नवी दिल्ली : मुंबईची चौदा वर्षीय क्रिकेटपटू इरा जाधवने रविवारी १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा भारतातील विक्रम नोंदवला. विमेन्स अंडर-१९ ट्रॉफी वन-डे स्पर्धेमध्ये इराने मेघालयविरुद्ध १५७ चेंडूंमध्ये नाबाद ३४६ धावांची खेळी केली. (Ira Jadhav)
इराने २२०.३८ च्या स्ट्राइक रेटने धावा जमवताना ४२ चौकार व १६ षटकारांचीही आतषबाजी केली. तिच्या या महाकाय खेळीमुळे मुंबईला ५० षटकांमध्ये ३ बाद ५६३ अशी धावसंख्या उभारता आली. मुंबईच्या या आव्हानासमोर मेघालय संघाचा डाव अवघ्या १९ धावांत आटोपला. त्यामुळे मुंबईने ५४४ धावांनी विजय नोंदवला. इराची ही भारतातील १९ वर्षांखालील महिला वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याचप्रमाणे, १९ वर्षांखालील महिला वन-डे क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक धावसंख्या आहे. १९ वर्षांखालील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल लीच्या नावावर आहे. तिने २०१० मध्ये पुमालंगा संघातर्फे खेळताना नाबाद ४२७ धावा फटकावल्या होत्या. (Ira Jadhav)
रविवारच्या सामन्यात इराने कर्णधार हर्ली गालासोबत २७४ धावांची भागीदारी रचली. गालाने ७९ चेंडूंमध्ये ११६ धावा केल्या. इरा ही मुंबईतील शारदाश्रम विद्यामंदिर इंटरनॅशनल स्कूल या शाळेची विद्यार्थिनी आहे. या वर्षीच्या विमेन्स प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेसाठी लिलावासाठी उपलब्ध खेळाडूंच्या यादीत तिचे नाव होते. तथापि, कोणत्याच संघाने तिच्याशी करार केला नाही. या वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघामध्ये तिला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. (Ira Jadhav)