नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’वर मौन बाळगल्याबद्दल बॉलीवूड कलाकारांना लक्ष्य करत जातीयवादी व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या एका इन्स्टाग्राम इन्फ्युंन्सरला कोलकाता पोलिसांनी अटक केली. संबंधित अधिकाऱ्यांनी शनिवारी (३१ मे) ही माहिती दिली. शर्मिष्ठा पानोली असे तिचे नाव आहे. (Law student arrested)
पुण्यातील एका कायदा विद्यापीठात शर्मिष्ठा लॉ करते. तिला शुक्रवारी (३० मे) रात्री गुडगाव येथून अटक करण्यात आली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पानोलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये हिंदी चित्रपट कलाकारांनी ऑपरेशन सिंदूरवर मौन बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता. या पोस्टमुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली, अनेक वापरकर्त्यांनी तिला ट्रोल केले आणि धमकीदायक कमेंट्स पोस्ट केल्या.
सोशल मीडियावर झालेल्या प्रचंड टीकेमुळे पानोलीने व्हिडिओ डिलीट केला आणि माफी मागितली. तथापि, कोलकातामध्ये तिच्याविरुद्ध आधीच तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबाला नोटीस बजावण्यात आल्या. (Law student arrested)
कायदेशीर नोटीस बजावण्याचे वारंवार प्रयत्न करण्यात आले. तथापि ते अयशस्वी झाले. कुटुंबही पळून गेल्याचे आढळून आले तेव्हा हे प्रकरण न्यायालयासमोर ठेवण्यात आले, असे कोलकाता पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “वॉरंट जारी करण्यात आले आणि तिला गुडगाव येथून अटक करण्यात आली,” असे त्यांनी सांगितले. पानोली सध्या पोलिस कोठडीत आहे.
माफीनंतरही अटक
शर्मिष्ठाने केलेल्या पोस्ट नंतर वादाचे वादळ उठले. त्यानंतर तिने सोशल मीडियावर बिनशर्त माफी मागितली होती. तसेच तिने इन्स्टाग्रामवरील तिचे व्हिडिओ आणि पोस्टही हटवल्या होत्या.
“या प्रकरणी बिनशर्त माफी मागते. मी जे काही मांडले त्यात माझ्या वैयक्तिक भावना आहेत. कोणालाही जाणूनबुजून दुखावू इच्छित नव्हते. तरीही कुणी दुखावले असेल तर त्याबद्दल माफी मागते. मला सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यापुढे, सार्वजनिक पोस्ट करताना सावध राहीन. पुन्हा एकदा, कृपया माझी माफी स्वीकारा,” अशा शब्दांत तिने ‘एक्स’वर माफी मागितली होती.
हेही वाचा :
गुवाहाटीत धुवाँधार; पाचजण ठार
भाजपच्या माजी नेत्याच्या मुलासह तिघांना सक्तमजुरीची शिक्षा