरोबर लढायचे हे ठरवले पाहिजे. जे घाबरले ते तिकडे गेले. नवाब मलिक यांच्यावर भाजपने रोज टीका केली. त्यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकही काढले. आम्ही मलिकांकडे लढाऊ नेते म्हणून पहात होतो. पण ते महायुतीत गेलेत. मोडेन पण वाकणार नाही हा आमचा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. त्या धोरणानुसार आम्ही लढत आहोत. माझी आजी शारदा पवार या कोल्हापूरच्या आहेत. प्रा. एन.डी. पाटील हे लढाऊ नेते होते. अशा नातलग व स्वाभिमानी नेत्यांकडे बघून स्वाभिमानाने कसे लढायचे हे आम्ही शिकलो, असेही त्या म्हणाल्या. अदृश्य शक्तीमुळे राज्यात दुसऱ्या पक्षांची संख्या वाढत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री कधी होणार असा प्रश्न केला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या. ज्याची योग्यता आहे. तोच मुख्यमंत्री होणार. मग तो पुरुष असे अथवा महिला. स्त्री किंवा पुरुष मुख्यमंत्री असा भेद न करता जो महाराष्ट्राला पुढे नेईल, तोच मुख्यमंत्री झाला पाहिजे. शरद पवार यांनी देशात सर्वप्रथम महिला धोरण स्वीकारल्याने महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाटला. निर्णय प्रक्रियेत महिला आणि पुरुषांचा वाटा समसमान ५० टक्के असला पाहिजे.
शायना एन.सी. यांच्याबद्दल काढलेल्या उद्गगाराबद्दल खासदार अरविंद सामंत यांनी माफी मागितली, असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या. सत्तेतील लोक महिलांबद्दल रोज चुकीचे वक्तव्ये करुन त्यांचा अपमान करत आहेत. पण त्याबदद्ल भाजप माफी मागत नाही. जयश्री थोरात यांच्याबदद्ल चुकीचे वक्तव्य झाले असतानाही त्याबद्दल त्यांनी माफी मागितली का असा सवालही त्यांनी केला.
देशाचा आणि राज्याचा जीडीपी घसरला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. पाकिस्तानचा कांदा जगभरातील बाजारपेठेत जातो. पण, महाराष्ट्रातील कांद्याला जादा दर मिळण्याची दाट शक्यता असतानाही त्याच्यावर निर्याद बंदी लादून इथल्या शेतकऱ्यांचे नुकसान केले जाते. या गंभीर प्रश्नावर सत्ताधारी बोलत नाहीत. असा आरोप सुळे यांनी केला.
मुश्रीफांनी कुठली दक्षिणा दिली
मी शरद पवारांना गुरुदक्षिणा देऊन महायुतीत गेले आहे, या हसन मुश्रीफांच्या विधानावर सुप्रिया सुळे यांनी, मुश्रीफांनी कुठली दक्षिणा दिली असा सवाल करत त्यांची खिल्ली उडवली. मुश्रीफांपेक्षा त्यांच्या पत्नी धाडसी आहेत. ईडी, सीबीआयने इतका त्रास देऊनही त्या घाबरल्या नाहीत. समरजीत घाटगे यांच्याकडे माझे पहिल्यापासून लक्ष होते. ते भाजपमध्ये असतानाही गेले दोन-तीन वर्षे त्यांनी राष्ट्रवादीत यावे यासाठी आग्रह सुरू होता. पक्षांमध्ये ज्येष्ठ नेते आणि तरुण विचारांची पिढी असली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
त्याच्याकडे पैसे नाहीत, तो कुठले वाटणार?
तासगांव मतदारसंघात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्याने फराळ आणि पैसे वाटले असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्याच्याकडे पैसे नाहीत. तो कुठले वाटणार नाही. अजून माघार नाही. निवडणुकीचा पत्ता नाही. असे असताना कोण पैसे वाटेल अशी खिल्लीही त्यांनी उडवली. दिवंगत आर.आर. पाटील जसे प्रामाणिक आणि निष्कलंक होते त्याचप्रमाणे रोहित पाटीलही निष्कलंक आहे. आर.आर. पाटील यांना भ्रष्टाचार आवडत नव्हता, रोहितच्या आईही सुमन पाटील यांनाही भ्रष्टाचार आवडत नाही. या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवून रोहित पुढे चालला आहे.
📍कोल्हापूर ⏭️ 04-11-2024
➡️ कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेतून लाईव्ह
https://t.co/ImCRqOawGB— Supriya Sule (@supriya_sule) November 4, 2024