बेळगाव : प्रतिनिधी : कर्नाटकात नेतृत्वबदलची चर्चा सुरू असताना काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा आमदार यतीद्र सिद्धरामय्यांनी सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मार्गदर्शन करावे असे वक्तव्य केले आहे. उप मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांना शह देण्यासाठी जारकीहोळींचे नाव पुढे करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Yatindra Siddaramaiah)
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कप्पलगुड्डी गावात कनकदास मूर्ती अनावरण सोहळ्यात त्यांनी ते विधान केले. आमदार यतीन सिद्धरामय्या यांनी वडील सिद्धरामय्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. सतीश जारकीहोळी यांनी काँग्रसला पुढे नेले पहिजे असे ते भाषणात म्हणाले. (Yatindra Siddaramaiah)
कर्नाटकात मे २०२३ मध्ये भाजपकडून काँग्रेसने सत्ता हिसकावून घेतली. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असून उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आहेत. शिवकुमार मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत शिवकुमार यांची दीर्घकाळ चर्चा झाली. त्यानंतर कर्नाटकमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या पाच वर्षाचा आपला कार्यकार पूर्ण करतील आणि पुढील विधानसभा त्यांच्याच नेतृत्वाखाली होईल असे सिद्धरामय्या समर्थकांचा दावा आहे. गेल्याच आठवड्यात यतींद्र यांनी त्यांचे वडील कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ राज्याच्या हितासाठी पूर्ण करतील. राज्यात नेतृत्व बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही असा दावा केला होता. पण रायबाग मधील यतींद्र यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उप मुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू केली. दोघेजण जास्तीत जास्त आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. (Yatindra Siddaramaiah)