नवी दिल्ली : नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये संशयास्पदरित्या किमान तीन पाकिस्तानी दहशतवादी घुसले आहेत. त्यामुळे गुप्तचर संस्थांनी निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. (3 Pak terrorists in Bihar)
बिहार पोलिसांनी सांगितले की सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी सुरू आहे. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. पोलिसांना याची माहिती देणाऱ्यांना ५०,००० रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
‘‘गुप्तचर संस्थांनी एक इनपुट जारी केला होता आणि आम्ही त्यावर काम करत आहोत आणि अत्यंत सतर्क आहोत. सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचारी आणि पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. तिन्ही संशयितांवर ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. लोकांना कुठेही काही संशयास्पद दिसल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत,’’ असे मोतिहारीचे एसपी स्वर्ण प्रभात यांनी वृत्तसंस्था ‘एएनआय’ला सांगितले.(3 Pak terrorists in Bihar)
पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांचे पासपोर्ट फोटो देखील जारी केले. हे तिघे रावळपिंडी, उमरकोट आणि बहावलपूर येथील आहेत. दहशतवादी तळांना आश्रय देण्यासाठी आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात त्यांचा सहभाग होता.(3 Pak terrorists in Bihar)
विशेष म्हणजे, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने लक्ष्य केलेल्या पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांपैकी रावळपिंडी आणि बहावलपूर ही दोन ठिकाणे आहेत.
बिहार पोलिस मुख्यालयाने सर्व जिल्हा पोलिसांना हाय अलर्ट जारी केला आहे आणि त्यांना दहशतवाद्यांची नावे आणि फोटो देखील पाठवले आहेत, असे पोलिस मुख्यालयातील सूत्रांनी गुरुवारी सांगितले.
सूत्रांनुसार, हे सर्वजण नेपाळमार्गे बिहारला पोहोचले. पाकिस्तानी दहशतवाद्यां हसनैन, आदिल आणि उस्मान यांचे फोटो जारी करून सर्व जिल्हा पोलिसांना पाठवण्यात आले आहेत.
हसनैन हा रावळपिंडीचा, आदिल उमरकोटचा आणि उस्मान हा पाकिस्तानातील बहावलपूरचा आहे, असे सूत्रांनी सांगितले. हे तिघेही दहशतवादी नेपाळमधून अररिया जिल्ह्यातून बिहारमध्ये घुसले असावेत असा संशय आहे. सध्या तपास सुरू आहे.
सूत्रांनी सांगितले की, हे तिन्ही दहशतवादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडूमध्ये आले. गेल्या आठवड्यात बिहारमध्ये घुसले. हे दहशतवादी देशाच्या एखाद्या भागात हल्ला करू शकतात अशीही भीती व्यक्त केली जात आहे.