बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. विशेषत: बोंडगाव, कलवड आणि हिंगणा या गावातील या गूढ आजाराने लोक भयभीत झाले आहेत. या आजाराने चिंताग्रस्त झालेल्या लोकांना ‘विचार करून करून टक्कल पडू लागले आहे!’ शब्दश: टक्कल. विचार करून किंवा भादरून नव्हे; तर अचानक केस गळती होऊन टक्कल पडू लागल्याने लोक चिंताक्रांत झाले आहेत. या रोगामागचे गूढ आरोग्ययंत्रणेलाही अद्याप उकललेले नाही. (sudden hair loss)
शेगाव तालुक्यातील या तीन गावांतील सुमारे ५० वर व्यक्तींचे केस अचानक गळू लागले. काही दिवसांतच त्यांना टक्कल पडले. या आजाराने ग्रस्त झालेल्यांच्या टाळूला तीव्र खाज सुटली. खाजवायला गेले तर हातात केसाचे पुंजके येऊ लागले. अशा रितीने तीन दिवसांत अनेक व्यक्तींचे सर्व केस गळून गेले. अनेकांना ही लक्षणे सुरू झाली आहेत. आरोग्य विभागाला ही माहिती समजताच आरोग्य अधिकारी या विचित्र आजाराचे कारण समजून घेण्यासाठी धडपड करीत आहेत, परंतु आत्तापर्यंत अचूक निदान झालेले नाही.(sudden hair loss)
पाण्याची तपासणी
आरोग्य यंत्रणेची पथके आता कामाला लागली आहेत. आरोग्य विभागाने बाधित गावांमध्ये तपासणी सुरू केली आहे. बाधित भागातील पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. परिसरातील पाणी दूषित झाल्याचा हा परिणाम आहे की आणखी काही कारणे आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
लोक हवालदिल
आरोग्य अधिकारी पाण्याच्या चाचणीचे निष्कर्ष काय येतात, याची वाट पाहत आहे. शेगाव तालुक्यातील रहिवासीही सामान्य नागरिकही या निष्कर्षाकडे डोळे लावून बसले आहेत. कारण ही स्थिती अचानक उद्भवल्यो गावांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे. हा नवीन रोग आहे की पाणी प्रदूषणामुळे ही नवी ब्याद उद्भवली, या चिंतेने नागरिकांना ग्रासले आहे. शिवाय केवळ केसगळतीपुरताच हा प्रकार सीमित आहे की आरोग्यविषयक आणखी काही प्रश्न निर्माण् होतील, अशी काळजीही येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.