रोम : जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असणाऱ्या बेलारुसच्या आर्यना सबालेंकाला इटालियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. चीनच्या आठव्या स्थानावरील क्विनवेन झँगने सबालेंकाचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. (Sabalenka)
सबालेंका आणि झँग यांच्यादरम्यान याअगोदर झालेल्या सहाही लढती सबालेंकाने जिंकल्या होत्या. २०२४ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम फेरीत सबालेंकाने झँगवर मात करून विजेतेपद पटकावले होते. गुरुवारी मात्र झँगने सबालेंकाचे आव्हान परतावून लावले. उपांत्य फेरीत झँगचा सामना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या अमेरिकेच्या कोको गॉफशी होईल. गॉफने उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या सातव्या स्थानावरील मिरा अँड्रीव्हाला ६-४, ७-६(७-५) असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. (Sabalenka)
दरम्यान, पुरुष एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणारा जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. आठव्या स्थानावरील इटलीच्या लॉरेंझो मुसेटीने झ्वेरेवला ७-६(७-१), ६-४ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत मुसेटीची लढत तिसऱ्या स्थानावरील स्पेनच्या कार्लोस अल्कारेझशी होईल. २५ मेपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅमपूर्वीची ही अखेरची टेनिस स्पर्धा असल्याने या स्पर्धेस फ्रेंच ओपनची रंगीत तालीम समजले जाते. (Sabalenka)