दीपांकर
सगळ्याचे अर्थ आपल्या सोयीचे लावण्यात माणसाइतका कावेबाज या जगात कोणी नसावा. सगळ्या जगावर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाकांक्षा असलेलाही माणसाइतका हिंस्र जगात कोणी नसावा. आत्मप्रौढी मिरवणे हा तर या माणसाचा दुर्गुण. याच दुर्गुणाला जागत नैसर्गिक नियमांना धरून चाललेले जंगलाचे विश्व सत्ताधाऱ्यांच्या श्रीमंती हौसेमौजेखातर अस्थिर करण्याचे प्रयत्न भारतात चित्तासंवर्धनाच्या नावाखाली सध्या सुरू आहेत. ते करताना चित्त्यांची पैदास कशी वाढवायची, चित्त्याला भक्ष्य पुरवताना काय चालबाजी करायची, जंगलातला समतोल बिघडल्यानंतर काय सुधारणा करायच्या हे सारे ठरवण्याचे सर्वाधिकार स्वतःकडे घेऊन त्याने आपण कावेबाज हिंस्र आणि आत्मनाशी आहोत, हेही जवळपास सिद्ध केले आहे… जंगली म्हणजे हिंस्र, हिंसक हा माणसाने लावलेला अर्थ. पण जंगल्यातल्या हिंसेचा संबंध प्रामुख्याने पोटाच्या भुकेशी असतो. लालूच, हाव, कटकारस्थाने, अहंकार, अहंगंड ही जंगलातल्या प्राण्यांच्या स्थायीभावाची रूपे नसतात. थरारकतेचा अनुभव देणारा चित्ता जगवण्यासाठी चाललेली वर्तमानातली कारस्थाने ही रूपे माणसांत काठोकाठ भरलेली असल्याचे सांगतात…
ही गोष्ट आहे, वन्य पशू-पक्ष्यांचा अधिवास असलेल्या जंगलनामे राज्यात घडवून आणण्यात आलेल्या सक्तीच्या वसाहतीकरणाची. ‘थर्डवर्ल्ड’ मधून फर्स्टवर्ल्डमध्ये जाण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या देशात घडणारी. ऑन गोइंग. सारे काही भव्यदिव्य असले पाहिजे. सारे काही धमाकेदार झाले पाहिजे. चलो कुछ धमाकेदार करते है, असे आले मनात की, इथे घटना घडते. घडवली जाते हा योग्य वाक्यप्रयोग. तशीच ही जंगलात घडवून आणलेली घटना. नाव ‘प्रोजेक्ट चित्ता’.
म्हणजे ज्या वर्षी वसाहतवादी ब्रिटिशांपासून गुलाम वसाहत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच वर्षी १९४७ मध्ये भारतातल्या जंगलातून अखेरचा चित्ता नामशेष झाला. भारताला स्वातंत्र्य आणि चित्त्याला मूठमाती ! काय विलक्षण योगायोग म्हणायचा हा. अर्थात, भारतातून चित्ता नामशेष झाल्याची अधिकृत घोषणा झाली, १९५२मध्ये. त्यानंतर पुढची सत्तरएक वर्षे भारत हा चित्तामुक्त देश होता. मग आले देवाजीच्या मना. कुछ तुफानी करते है. ‘प्रोजेक्ट चित्ता’ ची जोरदार घोषणा झाली. जुन्या पिढीतल्या लोकांना १९७३ मध्ये इंदिरा गांधींनी राबवलेला प्रोजेक्ट टायगर आठवला. लोक तर असेही म्हणतात, नेहरु हे पहिले टार्गेट आहेतच, पण इंदिरा गांधींनाही प्रत्येक बाबतीत मागे टाकायचेय. त्यातूनच एका दगडात अनेक पक्षी या न्यायाने हे साहसी पाऊल उचलले होते म्हणे. निसर्गप्रेम वगैरे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. हे म्हणजे, तुमचा प्रोजेक्ट टायगर तर आमचा प्रोजेक्ट चित्ता. तुमचा दाऊद तर आमचा गवळी. तुमचा शाहरुख तर आमचा अक्षय
नामिबियाचे चित्ते…
झाले, देशनियंत्याच्या वाढदिवशी नामिबियाच्या (हा सुद्धा एकेकाळचा वसाहतवादी मानसिकतेच्या जर्मनांची सत्ता असलेला देश. आताचा चित्ता द्या-चित्ता घ्या हा खेळ ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेल्या एकेकाळच्या दोन गुलाम वसाहतींमधला. एकेकाळी वसाहतवादी युरोपीय देश आशिया आणि आफ्रिकेतून आपल्या सुखसमृद्धीसाठी माणसांचे स्थलांतर घडवून आणत. आता वसाहतवादाचे बळी ठरलेले एकेकाळचे देश चित्त्यासारख्या एक्झॉटिक प्राण्याचे एका वसाहतीतून दुसऱ्या वसाहतीत स्थलांतर घडवून आणताहेत. हा सुद्धा एक योगायोगच.) जंगलातून मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कात चित्ते आणले गेले. विधिवत, वाजतगाजत क्लोज एनक्लोजर म्हणजे, संरक्षित क्षेत्रात सोडले गेले. काय ते रोमहर्षक दृश्य. वर देशनियंता खाली जंगलाकडे झेपावणारे विलक्षण देखणे चित्ते. पण प्रत्यक्ष शिक्षेआधी जसे एखाद्या गुन्हेगाराला व्यवस्थेने योजलेल्या ट्रायलला सामोरे जावे लागते. कार्यतत्पर मीडिया त्या गुन्हेगाराची मिनिट टु मिनिट खबरबात लोकांपर्यंत पोहोचवतो, तसे चित्त्यांच्या स्थलांतराच्या प्रवासातही घडले. बेशुद्ध केल्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधलेले, ऑपरेशन टेबलवर गलितगात्र अवस्थेतले चित्ते लोकांपर्यंत पोहोचले. आता बेशुद्धीत दिसणारे हेच चित्ते पुढे जाऊन भारताची शान बनणार म्हटल्यावर बघणाऱ्याच्या मनात रोमांच उभे राहिले. हे चित्ते कोण होते, नामिबियाच्या जंगलात नेमक्या कोणत्या मोहल्ल्यात राहात होते. तिथे त्यांची काय शान होती, कोण कोण त्यांचे सगेसोयरे होते? त्यांना फूस लावून (आणणाऱ्यांनी चित्त्यांच्या कानात तर काही सांगितले नसेल, की आता तुम्हाला इथून तुमचा बाडविस्तारा हलवायचाय, तेव्हा काय ते आपल्या आप्तेष्टांशी बोलून घ्या एकदाचे म्हणून.) आणल्यानंतर त्यांच्या सग्यासोयऱ्यांमध्ये काय घडले असेल, आपला रोजचा साथीसोबती अचानक एक दिवस गायब झाला हे बघून कोणी हबकला असेल का, अन्नपाणी सोडले असेल का, कोणी कायमचा शून्यात नजर लावून बसला असेल का ? नाना प्रश्न, नाना शंका. पण त्या कोणाला तर, नामिबियातल्या जंगलाला. इतरांना देणेघेणे आपापली शान उंचावण्याच्या परस्परव्यवहारात. बड़ा धमाका करण्यात. चित्ते आले. चित्त्यांबरोबर चित्ता तज्ज्ञही आले. त्यांच्या साक्षीने चित्त्यांना कुनोच्या संरक्षित क्षेत्रात सोडले गेले. असतील नामिबियातून आलेले. पण झालेत ना भारतीय. शेवटी भारतीय संस्कृती-परंपरा वगैरे नावाची काही चीज असते की नाही? मग सत्तर सालबाद देशनियंत्याने घडवून आणलेल्या चित्त्याच्या आगमनामुळे धुंदी चढलेल्या देशवासीयांना तुम्हीच सुचवा चित्त्यांना खास देशी नावे म्हणून आवाहन केले गेले. मग नामिबियन चित्त्यांचे भारतीय नामकरण (कट्टर देशभक्तांच्या मते धर्मांतरही) करण्यात आले. साव्वनाहचे नामकरण नभ झाले, टिब्लिसीची ज्वाला. एल्टनचा गौरव झाला, फ्रेडीचा शौर्य. यामुळे आपल्याकडे कधीकाळी चित्ता नामशेष झाला होता, त्याचा न्यूनगंडही उडनछू झाला आणि मनात दाटून असलेले वैषम्यही दूर झाले. जणू १९४७ काही घडलेच नव्हते. त्या वर्षी चित्ता भारतीय जंगलातून नामशेष झालाच नव्हता.
चित्त्यांचे अवतारकार्य आटोपले
जसा आगमनानंतरच्या सेलिब्रेशनधा भर ओसरला, मधला काळ विविध कारणांनी मूळच्या नामिवियन पण आता भारतीय संस्कृतीत मुरू पाहणाऱ्या काही चिस्यांचे अवतार कार्य (नेमका आकडा हवा असणाऱ्यांनी गुगल सर्च करावे.) आटोपले. आपल्या लोकविलक्षण छंदापायी जंगलाच्या जैवसाखळीत डवळाढवळ करण्याचा माणसाला अधिकारच काय इथपासून भारतीय नोकरशाही नामिवियाहून आलेल्या तक्षांच्या सल्ल्यास केराची टोपली दाखवताहेत, असा आरोप होऊन सरकारवर आणि देशनिर्यात्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला. न्यायालयांना प्राप्त परिस्थितीची दखल घेणे भान पडले, जंगलप्रेमी काळजीत पडले. वाल्मिक आपर सारखा प्रोजेक्ट टायगरची प्रगती अनुभवलेला एक जवाबदार तयक्ष हौसेमौजेखातर चित्त्यांना भारतात आणणाऱ्यांना धोक्याचे इशारे देत राहिला, पण त्याही इशा-यांकडे सत्तेने एका कानाने ऐकल्याने दुसन्या कानाने सोडून दिले. कुनोया एवढा प्रचंड जंगल परिसर चित्त्यांसाठी मोकळा केला. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले आणि तिथे चित्ते एकापाठोपाठ एक माना टाकताहेत. यावर उपाय म्हणून त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आयात करण्याची टूम निघाली. ती पूर्णत्यासही गेली. दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातून आणलेल्या चित्यांचेही यथावकाश नामकरण झाले. दक्षा, निरया, वायु, अग्नि, गामिनी, तेजस, वीरा, सूरज, धौरा, उदय आणि काय काय. पण त्यांच्या वाट्याला नामिवियन चित्त्यांच्या वाटपाला आलेले भाग्य आले नाही. कारण, यांच्या आगमनाचा सोहळा झाला की नाही, माचा कुणाला पत्ताच लागला नाही. देश पुडच्या सेलिब्रेशनकडे वळला. देशनियंत्याने पुढची दोन वर्ष सेलिब्रेशनचा असा काही घडाका लावला की त्याचे नाव ते. कट टु जुलै २०२४. कुनोच्या जंगलात चित्यांची लोकसंख्या वाढल्याने जंगलाचा समतोल वेगाने विघडून तिथे प्राणीजगतात हाहाकार माजल्याची बातमी काहीच मोजक्या वृत्तपत्रांनी दिली. पण नेहमीप्रमाणे बातमी आली, आम्ही नाही वाचली. पाहिली. ऐकली. आता मध्येच कुठून आला चित्ता ? झाला ना दोन वर्षांपूर्वी जंगी स्वागत • सोहळा. केले तर त्याच्यावर भारतीय संस्कार, पुनःपुन्हा काय तेच, देशाला काय दुसरा उद्योग नाही का? आता श्री पॉइंट ओ सरकार सुरु आहे. कितीतरी जणांना त्यांची जागा द्यायचीय. कितीतरी जणांना त्यांची जागा दाखवायचीय. जगालले केवडे तरी माहत्वाचे प्रश्न सोडवायचेत. चित्त्यांचे काय ते फरिस्ट डिपार्टमेंट पाहून पेईल, असा सध्याचा जनविचार आहे. असो बापडा.
कुनोच्या जंगलात अफरातफरी
बातमीनुसार इकडे कुनोच्या जंगलात अफरातफरीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, कुनोच्या जंगलात नैसर्गिक क्षमतेपेक्षा चित्यांची संख्या वाढली आहे. या वाढत्या चित्त्यांमुळे त्यांचे मुख्य भक्ष्य असेलल्या चितळांची प्रमाणापेक्षा अधिकची शिकार होतेय. एका बातमीचे शीर्षक आहे, ‘चितल स्टॉक ट्विन्सलिंग इन कुनो, प्लान टु मुका आउट एक्सेस चिताह आता पर्याय दोन आहेत. एकतर चित्त्यांचे दुसऱ्या जंगलात स्थलांतर आणि कुठून तरी चितळांची अधिकाची भर. अहो, जंगल आहे ते. तिथे निसर्गनियमानुसार सारे क्षेमकुशल असते. निसर्गनियम मोडायला ते काय मागमांने जंगल आहे. माणसाला त्याचे जंगल काय नि प्रत्यक्ष नैसर्गिक जंगल काय दोन्ही सारखेच इकडे उत्पात माजवला तिकडे काय अवघड आहे. आणि अगदी असेच बहुदा पडले आहे. पण जाहीरपणे बोलत नाहीये कोणी. चित्त्यांच्या संदभनि कुनी नॅशनल पार्कची झालेली आजची अवस्था हा माणसाच्यान उत्पाताचा परिणाम आहे, याची अनेक प्राणीप्रेमी तज्ज्ञांना तर पूर्ण खात्री आहे.
कुनोतला घटनाक्रम
कुनोतला घटनाक्रम हा साधारण असा आहे- कुनो मध्ये या घडीला २६ चिते आहेत. त्यात १३ बछडे आणि पौगडावस्थेतल्या चित्त्यांचा समावेश आहे. मुळात, प्रोजेक्ट अ एक्शन प्लान आखला गेला, त्यानुसार कुनोमध्ये चित्त्यांची संख्या २१ असणेच अपेक्षित होते. म्हणजे, या पहीला ५ अधिकचे चित्ते कुनोत राज्य करताहेत. फरिस्ट डिपार्टमेंटच्या मते, या अधिकच्या पाचांमुळेच कुनोची जैवसाखळी बिघडली आहे. किती बिघडली आहे, तर २०२२ पासून चित्त्यांचे मुख्य भक्ष्य असलेल्या कुनोच्या जंगलातल्या चितळांची संख्या २२५० नी म्हणजेच, तब्बल २५ टक्क्यांनी गपकन घटली आहे. फॉरस्टवाले असेही म्हणताहेत की, कुनोमध्ये सात चित्ते सच्या संरक्षित क्षेत्राबाहेर पडूनही शिकार करताहेत. त्यांनी तर जेमतेम ५० चितळांचीच शिकार केली आहे. मग, बाकीचे चितळ कोणाला बळी पडले? फॉरेस्टवाले म्हणतात, कुनोत जंगलसफारीच्या खुणा जमिनीवर उमटत असल्या तरीही बाहेरुन येऊन कोणी माणसांनी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी चितळांची शिकार करण्याचा तर प्रश्नच नाही. पण, उन्मादी माणसांकडून शिकार झालीच असेल, तर आपली मिलिभगत कोण उघड करील? म्हणून मग फरिस्टवाल्पांनी आपली संशयाची सुई कुनोतल्या बिबट्यांकडे वळवलीय, बेट्या बिबट्याच मधल्यामध्ये हात साफ करतोय, बहुदा. हा सगळा जंगली असमतोल पाहता, कुनोतल्या ५ चित्त्यांना मध्य प्रदेशातल्याच मंदसौर आमि निमच जिल्ह्यांना लागून असलेल्या गांधी सागर वाइल्डलाइफ सैंक्चुरीमध्ये हलवण्यास तत्त्वतः मान्यता मिळाली म्हणे, पण तिथेसुद्धा भानगड अशी आहे म्हणतात, को गांधीसागर मध्येसुद्धा बिबट्याच चित्त्यांच्या भक्ष्यांवर डल्ला मारताहेत. तेसुद्धा उघड्यावर नव्हे, तर चित्त्यांसाठी संरक्षित ६० स्क्वेअर किलोमीटर कुंपणरेषेच्या आत येऊन भक्ष्य पळवताहेत. आता आली का, पंचाईत. याचा अर्थ, सध्या कुनो आणि गांधीसागरमध्ये फुल टू राडा सुरु आहे. मध्य प्रदेश सरकार म्हणे, कुनोमध्ये चित्त्यांची भूक भागवण्यासाठी १५०० च्या आसपास चितळ सोडणार आहे आणि त्यापुढची खेप गांधीसागरमध्ये आणून सोडली जाणार आहे. (बातमीत वापरलेला शब्द आहे, रिप्लिनिश, म्हणजे रिकामा झालेला मद्याचा पेला भरावा तसे कुनो आणि गांधीसागरमध्ये चितळ भरणार आहेत.) आहे. म्हणजे कुठून तरी आपल्या अधिवासात रुळलेल्या दुर्दैवी चितळांना पकडून आणले जाणार, त्यांना अपरिचित कुनो आणि गांधीसागर मध्ये सोडले जाणार. काहीच दिवसांत चित्ता किंवा इतर कोणी त्यांचा फडशा पाडणार. तसे एरवीसुद्धा नैसर्गिकरित्या चितळ भक्ष्य ठरतच असते. नाही कोणीच म्हणत नाही. पण असे ढिगाने चितळ पकडून आणून चित्ते किंवा इतरांसमोर आणून ठेवणे? पण हे ही असो.
बिबट्यावर खापर
फरिस्टवाल्यांच्या नजरेत सध्या बिबट्या आरोपी नंबर वन आहे. त्याचा उपद्रव कमी करण्यासाठी नवी योजना आखली जातेय. त्यानुसार कुनोमध्ये जबरदस्त दाटी असलेल्या बिबट्यांची दादागिरी आणि भक्ष्याचे दुर्भिक्ष्य घटवण्यासाठी मार्जारकुलात सर्वोच्च स्थानी असलेल्या अगदी सिंह नाही, पण वाघांना इथे आयात करण्याचे योजले आहे. राजेश गोपाल नावाचे कोणी अधिकारी, त्यांनी हा उपाय सुचवला. त्यांचे म्हणणे हा उपाय जीवशास्त्राच्या नियमांना धरूनच आहे. यामुळे जंगलातल्या जैवसाखळीचे झालेच तर रक्षणच होणार आहे. या गोपाल साहेबांचे असेही म्हणणे आहे, आफ्रिकेच्या जंगलात चित्ता आणि बिबट्या सिंहासोबत सुखैनैव नांदताहेत. मग इथे काय धाड भरलीय, ते न घडायला. इथे वाघांचा वावर तर पूर्वीपासूनच आहे, त्यामुळे ते कुनोसाठी नैसर्गिकदृष्ट्यादेखील योग्य निवड ठरणार आहेत. यासंदर्भाने सांगितली गेलेली पूरक माहिती अशी आहे की, गेल्या १५ वर्षांत राजस्थानातल्या रणथंबोरच्या अभयारण्यातून चार नर वाघांचे स्थलांतर घडवून आणले गेले आहे. त्यातले एक- दोन नर वाघ अजूनही कुनोच्या जंगलात आपले अस्तित्व टिकवून असल्याची फॉरेस्टवाल्यांची खात्री आहे. अशा प्रसंगी काही मादी वाघांना इथे आणून सोडायचे, जेणेकरून कुनोतले नर त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि इथे त्यांची प्रजा वाढवतील. मूळ अधिवास रणथंबोरमधला. आप्तेष्टांपासून दूर करत सक्तीचे स्थलांतर करण्यात आले, कुनोच्या अभयारण्यात. इथे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा समोर आपल्यासारखीच सक्तीच्या स्थलांतराची बळी ठरलेली मादी वाघ भलत्याच ठिकाणाहून आलेली. यांची म्हणजे माणसाची, माणसांच्या व्यवस्थेची अपेक्षा कुनोतली वाघांची प्रजा वाढवावी, पर्यायाने त्यांची म्हणजे माणसांची कॉलर टाइट राहावी. ही कथा कुनोची. गांधीसागरचा पेच आणखीच वेगळा. तिथे फॉरेस्टवाल्यांना वाघांच्या स्थलांतराचा पर्याय व्यवहार्य वाटत नाहीये. कारण, त्यांच्यापुढचे पहिले आणि तातडीचे आव्हान तिथल्या दादागिरी करणाऱ्या बिबट्यांना आधी संरक्षित भक्ष्य क्षेत्रातून बाहेर काढण्याचे आहे. आव्हान बरेच मोठे आहे, पण २०२२ मध्ये कुनोतही असाच प्रयोग यशस्वी झाल्याने फॉरेस्टवाल्यांचे इरादे बुलंद आहेत.
कहानी में द्विस्ट
मात्र, आता इथे कहानी में द्विस्ट म्हणतात, तशी स्थिती आहे. कुनो आणि गांधीसागर मध्ये प्रस्थापित व्यवस्थेने जे काही रामायण-महाभारत घडवून आणले आहे आणि जे काही बिबट्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, त्यावर एका निवृत्त फॉरेस्ट अधिकाऱ्याने म्हणे तीव्र आक्षेप घेतलाय. त्याचे म्हणणे, चितळांची संख्या घटण्यात बिबट्याचा हात आहे ही थिअरी बोगस आहे. ज्या प्रमाणात आणि ज्या वेगात चितळांची संख्या घटलीय, ते पाहता बिबटे निवडून निवडून फक्त चितळांचाच फडशा पाडताहेत, हे काही खरे नाही. नैसर्गिक तर अजिबात नाही. आपण बुशमिट पोचिंगकडे म्हणजे स्वादिष्ट जंगलीमांसाच्या लालसेने होणाऱ्या शिकारींकडे दुर्लक्ष तर केलेले नाही? निवृत्त फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या म्हणण्यात नक्कीच दम आहे.
प्रत्येक जंगल वेगळे असते
म्हणजे पुन्हा तीच कथा. पाळेमुळे रुजलेल्या जंगलातून उचलायचे, दुसऱ्या जंगलात नेऊन सोडायचे. जगभरातली सगळी जंगले काय सारखीच असतात? तिथले रंग-गंध-चव काय एकसारखीच असते? नामिबियातून उचलले, भारतात आणून सोडले. भारतातल्या एका जंगलातून उचलले, दुसऱ्या जंगलात आणून सोडले. दिसताहेत आमच्यासारखे, पण आमचे नाहीत. परिस्थितीशी कसे जुळवून घेत असतील, चित्ता, वाघ आणि चितळ ? भक्ष्य असले तरीही, निसर्गाने उपजत स्वरक्षणासाठी आवश्यक शहाणपणही पुरवलेय सजिवांना. क्षमतांच्या त्या चढाओढीतही जंगलात समतोल सहसा बिघडत नाही. अशा वेळी अनोळखी अधिवासात प्राण्यांना नेऊन सोडल्याने काय साधते ? जंगलात शेवटी कोणाचा कायदा चालतोय? कोणाच्या हौसमौजेसाठी, कोणाच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी चालतोय ? उत्तर खूपच सोपे आहे. हम करे सो कायदा. ब्रिटिश, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंचाच्या नावे खडे फोडता फोडता वसाहतोत्तर काळातल्या भारतात निषिद्ध मानली गेली वसाहतावादी मानसिकता अंगी पुरेपूर मुरवून जंगलांमध्ये मनात येईल तेव्हा वसाहती वसवल्या जाताहेत, मनात येईल तेव्हा हलवल्या आणि संपवल्याही जाताहेत. मुळात, माणसाने जंगलांवर अतिक्रमण केलेय. बिबट्या किंवा वाघ मानवी वस्तीत शिरला, असे म्हणणे हे असत्यकथन आहे. कुनो आणि गांधीसागरच्या जंगलात आपला मनमानी कायदा चालवून माणसाने असत्यकथनाला असभ्यतेची आणि असंस्कृतपणाचाही जोड दिलेली आहे.