कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) पन्हाळा तालुक्यातील वारणानगर तीन कोटी २१ लाख ९१ हजार ६१९ रुपयांचा अपहार झाला आहे. या आर्थिक घोटाळ्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोडोली पोलिस ठाण्यात शाखाधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षातील संचालक असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. (KDCC fraud)
केडीसी बँकेच्या वारणा शाखेत पे स्लिप वर तसेच धनादेशाद्वारे बोगस व खोट्या सह्या करून तसेच खातेदारांचे नावे बनावट खाती उघडून तीन कोटी २१ लाख ९१ हजार ६१९ रुपयांचा अपहार झाला आहे. अपहार प्रकरणी शाखाधिकारी,कॅशियर,क्लार्क अशा पाच संशयितांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात एका महिलेसह चौघांना अटक केली असून शाखाधिकारी फरार झाला आहे. (KDCC fraud)
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोल्हापूर शाखेचे उपव्यवस्थापक बाळासो हरी बेलवळेकर (रा. कुरुकली, ता. कागल जि.कोल्हापूर) यांनी कोडोली पोलीस ठाण्यात आज मंगळवारी ( दि.२९) रोजी फिर्याद दिली. १५ जुलै २०२१ ते दि. २० ऑगष्ट २०२४ या कालावधीमध्ये कार्यरत असणारे वारणा शाखेचे शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पोवार (रा.कळे ता. पन्हाळा), क्लार्क मुकेश विलास पाटील (रा. मसूद माले ता. पन्हाळा), कॅशियर शिवाजी शहाजी पाटील (रा.आरळे ता.पन्हाळा), मिनाक्षी भगवान कांबळे (रा.कोडोली ता. पन्हाळा), शरीफ मुन्तांज मुल्ला (रा. कोडोली ता.पन्हाळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात चौघांना अटक केली आहे. (KDCC fraud)
आरोपींनी संगनमताने बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे. संशयितांनी बँकेत बोगस खाती उघडली. तसेच पे स्लीप वर धनादेशावर खोट्या व बोगस सह्या करुन रक्कमा काढल्या. तसेच रक्कमा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचा युजर आयडी, पासवर्ड वापरुन तसेच आर्थिक गैरव्यवहार केले आहेत. बँकेच्या ऑडिट विभागाने या घोटाळ्यासंबधी महत्वाची कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी दिली नाहीत. पाचही आरोपींनी संगनमत करुन तीन कोटी २१ लाख ९१ हजार ६१९ रुपयांचा इतक्या रक्कमेचा अपहार करुन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, वारणानगर शाखेची फसवणूक केली. बँकेतर्फे फिर्याद नोंदवली आहे. (KDCC fraud)
संशयित शाखाधिकारी तानाजी पोवार याचा पोलीसांनी शोध सुरु केला आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधिक्षक सुवर्णा पत्की, कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक कैलास कोडग तपास करत आहेत. (KDCC fraud)
हेही वाचा :