मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना वेग आलेला असताना काँग्रेसने आता विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोमवारी (९ सप्टेबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्याबाबत हिरवा कंदील मिळाल्यानंतर तातडीने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन नियुक्तीसाठी आग्रह धरला. (LoP in LC)
विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाच्या नावाची अद्याप घोषणा केली नसली तरी सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ५ सप्टेंबरला संपला आहे. परिषदेत सध्या काँग्रेसचे संख्याबळ जास्त आहे. तसेच विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना पाठिंबा दिला आहे. (LoP in LC)
काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि उपनेते अमीन पटेल यांनी सोमवारी सकाळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे ५० मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली.
यावेळी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी राजकीय समीकरणांसंबंधी रणनीती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरण, त्याचा महाविकास आघाडीच्या होणारा परिणाम या अनुषंगाने चर्चा झाली, तसेच अंबादास दानवे यांची मुदत संपल्याने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरही चर्चा करण्यात आली. (LoP in LC)
याबाबत विजय वड्डेटीवार म्हणाले,’स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीच्याबाबत दिल्लीतील हायकमांडशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत, ते परतल्यावर त्यांची भेट घेणार असल्याचेही वड्डेटीवार यांनी सांगितले.