कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलिस क्रीडा स्पर्धेत फुटबॉलमध्ये यजमान कोल्हापूरने सातारा संघावर १-० असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. मैदानी स्पर्धेत १० हजार मीटर क्रॉसकंट्री स्पर्धेत सातारा पोलिस संघाच्या हर्षवर्धन दबडे याने सुवर्णपदक पटकावले. महिलांमध्ये कोल्हापूरची सोनाली देसाई सुवर्णपदक विजेती ठरली. पोलिस कवायत मैदानातील पोलिस क्रीडा संकुलात स्पर्धा सुरू आहेत. (Kolhapur Police)
दहा हजार मीटर क्रॉसकंट्री प्रकारात पुरुष गटात कोल्हापूरच्याच हरिदास देशमुखने रौप्य तर महेश वळवीने ब्राँझ पदक मिळविले. महिला गटात तिनही पदके कोल्हापूरच्या खेळाडूंनी पटकावली. सोनाली देसाईने सुवर्ण, मीनाताई देसाईने रौप्य तर शीतल मोगलने ब्राँझ पदक मिळवले.
हॉकी स्पर्धेत कोल्हापूर आणि सांगली संघाने प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य सामन्यात सांगलीने पुणे ग्रामीण संघाचा ७ विरुध्द ४ गोलने पराभव केला. कोल्हापूरने सातारा संघाचा ६-० असा धुव्वा उडविला.
हॅन्डबॉल स्पर्धेत सोलापूर शहर आणि सांगली संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. सोलापूर शहरने कोल्हापूर २४ विरुध्द १८ गोलने पराभव केला तर सांगलीने सोलापूर ग्रामीणचा २५ विरुध्द १८ गोलने पराभव केला. (Kolhapur Police)
खोखो क्रीडा प्रकारात कोल्हापूर आणि सोलापूर ग्रामीण संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. यजमान कोल्हापूरने पुणे ग्रामीणचा ६ विरुध्द ३ गुणांनी तर सोलापूर ग्रामीणने सोलापूर शहरचा ६ विरुध्द २ गुणांनी पराभव केला.