कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजारांवर शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीज पुरवठा सुरू झाला आहे. जिल्ह्यात पहिला सौरऊर्जा प्रकल्प हरोली (ता. शिरोळ) येथे यापूर्वीच कार्यान्वित झाला. त्यातून ७९० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील दुसरा प्रकल्प किणी (ता. हातकणंगले) येथे कार्यान्वित झाला. या प्रकल्पातून १२१६ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतीला दिवसा वीज पुरवठा मिळणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या २००६ झाली आहे. (Solar power plant)
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील दुसरा दोन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प किणी (ता. हातकणंगले) येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे महावितरणच्या ११ केव्ही भादोले आणि ११ केव्ही घुणकी या कृषी वाहिन्यांवर असलेल्या वाठार, किणी आणि घुणकी गावांतील १२१६ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे. (Solar power plant)
कोल्हापूर जिल्ह्यात ५३ प्रकल्प प्रस्तावित
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५३ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता १७० मेगावॅट आहे. अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ४८ कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारीही दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे. (Solar power plant)
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्ह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व भूमी अभिलेख कार्यालय यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.
प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करा : महावितरण
वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे आहेत. यामुळे शेतीकरता दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षांत विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या पर्यावरणपूरक विकासकामात सहभाग नोंदवावा. तसेच प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रकल्प सुरु झाल्यापासून पहिले तीन वर्षे पाच लाख अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
हेही वाचा :