महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताने दिलेल्या १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवीने संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज अचुक मारा करत किवी फलंदाजांना घाम फोडला. परंतु, भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात यश मिळाले नाही. पहिल्या डावातील कमी धावसंख्येमुळे भारताचे नुकसान झाले. या विजयासह किवी संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात होणार आहे. (IND vs NZ Test)
बंगळुरू कसोटीच्या पहिला डावात भारताने अवघ्या ४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ४०२ धावांवर आटोपला. यामुळे किवी संघाकडे ३५६ धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारतीय संघाने सर्वबाद ४६२ धावा करत १०६ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने २७.४ षटकांत २ गडी गमावून हे आव्हान पार केले. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमची (0) आणि डेव्हॉन कॉनवेची (१७) च्या रूपात दोन फलंदाज बाद झाले. रचिन रवींद्र ३९ धावांवर नाबाद राहिला तर विल यंगने ४५ धावांची नाबाद खेळी केली. यावेळी दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.
३६ वर्षांनी भारतामध्ये विजय
बंगळुरू कसोटीत विजय मिळवून न्यूझीलंडने ३६ वर्षांनी भारतात विजय मिळवला. यापूर्वी १९६९साली ग्रॅहम डॉलिंगच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने नागपुर कसोटीत भारताचा १६७ धावांनी पराभव केला होता. तर, १९८८ साली जॉन राईटच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने वानखेडे स्टेडियमवर भारताचा १३६ धावांनी पराभव केला होता. किवी संघाने भारतात प्रथमच लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. यासह भारताचा कसोटीतील सलग विजयी मालिकाही संपुष्टात आली.
भारताचा पहिला डाव
पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला. त्यादिवशी नाणेफेकही होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि भारताचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपला. भारतीय फलंदाजीची क्रमवारी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. फलंदाजीमध्ये संघाच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. ऋषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने १३ धावांची खेळी केली. रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला तर जसप्रीत बुमराह एक धाव काढून बाद झाला. (IND vs NZ Test)
न्यूझीलंडचा पहिला डाव
न्यूझीलंडचा पहिला डाव ४०२ धावांवर आटोपला. रचिन रवींद्रने १५७ चेंडूत १३४ धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत १३ चौकार आणि ४ षटकार लगावले. कुलदीप यादवने त्याला बदली यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. डॅरिल मिशेल (१८), टॉम ब्लंडेल (५), ग्लेन फिलिप्स (१४) आणि मॅट हेन्री (८) यांना फारशी खेळी करता आली नाही. यानंतर रचिनने टीम साऊदीसोबत आठव्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली.
रचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले, तर सौदीने कसोटी कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. अर्धशतक झळकावल्यानंतर सौदी सिराजचा बळी ठरला. तो ७३ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६५ धावा करून बाद झाला. इजाजला चार धावा करता आल्या. तत्पूर्वी, लॅथम १५, विल यंग ३३, डॅरिल मिशेल १८ धावा करून बाद झाला. भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. (IND vs NZ Test)
भारताचा दुसरा डाव
भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत ४६२ धावा केल्या. फलंदाजीत भारताने ३ फलंदाज गमावून ४०८ धावा केल्या होत्या. यानंतर अवघ्या ५४ धावांत टीम इंडियाने उर्वरित सात फलंदाज गमावले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली होती. यशस्वी ३५ धावा करून बाद झाला तर रोहित ६३ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने सर्फराज खानसोबत तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. कोहली १०२ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७० धावा करून बाद झाला.
यादरम्यान सर्फराजने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने १९५ चेंडूंत १८ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १५० धावांची खेळी केली. ऋषभ पंतचे शतक एका धावेने हुकले. तो १०५ चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ९९ धावा करून बाद झाला. भारताची खालची ऑर्डर अपयशी ठरली. केएल राहुल १२, रवींद्र जडेजा ५, आर अश्विन १५ धावा करून बाद झाला. त्याचवेळी बुमराह आणि सिराज यांना खातेही उघडता आले नाही. भारतीय संघाकडे १०६ धावांची आघाडी होती. न्यूझीलंडकडून मॅट रेनी आणि विल्यम ओरूर्कने प्रत्येकी तीन बळी घेतले. एजाज पटेलला दोन, तर टीम साऊथी आणि ग्लेन फिलिप्सला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
New Zealand win the First Test by 8 wickets in Bengaluru.#TeamIndia will look to bounce back in the Second Test.
Scorecard ▶️ https://t.co/8qhNBrs1td#INDvNZ | @idfcfirstbank pic.twitter.com/6Xg4gYo8It
— BCCI (@BCCI) October 20, 2024
हेही वाचा :