महाराष्ट्रातील महायुती सरकारने बिग बॉसचा खेळ सुरू केलाय की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती गेले काही दिवस महाराष्ट्रात आहे. विरोधकांचे फोन टॅपिंग करणाऱ्या रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात अपराधगंड निर्माण व्हावा, अशा गोष्टी बाहेर येत आहेत. (Honey trap and politics)
- डॉ. विजय चोरमारे
एका मंत्र्याचा बेडरुममधील फोटो बाहेर येतो. दुसऱ्या मंत्र्याचा आपल्याच घरातला अघोरी पूजा करतानाचा व्हिडिओ समोर येतो. तिसऱ्या आमदाराचा बनियन टॉवेलवर बॉक्सिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो. काय चाललंय काय कळत नाही. आता फक्त मंत्री, आमदारांचे बाथरुममधील फोटो बाहेर यायचे राहिले आहेत. हे सगळे घडत असतानाच हनी ट्रॅपच्या चर्चेने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. माणिकराव कोकाटे यांनी रमी खेळून किती पैसे कमावले यापेक्षाही हनी ट्रॅपमध्ये कोणकोण मंत्री आणि आमदार खासदार आहेत, याची उत्कंठा महाराष्ट्राला लागून राहिली आहे. (Honey trap and politics)
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिबिर इगतपुरीला झाले. अशा ठिकाणी नेत्यांच्या पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा होत असतात. इगतपुरीला शिबिर असल्यामुळे बहुतांश नाशिकचे पत्रकार उपस्थित होते. तिथे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमधील हनी ट्रॅपचा जाता जाता उल्लेख केला. आजच्या संवेदनशील काळात एखाद्या गोष्टीचा उच्चार झाल्यानंतर तिचा बोभाटा होतोच. पूर्वी मोजकी माध्यमे होती तेव्हा गोष्टी मॅनेज करता यायची. आता तसे राहिलेले नाही. त्यामुळे बघता बघता ही गोष्ट महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचली. आणि एकदा ती विधानसभेत पोहोचली की तिचे गांभीर्य वाढते. (Honey trap and politics)
आता राज ठाकरे यांनी ज्या हनी ट्रॅपचा आणि नाशिकमधल्या हॉटेलचा उल्लेख केला, ते हॉटेल सगळ्यांना माहीत आहे. सगळ्या पक्षांचे नेते नाशिकमध्ये गेल्यावर त्याच हॉटेलमध्ये असतात. ज्यांनी प्रकरणाची पुडी सोडली, ते राज ठाकरेसुद्धा. राजकीय पक्षांचे कार्यक्रमही तिथेच होतात. संबंधित हॉटेलमालक पूर्वाश्रमीचे काँग्रेसवाले. आता राजकारणात सक्रीय नसलेले परंतु सर्वपक्षीय संबंध असलेले. त्यातही पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निकटवर्तीय. विखे पाटलांचे नाशिकमधले कारभारी म्हणूनच सगळ्यांच्या नजरेत भरणारे.
ज्या हनी ट्रॅपची चर्चा होतेय, त्याचा नाशिकमधल्या त्यांच्या हॉटेलशी संबंध नाही. परंतु याच मालकाचे शहराबाहेर रिसॉर्ट आहे. कथित घटना तिथे घडल्याची चर्चा आहे. आजच्या घडीला फक्त चर्चाच आहे. पतंगबाजीच सुरू आहे. ज्याला अधिकृतता आहे, असे एकच प्रकरण नाशिकमधले आहे. ते आहे एका अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे. राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या एका महिला कार्यकर्त्याशी ते संबंधित आहे. त्यात तक्रारी झाल्या. नंतर तडजोड झाली. त्यादरम्यान कोट्यवधींची वसुली झाल्याचे सांगितले जाते.
त्यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर विषय विधानसभेत गेला. (Honey trap and politics)
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवत खळबळ उडवून दिली. माझ्या हातात हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांची माहिती असणारा पेनड्राईव्ह आहे, पण मला कोणाची बदनामी करायची नाही. हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. म्हणून या गंभीर प्रश्नावर सरकारने निवेदन सादर करायला हवं, अशी मागणी नाना पटोलेंनी केली.
या प्रकरणाची सरकार गंभीर दखल घेऊन चौकशी करेल आणि दोषीवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. तर याबाबत निवेदन सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
जितेंद्र आव्हाड यांनीही हनी ट्रॅपच्या प्रकरणात सनसनाटी माहिती दिली. रिसॉर्टमधल्या एका सूटमध्ये आठ कॅमेरे लावलेत, जे खास चीनहून आणले आहेत. प्रश्न हनी ट्रॅपचा नाही. हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा. हा गुजरात पॅटर्न आहे. गुजरातमध्ये अशा अनेक क्लिप्स निघतात. त्यातून आत्महत्या होतात, एका महसूल अधिकाऱ्याला तीन कोटी मागितले. ते दिल्यानंतर परत दहा कोटी मागितले, ही गोष्टही आव्हाड यांनी सांगितली. जो हे धंदे करतो. हॉटेलमध्ये बोलावून सुविधा देतो. नंतर एक वर्षाने त्याचे रेकॉर्डिंग घेऊन वसुलीसाठी जातो, अशी पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हनी ट्रॅपचा विषय उडवून लावला. असे काहीही घडले नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही चर्चा पुढे नेताना, राज्यातील काही अधिकारी व मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत आणि त्याचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेले आहेत, असा आरोप केला. भाजपाने जे पेरले तेच उगवले आहे. असे सांगून मुख्यमंत्री याप्रकरणी नेहमीप्रमाणे खोटे बोलत असल्याचे हर्षवर्धन सकपाळ म्हणाले. (Honey trap and politics)
संजय राऊत, एकनाथ आव्हाडांची उडी
हा सगळा गोंधळ सुरू असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत या प्रकरणात उतरले. त्यांनी प्रफुल्ल लोढाचे प्रकरण चव्हाट्यावर आणून पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. गिरीश महाजन सापडताहेत म्हटल्यावर एकनाथ खडसे यांनी प्रकरणात उडी मारली. त्यांनी प्रफुल्ल लोढाचा एक व्हिडिओ समोर आणला. ज्यात त्याने आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. गिरीश महाजन यांचे नाशिकशी जवळचे संबंध असल्यामुळे नाशिकच्या प्रकरणाशी त्यांचाही संबंध जोडला जाऊ लागला. हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी झाल्याचा आरोप करून संजय राऊत यांनी, ‘हनी ट्रॅम्प’चा वापर करूनच आमचे १५-१६ आमदार आणि चार तरुण खासदार फोडण्यात आल्याचा दावा केला. आताच्या राज्य सरकारमधील चार मंत्री त्यामध्ये अडकले असून त्यापैकी दोन भाजपाचे आहेत, असा सणसनाटी दावाही राऊत यांनी केला.
मंगळवारी सकाळी करुणा धनंजय मुंडे यांनी एका पीडित महिलेला माध्यमांसमोर आणले. शासकीय अधिकारी आजी माजी मंत्री हनीसोबत हनीमून करतात, आणि नंतर त्यांना तो ट्रॅप वाटतो, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला. संबंधित महिलेने दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे फोटो दाखवून त्यांच्यावर गंभीर आरोप केले. सहा महिन्यांपासून आपण न्यायासाठी सरकार दरबारी भटकतोय परंतु आपल्याला न्याय मिळत नसल्याची कैफियत संबंधित महिलेने मांडली.
एकाचेळी इतका सगळा गदारोळ उडाल्यानंतर हनी ट्रॅपची नेमकी भानगड काय आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. एखाद्या प्रकरणाचे सगळे बिंदू जोडल्यानंतर काही एक चित्र तयार होते. परंतु इथे ते होत नसल्यामुळे नुसता गोंधळ आणि पतंगबाजी सुरू झाली. (Honey trap and politics)
नीट समजून घेतल्यानंतर लक्षात येते की, ही तीन वेगवेगळी प्रकरणे आहेत.
महसूल अधिकारी, होमगार्ड महिला ते ७० अधिकारी
राज ठाकरे यांनी नाशिकधील हॉटेलच्या ज्या प्रकरणाची टिप दिली, ते प्रकरण वेगळे आहे. संबंधित हॉटेलमध्ये राजकीय नेते, अधिकाऱ्यांची ऊठबस असते. एवढाच संदर्भ आहे. त्याला एका महसूल अधिकाऱ्याच्या प्रकरणाशिवाय कसलाही आधार नाही. परंतु संबंधित हॉटेलमालक हा राधाकृष्ण विखे-पाटील यांचा नाशिकचा कारभारी असल्यामुळे त्याची चर्चा अधिक झाली.
दुसरे प्रकरण एका होमगार्ड महिलेशी आणि ठाणे जिल्ह्यातील दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. त्यातून त्याचा विस्तार होत होत सुमारे ७० अधिकाऱ्यांपर्यंत प्रकरण गेले. नेमकी वस्तुस्थिती समोर यायची आहे. खरेतर सरकारने अधिकृतपणे चौकशी करून वस्तुस्थिती समोर मांडायला पाहिजे. परंतु ते होणार नाही.
ईडी आणि सीडी…
तिसरे प्रकरण प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांच्याशी संबंधित आहे. ते वेगळेच आहे. प्रफुल्ल लोढा हा एकेकाळचा गिरीश महाजन यांचा निकटवर्ती. आता त्यांचे बिनसले आहे. त्यातून काही आरोप केले गेले आहेत. आपण एक बटण दाबले तर सगळे उद्ध्वस्त होऊन जाईल, असे तो म्हणतो. त्याच्यावरही बलात्काराचे गुन्हे नोंद आहेत. त्यांनी ईडी आणली तर मी सीडी बाहेर काढीन अशा डॉयलॉगवर राष्ट्रवादी काँग्रेसची आमदारकी मिळवणारे एकनाथ खडसे हेही यात उतरले. परंतु प्रफुल्ल लोढाच्या प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या पलीकडे त्यांच्याकडे काही असेल असे वाटत नाही.
एकूण सगळीच प्रकरणे गंभीर आहेत. परंतु त्यासंदर्भात अधिकृत पुरावे खूप कमी प्रमाणात मिळतात. नाना पटोले यांनी दाखवलेल्या पेन ड्राइव्हमध्ये खरेच काही आहे की खडसे यांच्या सीडीसारखाच त्यांचा पेनड्राईव्ह रिकामा आहे याबाबत निश्चित माहिती नाही. होमगार्ड महिलेच्या प्रकरणी काही पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप आहेत. प्रफुल्ल लोढा प्रकरणातूनच काहीतरी निघण्याची शक्यता आहे. परंतु लोढावरच गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Honey trap and politics)
राहता राहिला प्रश्न संजय राऊत यांच्या आरोपांचा. मंत्री, आमदार, खासदार अडकल्याचा. ते तरी काही पुरावे देतात की दोन दिवस सनसनाटी निर्माण करून ते नव्या विषयाकडे वळतात, हे पाहावे लागेल.
खरेतर सरकारमधील अनेक मंत्र्यांना, सरकारशी संबंधित आमदार खासदारांना संशयाच्या भोवऱ्यात लोटणाऱ्या या प्रकरणाची चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर यायला पाहिजे. परंतु सध्याच्या सरकारकडून हे होणार नाही. त्यामुळे आरोपांचे पतंग उडत राहणार. आणि खरोखर एखाद्याचा व्हिडिओ किंवा क्लिप बाहेर आली तर मात्र सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही.
या सगळ्यामध्ये ‘सामना’च्या अग्रलेखातील एक वाक्य तंतोतंत पटण्याजोगे आहे – सरकारचा कोठा झालाय आणि कोठ्याची हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांना नाचवीत आहे.