सतीश घाटगे : कोल्हापूर : दिल्ली स्फोटाचे सावट असतानाच दुसरीकडे महानगरपालिका प्रभाग आरक्षणाची सोडत सुरू असताना शहरातील उच्चभ्रू नागाळा पार्कात बिबट्या आल्याचे वार्तेने कोल्हापूर शहर खडबडून जागं झालं. ती अफवा नव्हती तर खरोखरच हा बिबट्या हॉटेल वूडलँडमध्ये आला होता. बिबट्याने एमएसईबी ऑफीस, विवेकानंद कॉलेज परिसरात धुमाकुळ माजवताना पोलिस आणि वन कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याला पकडण्यात आला. बरोबर दहा वर्षापूर्वी कोल्हापूरच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या रुईकर कॉलनीत खासदार धनंजय महाडिक यांच्या घराजवळ बिबट्या आला होता. आता बरोबर दहा वर्षानंतर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या कार्यालयाजवळील वुडलँड हॉटेलमध्ये आला होता. जिल्ह्याच्या राजकारणात ‘वाघ’ समजल्या दोन्ही नेत्यांच्या घर, कार्यालयाजवळ आलेल्या बिबट्याच्या घटनेतील विलक्षण साम्य समोर आले आहे.
दोन्ही घटनेची १ अंकाचे साम्य
खासदार धनंजय महाडिक यांच्या बंगल्याजवळ आलेल्या बिबटयाची तारीख होती १-१-२०१५ तर सतेज पाटील यांच्या कार्यालयाजवळ आलेला बिबट्याची आजची तारीख होती ११-११-२०२५. दोन्ही तारखेमध्ये एक आकड्याचे साम्य असल्याचा योगायोग पहायला मिळाला.
दोन्ही बिबट्या उच्चभ्रू वस्तीत
शक्यतो बिबट्या हा भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत घुसतो. गावातही तो भटकी कुत्री, कोंबड्या, बकरी शेळी, बोकड, रेडकू या लहान पाळीव जनावरांना लक्ष्य करतो. नागाळा पार्क, रुईकर कॉलनी या दोन्ही ठिकाणी वाघाला खाण्यासाठी काहीही नाही. दहा वर्षापूर्वी आलेला बिबट्या थेट रुईकर कॉलनीत आला होता. हा बिबट्या कसा आला याचे तर्कवितर्क त्या काळात लढवले गेले होते. आज आलेला बिबट्या हा नागाळा पार्क, ताराबाई पार्कच्या बॉर्डरवर आला होता. रमणमळ्यातून तो सोमवारी रात्री मेरी वेदरकरडे गेला होता असे एका तरुणाने पाहिले होते. त्याच्याकडे व्हिडिओ नव्हता पण आपण बिबट्या पाहिला म्हणून तो स्टेटस् ठेवला होता. पण त्याला मित्रांनी खुळ्यात काढले होते. स्टेटस् काढून टाक अशी सूचना केली होती. आणि दुसऱ्या दिवशी हॉटेल वुडलँड आणि विवेकानंद कॉलेज परिसरात बिबट्या आल्याचे आढळला. कोल्हापुरात बिबट्याला बाकीच्या वस्त्या न दिसता उच्च्भ्रू वस्ती कशा दिसल्या अशी प्रतिक्रिया उमटल्या. (Leopard Bunty, Munna Connection)
राजकीय नेत्यांच्या वास्तूजवळ
एक जानेवारी २०१५ रोजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी बिबट्या आला होता. महाडिक यांच्या बंगल्यासमोरील मोकळ्या जागेत तो बराच काळ होता. तर आज आलेला बिबट्या सतेज पाटील यांच्या अजिंक्य तारा कार्यालयाजवळील हॉटेल वुडलँड, वीज महामंडळाच्या कार्यालयात आला होता. (Leopard Bunty, Munna Connection)
रुईकर कॉलनीत बिबट्या खलास, तर नागाळा पार्कात वाचला.
खासदार महाडिक यांच्या घराजवळ आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनखाते, पोलिस, अग्निशमन दलासह महाडिक यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. बिबट्याला पकडण्यासाठी महाडिक यांच्या माकडवाला वसाहतीतील कार्यकर्त्यांनी जाळीही आणली होती. महाडिक स्वत: शस्त्रासह सज्ज होते. पण त्याची गरज भासली नाही. माकडवाला वसाहतीतील कार्यकर्त्यांन जाळी टाकून वाघ पकडला. पण उत्साही कार्यकर्त्यांनी जाळीतील बिबट्याला स्वसरंक्षणासाठी मारहाण केल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. वनखात्याने ताबडतोब त्याचे शवविच्छेदन करुन प्रकरण धसास लावल्याची चर्चा होती. त्यावेळी वनखात्याकडे टँरक्विलायझर गन नसल्याने वाघाला बेशुद्ध करता आले नाही. या घटनेनंतर वनखात्याच्या ताफ्यात टँरक्विलायझर गन आली. (Leopard Bunty, Munna Connection)
आज झालेल्या घटनेत वनखाते, पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाने नियोजनबद्ध रेस्क्यु ऑपरेशन केले. तब्बल तीन तासानंतर बिबट्याला पकडण्यात आले. यावेळी टँरक्विलायझर गन असल्याने बिबटयाला बेशुध करण्यात यश आले. यावेळी अजिंक्यतारावर आमदार सतेज पाटील नव्हते. ते मुंबईला असल्याने कार्यकर्ते या घटनेच्यावेळी फिरकले नाहीत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर हॉटेल वुडलँडला भेट देऊन माहिती घेतली. रुईकर कॉलनीतील घटनेत बिबट्या ठार झाला तर नागाळा पार्कातील घटनेत बिबट्या जिवंत राहिला हाच काय तो दोन्ही घटनेतील विरोधभास! (Leopard Bunty, Munna Connection)