भुवनेश्वर : वृत्तसंस्था : ‘डीआरडीओ’ने रविवारी (दि.१७) ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. यावर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून ‘डीआरडीओ’च्या टीमचे कौतुक केले. हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र भारतीय सशस्त्र दलाच्या सर्व सेवांसाठी १५०० किमीपेक्षा जास्त श्रेणीसाठी विविध पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. (Hypersonic missile)
या वेळी ते म्हणाले, की ओडिशाच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी यशस्वी केली. या चाचणीमुळे भारताने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा सर्वांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीने आपला देशाचा निवडक गटात समावेश झाला आहे. प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची क्षमता असलेल्या राष्ट्राचे, सशस्त्र दलांचे आणि उद्योगाचे अभिनंदन करतो. दरम्यान, ‘आरएम’ओ इंडियाच्या अधिकृत हँडलने मिशनची एक क्लिप पोस्ट केली जिथे क्षेपणास्त्र चाचणी पाहिली जाऊ शकते.
हे क्षेपणास्त्र डॉ एपीजे अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स, हैदराबादच्या प्रयोगशाळांसह इतर विविध ‘डीआरडीओ’ प्रयोगशाळा आणि उद्योग भागीदारांनी स्वदेशी विकसित केले आहे. ‘डीआरडीओ’ आणि सशस्त्र दलाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ही उड्डाण चाचणी घेण्यात आली. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आवाजाच्या कमीत कमी पाच पट वेगाने (ताशी १२३५ किलोमीटर) उडू शकतात. म्हणजेच त्याचा किमान वेग ताशी ६१७४ किलोमीटर आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. हे क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाते. यानंतर ते जमिनीवर किंवा हवेत असलेल्या लक्ष्याला लक्ष्य करते. त्यांना रोखणे फार कठीण आहे. तसेच त्यांचा वेग जास्त असल्याने रडारही त्यांना पकडू शकत नाहीत. (Hypersonic missile)
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र क्षमता?
अहवालानुसार, सध्या जगातील केवळ पाच देशांकडे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची क्षमता आहे. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि भारत; मात्र इराणकडूनही अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याचे वृत्त आहे. याशिवाय ब्रिटन, इस्रायल, ब्राझील आणि दक्षिण कोरियामध्ये हे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.