पुणे : प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेत भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने अजित पवारांनी काका शरद पवारांना साद घातल्याची चर्चा आहे. पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची गेले तीन दिवस चर्चा सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे निर्णय घेतील असेही स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले आहे. तर माझ्याकडे याबाबत प्रस्ताव आला नसल्याचे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले आहे. २६ किंवा २७ डिसेंबरमध्ये दोन्ही पक्षांच्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याच्या चर्चेने जोर धरला असून स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. पुणे महापालिकेतील एकूण १६५ जागांपैकी कोण, किती जागांवर लढणार यावर आता चर्चा सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांच्या पक्षाकडून एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रशांत जगताप यांचा समावेश नाही. (Both NCP come together in Pune)
स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र बैठका सुरू असल्याची माहिती माजी महापौर अंकुश काकडे यांनी दिली. याबाबत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि आमच्या लोकांच्या काही चर्चा चालल्या आहेत याला सुळेंनी दुजोरा दिला. दोन्ही पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नातीगोती ठेऊनच आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने पुण्याचा विकास समोर आम्ही निर्णय घेऊ. आमची चर्चा फक्त शिवसेनेशी सुरू आहे. दोन्ही ठाकरे बंधू, काँग्रेस आणि आम्ही एकत्र लढले पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेऊ. प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला नाही असा खुलासाही सुप्रिया सुळे यांनी केला. (Both NCP come together in Pune)
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडला मी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. पक्षामधल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांची आणि इच्छुकांनी अजित पवार गटासोबत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडीची गरज व्यक्त केली आहे. तसेच आज पदाधिकाऱ्यांसोबत आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. ती चर्चा होत असताना आमच्या लोकांवर कुठेही अन्याय होणार नाही, अशाप्रकारे उमेदवारीवर एकमत करून आघाडी करण्याच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो, असेही प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी स्पष्ट केले. (Both NCP come together in Pune)