-अमोल उदगीरकर
मानस शास्त्रात एक ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ नावाची संकल्पना आहे. अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडे आकर्षीत होणे किंवा एखाद्या दुष्कृत्याला बळी पडलेली व्यक्ती ज्याने हे कृत्य त्याच्यासोबत केले आहे त्याच्याकडेच आकर्षित होणे याला मानसशास्त्रात ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ म्हणतात. हॉरर चित्रपट आणि प्रेक्षक यांच्या नात्यात कायम ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ च्या छटा आढळतात. म्हणजे चांगले हॉरर चित्रपट (यात रामसे बंधु आणि भट्ट कंपनी अपेक्षित नाही हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच) प्रेक्षकाला घाबरवतात, मध्येच झोपेतून दचकवुन उठवतात आणि अनेक प्रकारे मानसिक छळ करतात. पण चित्रपटगृहात चांगला हॉरर चित्रपट लागला आहे असे कळताच पुन्हा तोच भीतीदायक अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांची पावलं तिकडे वळायला लागतात. लोकांना भयपट का आवडतात त्याच हे मानसशास्त्रीय विश्लेषण .
हॉलिवुडने आतापर्यंत अनेक अप्रतिम भयपट दिले आहेत. पण त्यातदेखील ‘इनसीडियस’ चित्रपटमालिकेचे स्थान बरेच वरचे आहे. याच चित्रपटमालिकेतला पुढचा चित्रपट आणि यापूर्वीच्या भागांचा ‘प्रीक्वल’ असणारा चित्रपट म्हणजे ‘इनसीडियस-चॅप्टर थ्री ‘
अनेक हॉरर चित्रपट प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी प्रचंड रक्तपात, किळसवाणे चेहरे आणि ग्राफिक्सवर विसंबुन राहतात. मात्र ‘इनसीडियस’ चित्रपटमालिका याला अपवाद आहे. या चित्रपटमालिकेतले चित्रपट तुलनेने मर्यादित बजेटमध्ये बनवले जातात. हॉरर चित्रपट दिग्दर्शित करण्यातला दादा माणूस समजला जाणारा दिग्दर्शक जेम्स वेन याचा ह्या चित्रपटमालिकेच्या यशात मोठा वाटा होता. मात्र ‘इनसीडियस-चॅप्टर थ्री’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा यावेळेस ली व्हनाल याने सांभाळली आहे. ली हा चित्रपटमालिकेतल्या पूर्वीच्या चित्रपटांचा सहलेखक होता. या चित्रपटमालिकेची बलस्थानं आणि प्रेक्षकांना असणाऱ्या अपेक्षा यांची त्याला पुरेपुर जाणीव आहे. त्यामुळे जेम्स वेनकडून दिग्दर्शनाची धुरा घेण्यास तो सर्वार्थाने योग्य होताच. हा चित्रपट पाहिल्यावर लीने अपेक्षांचं चीज केल आहे हे जाणवतं.
चित्रपटाची कथा चार पाच ओळीत सांगण्यासारखी आहे. एका आजारपणामुळे अकाली आईला कायमच गमावून बसलेली क़्वाइन (स्टेफनी स्कॉट) आपले विधुर वडील (डरमॉट मलरॉनी) आणि एक छोटा भाऊ यांच्यासोबत एका अपार्टमेंटमध्ये राहत असते. आईच्या मृत्युतून ती अजून सावरलेली नसते. आपल्या कर्तव्यकठोर वडिलांशी पण तिचं फारसं जमत नसतं. अशाच एका एकाकी वेळी क़्वाइन आपल्या मृत आईच्या आत्म्याशी संपर्क साधण्याचा अयशस्वी प्रयत्न करते. मात्र हा प्रयोग उलटतो. आईच्या आत्म्याऐवजी एक दुष्ट आत्मा तिच्या संपर्कात येतो. तिच्या आत्म्यावर ताबा मिळवून तिला आपल्या आधीन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मात्र हा दुष्ट आत्मा आणि क़्वाइन यांच्यामध्ये एलिस (लिन शेय) ही मांत्रिक उभी असते . स्वतःच्या भूतकाळातील काही गोष्टींशी लढणारी आणि गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी झगडणारी एलिस या दुष्ट आत्म्याशी कशी लढते याची कहाणी म्हणजे ‘इनसीडियस-चॅप्टर थ्री’. या फारसा मोठा जीव नसणाऱ्या कथेचा पडद्यावरील विस्तार मात्र अफलातून म्हणता येईल असा आहे .
कुठलाही हॉरर चित्रपट प्रेक्षकाला सतत दीड ते दोन तास घाबरवत नाही. ते शक्य देखील नाही. चांगल्या हॉरर चित्रपटाचा डोलारा हा पाच ते सहा प्रसंगांवर अवलंबून असतो. हे प्रसंग प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी झाले तर चित्रपट यशस्वी होतो. ‘इनसीडियस-चॅप्टर थ्री’ मध्ये प्रेक्षकांना घाबरून सीटच्या कडेवर येउन बसायला लावणारे अनेक प्रसंग आहेत. दिग्दर्शक आणि लेखक ली व्हनाल याला यशस्वी भयपट बनवण्याची ‘नस ‘ कळली आहे हे या प्रसंगातून जाणवते. ‘सरप्राईज एलिमेण्ट्स’ चा सढळ वापर चित्रपटात केला आहे. रुढार्थाने या चित्रपटात नायक नायिका असे नाहीत. फक्त तीन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. याचा फायदा चित्रपटाच्या कथानकाला होतो. दुष्ट आत्मा आणि आजुबाजूचं जग याच्यात चिरडल्या जाणाऱ्या निष्पाप क़्वाइनची भूमिका स्टेफनी स्कॉटने चांगली केली आहे. एलिसच्या भूमिकेत लिन शेय हिने छान रंग भरले आहेत. भूमिकेचा किंवा व्यक्तिरेखेचा स्वतःचा प्रवास असणारी ही एकमेव व्यक्तिरेखा होती आणि लीन शेयने ती चोख बजावली आहे. चित्रपटात पडद्यावर दीर्घ शांततेचा अतिशय प्रभावी वापर केला आहे. कुठलाही मोठा धक्का देण्यापूर्वी या नीरव शांततेचा प्रभावी वापर दिग्दर्शकाने प्रभावीपणे केला आहे.
सगळ्यात छोटी भयकथा कुठली आहे? “पृथ्वीवरचा शेवटचा माणूस रूममध्ये एकटा बसला असतो आणि दरवाजा वाजतो.” अशा अर्थाची एक भयकथा काही दिवसांपूर्वी वाचनात आली होती. एक खोली आणि एकटा माणूस या कच्च्या मालावर अनेक हॉरर चित्रपटांची पायाभरणी झाली आहे. इनसीडियस-चॅप्टर थ्री मध्ये पण असे अनेक प्रसंग आहेत. पण ही गोष्ट पडद्यावर दाखवताना दिग्दर्शकाने अनेक अभिनव प्रयोग केल्याने चित्रपटाची खुमारी वाढली आहे. भयपट ह्या ‘जॉनर’ चे चाहते असाल तर चित्रपट आवर्जून बघाच.