नवी दिल्ली; प्रतिनिधी : ‘सेबी’च्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या अनुपस्थितीमुळे संसदेच्या लोकलेखा समितीची (पीएसी) आजची (दि.२४) बैठक पुढे ढकलण्यात आली. या समितीचे प्रमुख केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. (Madhabi Buch)
माधवी पुरी बुच हजर राहू न शकल्याने समितीची आजची प्रस्तावित बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वेणुगोपाल यांनी सांगितले की, बुच यांनी माहिती दिली होती, की वैयक्तिक कारणांमुळे त्या दिल्लीला पोहोचू शकणार नाहीत. समितीच्या पहिल्या बैठकीत आम्ही ठरवले होते की, पहिला विषय आमच्या नियामक संस्थांचा आढावा घ्यावा. त्यामुळे आज आम्ही ‘सेबी’च्या प्रमुखांना या संस्थेचा आढावा घेण्यासाठी बोलावले होते. ते म्हणाले, की सर्वप्रथम ‘सेबी’ प्रमुखांना समितीसमोर हजर राहण्यापासून सूट मागितली होती, ती आम्ही नाकारली.
वेणुगोपाल म्हणाले की, एका महिलेची विनंती लक्षात घेऊन आजची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘एनडीए’च्या खासदारांनी वेणुगोपाल यांच्याबद्दल तक्रार करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांशी संपर्क साधला आणि सांगितले की वेणुगोपाल यांचा देशाची आर्थिक रचना मोडण्याचा हेतू आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी निशकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून या समितीला माधवी बुच यांना बोलावण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक स्थायी समिती त्या विभागाशी संबंधित नियामक समितीचा आढावा घेतो. पण, वेणुगोपाल यांनी बुच यांना बोलावले, त्यांनी हा निर्णय कसा घेतला? या समितीचे काम ‘कॅग’च्या अहवालावर विचार करणे आहे. (Madhabi Buch)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘कॅग’ने आपल्या अहवालात सेबीवर कोणताही परिच्छेद दिलेला नाही. हा संपूर्ण तपास असंसदीय, वेदनादायी असून सर्व सदस्य नाराज होते. बुच यांना चौकशीला बोलावण्याच्या वेणुगोपाल यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी पक्षाचे सदस्य नाराज झाले होते. बुच या ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ अहवालामुळे वादाच्या केंद्रस्थानी होत्या. अमेरिकन शॉर्ट-सेलर कंपनीने बुच यांच्यावर हितसंबंधांचे आरोप लावले होते. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दुबे यांनी वेणुगोपाल यांच्यावर केंद्र सरकारची बदनामी करण्यासाठी आणि देशाची आर्थिक संरचना आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी निरर्थक मुद्दे उपस्थित केल्याचा आरोप केला होता. दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात वेणुगोपाल यांच्यावर त्यांच्या पदाचा गैरवापर करून देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवण्यासाठी ‘टूल किट’चा भाग म्हणून काम केल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा :