दुबई : पुढील वर्षी रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान २३ फेब्रुवारी रोजी आमने-सामने येणार आहेत. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये असून भारताचे सर्व सामने संयुक्त अरब आमिरात (यूएई) येथे खेळवण्यात येतील. (India-Pak)
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. तथापि, भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्याने स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात अडथळा आला होता. मागील आठवड्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यावर तोडगा काढला. त्यानुसार, २०२७ पर्यंत भारत व पाकिस्तानकडे यजमानपद असणाऱ्या आयसीसी स्पर्धांमधील परस्पर देशांचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचवेळी हे त्रयस्थ ठिकाण ठरवण्याचा अधिकार यजमान देशांना देण्यात आला. त्यामुळे, पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीकरिता त्रयस्थ ठिकाण म्हणून यूएईची निवड केल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रवक्ते आमीर मीर यांनी सांगितले. (India-Pak)
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी शेख नाह्यान अल मुबारक यांची भेट घेतल्यानंतर त्रयस्थ ठिकाण म्हणून यूएईची निवड निश्चित झाली. मुबारक हे यूएईचे वरिष्ठ मंत्री आणि एमिराट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तानचा समावेश ‘ग्रुप ए’मध्ये आहे. बांगलादेश व न्यूझीलंड हे या ग्रुपमधील अन्य दोन संघ आहेत. स्पर्धेची सुरुवात १९ फेब्रुवारी रोजी गतविजेता पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने होईल. कराची येथे हा सामना रंगणार आहे. भारताचा स्पर्धेतील सलामीचा सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. २ मार्च रोजी भारताचा अखेरचा साखळी सामना न्यूझीलंडशी होणार आहेत. भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे. (India-Pak)
ग्रुप ए : पाकिस्तान, बांगलादेश, भारत आणि न्यूझीलंड.
ग्रुप बी : अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका.
हेही वाचा :