चेन्नई : जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारा भारताचा बुद्धिबळपटू डी. गुकेशचे सोमवारी मायदेशात आगमन झाले. सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत गुकेशने मागील आठवड्यामध्ये चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून सर्वांत युवा विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला होता.(Gukesh Chess)
चेन्नई विमानतळावर सोमवारी दुपारी गुकेशचे आगमन झाले. त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी हजारो चाहते उपस्थित होते. जंगी स्वागतानंतर त्याच्यासाठी विशेष सजवण्यात आलेल्या कारमधून त्याला नेण्यात आले. वेल्लामल इंटरनॅशनल स्कूल या गुकेशच्या शाळेमध्ये काही मिनिटे त्याने प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. “जगातील सर्वांत युवा विश्वविजेता होण्याचे माझे ध्येय होते. हे ध्येय पूर्ण करून घरी परतल्याचा मला खूप आनंद आहे. आपल्या देशाला माझा किती अभिमान वाटतो, हे पाहून मी भारावलो आहे. मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे. आता मला या क्षणांचा आनंद घ्यायचा आहे,” असे यावेळी गुकेश म्हणाला. त्यावेळी, त्याचे पालक त्याच्यासोबत होते. (Gukesh Chess)
अठरावर्षीय गुकेशने चौदाव्या फेरीअखेर ७.५ गुण मिळवत विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. सिंगापूर येथे स्पर्धेच्या समारोप सोहळ्यावेळी गुकेशने मनोगत व्यक्त करताना प्रतिस्पर्धी लिरेनचेही कौतुक केले. त्याचबरोबर, पालकांचे व शाळेचे आभार मानण्यासही तो विसरला नव्हता.
हेही वाचा :
भारतीय संघ अडचणीत
न्यूझीलंड विजयाच्या नजीक